रामायणाच्या गोष्टी

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 30 – हनुमानाने, लंका पेटवली.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रावणाने राक्षसांना, मारुतीच्या शेपटीला, कपडे चिंध्या बांधून, त्यावर तेल ओतून, पेटवून देण्याची, आज्ञा दिली. जसजसे राक्षस, शेपटी भोवती, कपडे गुंडाळत होते, तसतशी शेपटी, मोठी मोठी, होत जात होती. रावण म्हणाला, लंकेतील सगळे, कपडे आणा. एकही कापड दुकान, सोडू नका. हजारो सेवक, पळत सुटले. लंकेतील सगळी, कापड दुकाने लुटली. लंकेच्या एकाही घरात, कापड म्हणून, शिल्लक उरले नाही. सगळे कपडे, हनुमानाच्या शेपटी भोवती, गुंडाळून देखील, थोडेसे शेपूट, शिल्लकच राहिले. सेवकांनी भराभर, त्याच्यावर तेल ओतले. शेपटाला, आग लावून दिली. शेपूट काही पेटेना. रावण स्वतः, पुढे आला, आणि जोरात, फुंकर मारली. त्याबरोबर आग भडकून, रावणाच्या दाढी मिशा, जळून गेल्या. आग भडकल्यानंतर, हनुमान एका, उंच प्रासादावर, उडी मारू बसला. जळत्या शेपटीने, तो प्रासाद, धडाधडा पेटू लागला. भराभर उड्या मारत, या घरावरून, त्या घरावर. या गावातून, त्या गावात. या राज्यातून, त्या राज्यात. संपूर्ण देश, हनुमानाने, काही क्षणात, पेटवून दिला. हनुमानाची, टिंगल टवाळी करत, खदाखदा हसणारे राक्षस, जीवाच्या भीतीने, सैरावैरा पळत सुटले. एकच, हलकल्लोळ, उडाला. आगीच्या ज्वाळा, आकाशाला भिडल्या. जमिनीवर, राखेचे पर्वत, उभे राहिले. राक्षस म्हणाले, रावणाने सीतेला, पळवून आणल्यामुळे, आमच्यावर हा, प्रसंग आला. बिभीषण म्हणाला, करावे तसे, भरावे, पापाचे फळ नेहमीच, कडू असते. संपूर्ण लंका, पेटल्याची, खात्री झाल्यावर, हनुमानाने, समुद्रकिनाऱ्यावर येऊन, समुद्राच्या पाण्यात, आपली शेपटी, विझवली. आणि भराभर, उड्या मारत तो, सीतेजवळ आला. सीता सुखरूप होती. हनुमान सीतेला, भक्ती भावाने, नमस्कार करीत म्हणाला. सीतामाते, तू सुरक्षित असल्याची, खूण म्हणून, तुझ्या हातातील, सोन्याचे कंगण, मला दे. मी ते, श्रीरामांना दाखवीन. तू निश्चिंत रहा. तुझे दुःख, लवकरच, दूर होईल. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 30 – हनुमानाने, लंका पेटवली. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 29 – रावणाच्या दरबारात रामाचा हेर-हनुमान!

श्रीराम श्रीराम श्रीराम ! अशोकवनात हनुमानाची सीतेशी भेट झाली. अनेक दिवस त्यानी काही खाल्लंच नव्हतं. त्याच्या पोटात कावळे कोकलत होते. समोर हजारो झाडे आणि त्यांना लगडलेली लाखो फळे! मग काय—हनुमान संपूर्ण अशोकवनावरच तुटून पडला! रसाळ फळे तोंडात बकाबका कोंबली. झाडे उखडली फांद्या मोडल्या जमिनीवर फळांचा चिखलच झाला! पहाऱ्याच्या राक्षसिणी, घाबरून मागे सरकल्या. “कोण हा माकड?” त्यांना कळेना. रावणापर्यंत ही बातमी पोचलीच! “एका माकडाने संपूर्ण अशोकवन उद्ध्वस्त केले आहे!” रावणाचा राग अनावर झाला. “त्याला ठेचून टाका!” रावणानी राक्षस सैन्य पाठवले. पण शक्तीमान, बुद्धिमान, हनुमानापुढे, काही ते टिकले नाही. एका क्षणात सगळे गडाबडा लोळत पडले! शेवटी रावणाने स्वतःच्या बलाढ्य मुलाला पाठवले—अंगदला! हनुमानाच्या मनात एक योजना होती. हनुमानाला तर रावणाच्या दरबारात जायचे होते. सगळ्या गुप्त बातम्या रामापर्यंत, पोचवायच्या होत्या. मग काय? त्याने हुशारीने नाटकच रचले! लढता लढता तो अचानक जोरात ओरडला आणि बेशुद्ध पडला. मूर्च्छित झाला. राक्षसांनी त्याला दोरखंडानी घट्ट बांधले. आणि उचलून रावणाच्या दरबारात आणले. रावण ऐटीत उंच सिंहासनावर बसला होता. पण हनुमानाने आपली शेपटी लांबवली गुंडाळली आणि मोठ्ठं उंच आसन पूच्छासनच तयार केलं आणि रावणापेक्षा फूटभर उंच बसला! “तुच्छ माकडा “अशोकवन उध्वस्त केल्याची शिक्षा तुला मिळेल—मृत्युदंड!” इतक्यात विभीषण उठला. “राजन् हा राजदूत आहे! तोही रामाचा. राजदूताला मारायचे नसते. त्याला दुसरी काहीही शिक्षा द्या” रावण विचारात पडला. त्याच्या डोक्यात कल्पना चमकली. “शेपूट पेटवा याची. शेपटीला चिंध्या बांधा. त्यावर तेल टाका! पेटलेल्या शेपटासह याला गावभर फिरवा. धिंड काढा त्याची! मग समजेल याला राक्षसशक्ती काय असते ते!” दरबारी राक्षस पेटलेल्या शेपटाकडे पाहून खदाखदा हसू लागले. हनुमानाची टिंगल टवाळी करू लागले. आणि हनुमान? तो तर पेटलेल्या शेपटाकडे पाहून मनातल्या मनात गालातल्या गालात खुदुखुदू हसत होता! त्याच्या सुपिक डोसक्यात एक भन्नाट आयडियाची कल्पना शिजत होती… प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 29 – रावणाच्या दरबारात रामाचा हेर-हनुमान! Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 28 – हनुमानाला सीता भेटली.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! जगात चांगली माणसे जास्त वाईट माणसे कमी असतात. पण राक्षसांच्या राज्यात दुष्ट राक्षस जास्त. आणि एखादाच चांगला बिभीषण असतो. बिभीषणाने सांगितल्यावरून हनुमान सीतेला शोधायला अशोक वनात गेला. अशोक वन अतिशय सुंदर होते. हजारो फळांच्या फुलांच्या झाडांनी बहरलेले होते. शेकडो राक्षसिणी तिथे पहाऱ्यावर होत्या. एका अशोक वृक्षाच्या झाडाखाली पारावर बसलेली सीतामाता हनुमानाला दिसली. हनुमान शांतपणे त्या झाडावरून खालील दृश्य पहात होता. राक्षसिणी सीतेला छळत होत्या. सीता, दुःखी, कष्टी, हताश दिसत होती. कुणीही समोर नाही हे बघून संधी साधून हनुमानाने खाली उडी मारली आणि सीतेसमोर उभा राहिला. सीता घाबरली. तिला वाटले कुणी तरी मायावी राक्षस माकडाचे रूप घेऊन आपल्याला छळायला आलेला आहे. श्रीरामाने दिलेली खुणेची अंगठी सीतेसमोर टाकून हनुमान म्हणाला. मी श्रीरामांचा दूत आहे त्यांनी मला पाठवले आहे. माझी ओळख पटवायला ही अंगठी दिली आहे. अंगठी पाहून सीतेला हायसे वाटले. श्रीराम व लक्ष्मण आपल्याला सोडवायला येत आहेत हे ऐकून तिला आधार वाटला. पण साध्या माकडांचे सैन्य या बलाढ्य राक्षसांना कसे हरवणार. सीतेला चिंता वाटू लागली. हनुमानाने हळूहळू मोठे होत आपल्या प्रचंड स्वरूपाचे दर्शन सीता मातेला घडवले. आणि तिचा हनुमानावर विश्वास बसला. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 28 – हनुमानाला सीता भेटली. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 27 – राक्षस राज्यात रामभक्त बिभीषण सापडला

श्रीराम श्रीराम श्रीराम ! डासाच्या, सूक्ष्म रूपात, हनुमान, सीतेला शोधत होता. रावणाच्या महालात, सीता दिसली नाही. पण एका महालासमोर त्याला, तुळशीचं, पवित्र वृंदावन दिसलं. राक्षसांच्या राज्यात, तुळशीवृंदावन! त्याला आश्चर्य वाटलं. आत रावणाचा भाऊ बिभीषण मनोभावे श्रीरामाची पूजा करत होता. तो शांत दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर, भक्तीचं तेज होतं. हनुमानाने स्वतःचे मूळ रूप धारण केलं. मी प्रभू श्रीरामाचा दूत हनुमान आहे. अशी स्वतःची ओळख करून दिली. राक्षस असला तरी बिभीषणानी सत्य, धर्म आणि भक्तीचा मार्ग सोडला नव्हता. जाणीवपूर्वक स्वतःच्या इच्छेने ठरवून त्यानी तो मार्ग स्वीकारला होता. राक्षसांच्या राज्यात अधर्माचे वाळवंट असले तरी बिभीषणाच्या रूपानी एक निवडुंग शिल्लक होता. त्याच्या मनात भक्तीचा ओलावा होता. रामावरती श्रद्धा होती. हनुमानाने सीतेला सन्मानाने अयोध्येला परत नेण्यासाठी बिभीषणाची मदत मागितली. मदत करायला बिभीषण आनंदानी तयार झाला. त्यानी सांगितलं, मी नेहमी, सत्याच्या बाजूनी, उभा राहीन. बिभीषणाने सांगितलं, की रावणानी सीतादेवींना अशोक वनात राक्षसींच्या पहाऱ्यात कडे कोट बंदोबस्तात कैद करून ठेवले आहे. सीतामाता, अशोकवनात आहे. हे आता, हनुमानाला समजले होते. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 27 – राक्षस राज्यात रामभक्त बिभीषण सापडला Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाची गोष्ट 26 – राक्षसांच्या राज्यात, रामदूत हनुमान

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सर्व संकटांवर मात करत हनुमान लंकेत पोचला. सगळीकडे राक्षसांचा कडेकोट बंदोबस्त होता. कडक पहारा होता. काळे कुळकुळीत राक्षस हातात तळपत्या तलवारी घेऊन रस्त्यांवरून फिरत होते. दिवसाढवळ्या रावणाच्या राज्यात जाणे धोक्याचे होते. हनुमानानी रात्र होण्याची वाट पाहीली. आपले अजस्त्र शरीर सूक्ष्म करून अतिशय लहान करून एका डासाचे रूप घेतले. पण ही घटना नेमकी पहाऱ्यावर असलेल्या लंका नावाच्या राक्षसीणिनी पाहिली. तिला शंका आली. तिनी अडवलं. हनुमानानी आपलं खरं रूप प्रकट केलं. आणि आपली एक कठोर वज्रमूठ तिच्या हनुवटीवर जोरात मारली. ती गप्प खालीच बसली. ज्या दिवशी, एका माकडा कडून तुझा पराभव होईल त्या दिवशी लंका नगरीचे वाईट दिवस सुरू होतील. हे भविष्य तिला माहित होते. तो दिवस आज आला आहे हे तिला समजले. रावणानी सीतेला पळवून आणलेय पण कुठे ठेवलेय हे माहित नाही असं तिनी सांगितलं. डासाच्या रूपातला हनुमान, रावणाच्या महालात पोचला. पण त्याला सीता कुठेच दिसली नाही. तो सगळीकडे शोधतच राहिला. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाची गोष्ट 26 – राक्षसांच्या राज्यात, रामदूत हनुमान Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 25 – हनुमान उडी

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीतेचा शोध घेण्यासाठी रामभक्त हनुमान लंके कडे जायला तयार झाला. त्याच्या पराक्रमाला हुशारीला आणि चातुर्याला ते एक आव्हानच होते. त्यानी आपले शरीर हलवून एक प्रचंड गर्जना केली. आपले शेपूट फाडकन जमिनीवर आपटले. हळूहळू त्याचे शरीर पर्वताएवढे मोठे झाले. रागानी त्याचे डोळे लाल लाल झाले. आपले प्रचंड हात पसरून त्यानी श्रीरामांचे नाव घेतले “जय श्रीराम” आणि निळ्या आकाशात रामेश्वरमच्या समुद्र किनाऱ्यावरून उड्डाण केले. रामेश्वरम पासून लंका 100 योजने दूर होती. एक योजन म्हणजे 20 किलोमीटर. आणि 100 योजने म्हणजे 2000 किलोमीटर. एका उडीत, दोन हजार किलोमीटर, अंतर कापायचे होते.हनुमानाच्या अंगात ती क्षमता होती. पण ते त्याला माहीत नव्हते. श्रीरामांनी त्याला त्याच्या ताकदीची जाणीव करून दिली. आणि मग त्याचा आत्मविश्वास वाढला. हनुमान खोबरे खायचा. अंगाला खोबरेल तेलाचे मालिश करायचा. आणि खूप व्यायाम करायचा. खेळायचा. म्हणून तो ताकदवान झाला. आणि प्रचंड ताकदीनं त्यानी उड्डाण केले. वाटेत अनेक विघ्ने आली. समुद्रातून मायावी पर्वत वर आला. आकाशातून राक्षस राक्षसिणि त्याच्यावर चालून आल्या. पण सगळ्यांना हरवून तो विजयी हनुमान श्रीरामचंद्रांचे नामस्मरण करत. समुद्राच्या दुसऱ्या तीरावरील लंकेत जाऊन पोचला. आता लंकेत सीतामाता कुठे आहे हे शोधायचे होते. आज तुम्ही सगळे, घरी जाऊन हनुमानाचा “गुळ खोबरं” हा प्रसाद आईला मागा. गुळ खोबरे खाऊन हनुमानासारखे शक्तिमान आणि बुद्धिमान व्हा. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 25 – हनुमान उडी Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 24 – एका उडीत समुद्र हनुमानच ओलांडणार

श्रीराम श्रीराम श्रीराम ! एका उडीत समुद्र, हनुमानच ओलांडणार. वानर राज सुग्रिवाचे सेनापती, अंगद, जांबुवंत, नल, नील व हनुमान चिंतेत होते. एवढा अथांग समुद्र एका उडीत कोण पार करू शकेल. एवढे सामर्थ्य कुणाचेच नव्हते. जांबुवंत म्हणाला हनुमाना तुझ्या इतकी शक्ती वेग सहनशीलता आणि शहाणपणा दुसऱ्या कुणात नाही. एवढे कठीण काम करायल, तू एकटाच लायक आहेस.एका उडीत समुद्र, पवनपुत्र, हनुमानच ओलांडणार. हनुमान तर गप्प गप्प विचार मग्न दिसत होता. एका शापामुळे तो आपले सामर्थ्य प्रचंड शक्ती विसरून गेला होता. श्रीरामांची भेट झाल्यावर श्रीरामांनी एका दृष्टीक्षेपात त्याचे सुप्त सामर्थ्य जागृत केले. त्याला शक्ती बरोबर युक्ती दिली. मारुती ज्ञानी झाला. आणि आपले सामर्थ्य, ज्ञान, कौशल्य, राम कार्यासाठी कारणी लावायचे वाहून घ्यायचे त्यानी ठरवले. आणि अचानक हनुमानाला स्फुरण चढले. अंगात उत्साह संचारला. त्याचा चेहरा उजळून निघाला. त्यानी “जय श्रीराम” असा नारा दिला. आणि तो हनुमान उडी घ्यायला सज्ज झाला. प्रभू श्रीरामचंद्र की जय.प्रभू श्रीरामचंद्र की जय.प्रभू श्रीरामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 24 – एका उडीत समुद्र हनुमानच ओलांडणार Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 23 – हनुमानाची वानरसेना जमली.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! मारुती/हनुमान हा, वानरराज सुग्रीव याचा, सेनापती होता. त्यानी एक हाक देताच दाही दिशातून, वानर सैन्य धावत आले. त्यानी आपली वानरसेना जमवली. ते वानर सैन्य पाहता पाहता समुद्रासारखे पसरले. नर आणि वानर एकसाथ झाले. सीतेला शोधायची मोहीमच त्यांनी काढली. सुग्रीवानी सांगितले राजाची आज्ञा म्हणून, हे काम, करू नका. हे रामकार्य आहे, अशा भावनेने करा. सीता ही, सापडलीच पाहिजे. सीता सापडल्या शिवाय कोणीही परत येऊ नका. दक्षिण दिशेकडे निघालेल्या हनुमानाला श्रीरामांनी आपल्या बोटातील अंगठी, काढून दिली. सीता भेटल्यावर ही अंगठी तिला दाखव. म्हणजे तुझी ओळख तिला पटेल असे सांगितले. हनुमानाचे सैन्य सीतेला शोधत शोधत जिथे जमीन संपते. आणि समुद्र सुरू होतो. तिथपर्यंत आले. समोर अथांग समुद्र पसरला होता. आणि त्यापुढे रावणाची लंका होती. सीतेला शोधण्यात अजून एक गंभीर संकट पुढे उभे होते. हा समुद्र पार करून आपले सैन्य पलीकडे कसे न्यायचे हा प्रश्नच होता. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 23 – हनुमानाची वानरसेना जमली. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 22 – सरळ सुग्रीवाशी मैत्री आणि वाकड्या वालीचा वध

श्रीराम श्रीराम श्रीराम ! राम लक्ष्मण सीतेला जंगलात शोधत होते. त्यांना वानरराज सुग्रीव भेटला. वानर म्हणजे वनात रहाणारे नर. वानर. आपल्यासारखी माणसेच होती ती जंगलात जगण्यासाठी झाडांवरील फळे कंदमुळे खात. त्यांना माकडां सारखे झाडांच्या फांद्यांना झोके देत लांबच्या लांब अंतरे पार करावी लागत. म्हणून ते तशी वेशभूषा करत. तोल सांभाळण्यासाठी लांब जाड शेपटी लावत. तर असा हा वानरराज सुग्रीव. श्रीरामांना भेटला. सुग्रीव दु:खी होता. कष्टी होता. त्याचा दुष्ट, गुंड, पुंड, भाऊ वाली यानी त्याला राज्यातून हाकलून स्वतः राजा बनला. राजा होण्यासाठी न्याय आणि धर्म पाळायला हवा होता. सुग्रीव जंगलात जिवाच्या भीतीने लपून बसला होता. राम आणि सुग्रीवाने एकमेकांशी मैत्री केली. चांगल्या मित्रासोबत संकटांचा सामना करणं सोपं होतं. त्यांचं ठरलं. श्रीराम सुग्रीवाला वालीपासून वाचवणार आणि सुग्रीव सीतेला शोधायला रामाची मदत करणार. सुग्रीवाचं मन स्वच्छ होतं. म्हणून श्रीरामांनी वालीचा वध करण्याचं वचन दिलं. सुग्रीवानी वालीला लढाईसाठी आव्हान दिलं. त्यांचं भयंकर युद्ध झालं. दुष्टपणा आणि अन्याय करणाऱ्याला शिक्षा होणं गरजेचं असतं. रामानी बाणाने दुष्ट वालीचा वध केला. वालीनी शेवटी आपली चूक मान्य केली. सुग्रीव पुन्हा वानरांचा राजा बनला. आपला सेनापती हनुमान याच्या मदतीने त्यानी आपली वानरसेना जमवली. नर आणि वानर एकसाथ झाले. सीतामातेला रावणाच्या तावडीतून सोडवायला सज्ज झाले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 22 – सरळ सुग्रीवाशी मैत्री आणि वाकड्या वालीचा वध Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 21 – रामभक्त शबरीची उष्टी बोरे

श्रीराम श्रीराम श्रीराम ! राम लक्ष्मण सीतेच्या शोधात जंगलातून जात होते. त्यांना एका लहानशा झोपडीमधे शबरी नावाची आदिवासी स्त्री भेटली. ती फुलांच्या माळा बनवत असे. शबरी खूप साधी होती, पण मनाने खूप मोठी होती. ती रामभक्त होती. एक ना एक दिवस आपल्याला रामाचे दर्शन होईल अशी तिला आशा होती. हातात फुले आणि मुखात राम. अचानक श्रीराम आणि लक्ष्मण आलेले पाहून शबरी खूष झाली. तिनी श्रीरामांसाठी जंगलातून बोरं आणली. एकेक बोर चाखून गोड बोरं रामासाठी ठेवली. ती साधी आणि शुद्ध मनाची होती. तिनी आपली श्रद्धा आणि प्रेम दिलं. श्रीरामांनी ती उष्टी बोरं मोठ्या आनंदानी खाल्ली. आणि शबरीचा निरोप घेऊन सीतेला शोधायला निघाले. प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 21 – रामभक्त शबरीची उष्टी बोरे Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 20 – जटायूच्या बलिदानाने सीतेच्या शोधाला दिशा मिळाली.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून रावणाला सीतेला पळवून नेण्याची संधी मिळाली. अतिशय दुःखात असलेले राम, लक्ष्मण घनदाट जंगलात सीतेला शोधू लागले. एका झुडपामागून त्यांना कुणाचा तरी कण्हण्याचा आवाज ऐकू आला. तो गरुडांचा राजा, जटायू याचा आवाज होता. जटायू रामभक्त, शूर, पराक्रमी, आणि सद्वर्तनी होता. जटायूने रावण सीतेला आकाश रथातून पळवून नेत आहे हे बघितले. सीता आक्रोश करत होती. संकटात सापडलेल्या स्त्रीला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे हे जटायूला माहीत होते. जटायूने, रावणावर, हल्ला केला. तुंबळ युद्ध झाले. त्याने आपल्या चोचीने रावणाला हजारो जखमा केल्या. रावणाचा आकाश रथ मोडण्याचा प्रयत्न केला. पण रावणाने तलवार काढली आणि जटायूचे दोन्ही पंख छाटून टाकले. जटायूचे प्राण त्याच्या पंखात होते. पंख छाटले गेल्याने जटायू निष्प्रभ झाला. शक्तीहीन झाला. व जमिनीवर कोसळला. तो वेदनेने तळमळत होता. विव्हळत होता. कण्हत होता. जखमांमधून रक्ताच्या धारा वाहत होत्या. पण श्रीराम सीतेला शोधत येतील याची त्याला खात्री होती. श्रीरामांची भेट झाल्या झाल्या रावण सीतेला घेऊन आकाश मार्गे दक्षिण दिशेला गेल्याचे सांगितले. आणि मगच त्यानी श्रीरामांच्या हातात आपला प्राण सोडला. जटायूच्या बलिदानाने सीतेच्या शोधाला दिशा मिळाली आणि राम-लक्ष्मण सीतेला शोधायला दक्षिण दिशेला निघाले. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 20 – जटायूच्या बलिदानाने सीतेच्या शोधाला दिशा मिळाली. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 19 – सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीराम दिव्य धनुष्य घेऊन सोनेरी हरणाचा पाठलाग करू लागले. ते मायावी हरीण श्रीरामांना हुलकावणी देत खोलवर जंगलात लांब निघून जाई. श्रीरामांनी एकच तीक्ष्ण बाण त्या हरणावर सोडला. हरणाचे रूप घेतलेला मारीच राक्षस धाडकन जमिनीवर पडला. मारीच राक्षसाने पडता पडता श्रीरामाचा आवाज काढून लक्ष्मणा धाव रे मी मेलो. लक्ष्मणा धाव रे मी मेलो. लक्ष्मणा धाव रे मी मेलो. अशी आरोळी ठोकली. श्रीराम संकटात आहे हे ऐकून सीता घाबरली. भेदरली. तिने लक्ष्मणाला आज्ञा दिली. आत्ताच्या आत्ता श्रीरामांच्या मदतीला जा. लक्ष्मणाची सीतेला जंगलात एकटे सोडून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण कधी कधी स्वतःच्या इच्छेविरुद्ध वागावे लागते. लक्ष्मणाने जंगलात श्रीरामांच्या मदतीसाठी जाण्याचे ठरवले. लक्ष्मणाने श्रीरामांचे नाव घेऊन एका बाणाने पर्णकुटीच्या सभोवताली जमिनीवर एक रेषा काढली. आणि सीतेला सांगितले. ही लक्ष्मण रेषा आहे. तिच्या आत कोणी येऊ शकणार नाही. पण सीतेने ही लक्ष्मण रेषा ओलांडून जाऊ नये. बाहेर धोका आहे.लक्ष्मण रेषा म्हणजे नियम. सुरक्षेचे नियम कधीही मोडायचे नसतात. लहानपणी आई वडील नियम बनवतात. ते मुलांनी पाळायचे असतात. मोठेपणी आपले आपणच नियम पाळायचे असतात. ट्रॅफिक सिग्नल लाल झाल्यावर भर चौकातून गाडी दामटली तर ॲक्सीडेंट होणारच. लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा. ती कधीही ओलांडायची नसते. लक्ष्मण दूर गेलेला पाहून रावण एका साधूचे रूप घेऊन पर्णकुटी बाहेर भिक्षापात्र घेऊन आला. सीता भिक्षा द्यायला आली. पण ती काही लक्ष्मण रेषा ओलांडेना. तिथे लक्ष्मण रेषा आहे हे रावणाच्या लक्षात आले. त्यानी चक्कर येऊन पडल्याचे नाटक केले. मी भुकेने तळमळत आहे. माझ्या अंगात एकही पाऊल पुढे टाकायची शक्ती नाही. तूच माझ्यापर्यंत येऊन मला भिक्षा दे. असे रावणाने सीतेला सांगितले. भुकेने होणारी त्याची तडफड पाहून सीतेला त्याची दया आली. आणि ती साधूच्या रूपात आलेल्या रावणाला अन्न द्यायला पुढे आली. रावणाने तिचा हात एका झटक्यात पकडला. जबरदस्तीने आपल्या रथात ओढले. आणि आकाश मार्गाने लंकेकडे निघाला. घाबरून सीता आरडाओरडा करू लागली. तिची दयनीय अवस्था पाहून जंगलातले पशुपक्षीही ओरडू लागले. सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि तिचा घात झाला. दुष्ट राक्षस रावणाने डाव साधला, सीतेला पळवून नेले. सीतेचे अपहरण झाले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 19 – सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली Read Post »

Scroll to Top