रामायणाच्या गोष्टी

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 18 – सोनेरी हरणाचा मोह

श्रीराम श्रीराम श्रीराम ! नाक कान कापलेली रक्तबंबाळ शूर्पणखा राक्षसीण रडत ओरडत आपला सख्खा भाऊ रावण याच्याकडे गेली. बहिणीची विद्रूप आणि केविलवाणी अवस्था बघून रावण संतापाने लाल लाल झाला. शूर्पणखेने रावणाला सीतेच्या सौंदर्याचे रसभरीत वर्णन ऐकवले. रामाचा वध करून सीतेला पट्टराणी करण्याची प्रतिज्ञा रावणाने घेतली. शूर्पणखेने रावणाला सांगितले. राम महापराक्रमी आहे. त्यावर कपटी, बेसूर, हास्य करत रावण म्हणाला. जिथे, शक्तीचा उपयोग होत नाही तिथे कपट नीती वापरावी. छळ कपट करावे. सरळ साध्या माणसांची फसवणूक करावी. आणि आपला दुष्ट हेतू साध्य करून घ्यावा. रावणाला तर सीताच हवी होती. रावण मारीच राक्षसाला भेटला. मारीच राक्षसाला मायावी शक्तीने कोणतेही रूप घेता येत होते. रावणानी मारीचाला सांगितले. तू कांचन मृगाचे म्हणजे सोनेरी हरणाचे रूप घेऊन रामाच्या पर्णकुटीकडे जा. सोनेरी हरणाच्या मोहात पडून सीता रामाजवळ हट्ट करेल. राम तुझ्या मागे पळत येईल. आणि मी माझा डाव साधेन. मारीच राक्षसाला ते मान्य करणे भाग पडले. आणि तसेच झाले. सीतेला आपल्या पर्णकुटी जवळ एक सोनेरी हरीण फिरताना दिसले. त्या हरणाच्या सौंदर्याने सीतेला मोहित केले. सीतेला, ते हरिण खूपच आवडले. सीतेने रामाजवळ हट्ट केला. असे अद्वितीय सुंदर हरिण आपल्या अंगणात बागडत हवे. रामाने तिची समजूत काढायचा प्रयत्न केला. श्रीरामाला शंका आली. एखाद्या मायावी राक्षसाने सोनेरी हरणाचे रूप घेतले असावे. असे, सोनेरी हरीण पृथ्वीवर असूच शकत नाही. मृगजळाच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही. रखरखीत वाळवंटात दूरवर पाणी असल्याचा भास होणे म्हणजे मृगजळ. ते खरे नसते. त्याच्यामागे धावायचे नसते. पण सीता काही आपला हट्ट सोडेना. शेवटी श्रीरामांचा नाईलाज झाला. लक्ष्मणाला सीतेचे रक्षण करायला सांगून श्रीराम आपले दिव्य धनुष्यबाण घेऊन सोनेरी हरणाचा जंगलात पाठलाग करू लागले. राम लक्ष्मण सीता सोनेरी हरणाच्या मोहाच्या सापळ्यात पूर्णपणे अडकले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 18 – सोनेरी हरणाचा मोह Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 17 – लक्ष्मणानी शुर्पणखेचे नाक कापले

श्रीराम श्रीराम श्रीराम ! चित्रकूट पर्वतावरील पर्णकुटीत राम लक्ष्मण सीता राहतात हे अयोध्येच्या लोकांना कळले होते. वनवासाची प्रतिज्ञा पाळण्यासाठी, तिघेही चित्रकूट पर्वतावरून निबिड जंगलात निघाले. वाटेत त्यांना अत्री ऋषींचा आश्रम लागला. जवळच त्यांना एक मानवी हाडांचा म्हणजे माणसांच्या हाडांचा प्रचंड मोठा डोंगर दिसला. तो हाडांचा डोंगर अवाढव्य विराघ राक्षसाने मारलेल्या लोकांच्या हाडांचा निघाला. श्री रामाने एकाच बाणात त्याला यमसदनास पाठवले. म्हणजे मारून टाकले. जंगलातून मजल दरमजल करत राम लक्ष्मण सीता अगस्ती ऋषींच्या आश्रमात पोचले. तो आश्रम दंडकारण्यात होता. अगस्ती ऋषींनी भयाण उजाड आणि रुक्ष असा दंडकारण्याचा भूभाग पर्जन्यवृष्टी करून म्हणजे पाऊस पाडून झाडा फुलांनी बहरून टाकला. आणि दंडकारण्याचा प्रदेश सुपीक केला होता. अगस्ती ऋषींनी श्रीरामाला आत्ताच्या नाशिक जवळील पंचवटीचा मार्ग दाखवला. तिथे वास्तव्य करावे असे सुचवले. पण तो प्रदेश शुर्पणखा नावाच्या लांब लांब नखे असलेल्या एका राक्षसीचा होता. तिचे शरीर बेढब आणि रूप, अक्राळ विक्राळ होते. ती लंकेचा राजा रावण याची बहीण होती. श्रीराम व लक्ष्मणाचे, मोहक रूप बघून ती वेडीच झाली. तिने एक रामायणातील सुप्रसिद्ध असुरी हास्य केले. हॅ हॅ हॅ हॅ. हॅ हॅ हॅ हॅ. तिने एका सुंदर तरुण मुलीचे मायावी रूप घेतले. आणि रामाला लग्नासाठी मागणी घातली. पण रामानी सीतेकडे बोट दाखवून सांगितले ही माझी पत्नी आहे. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मग तिने, लक्ष्मणाला मागणी घातली. लक्ष्मणानी सांगितले मी रामाचा आजन्म सेवक आहे. माझ्याशी लग्न केले तर तुला जन्मभर रामाची दासी बनून राहावे लागेल. राम लक्ष्मण यांनी नकार दिल्याने शुर्पणखेला राग आला. तिनी आपल्या अजस्त्र हातानी एखादे फूल उचलतात तसे सीतेला उचलले. ते दृश्य बघून रामानी लक्ष्मणाला आज्ञा केली. लक्ष्मणा या दुष्ट शुर्पणखेचे नाक काप. लक्ष्मणानी तत्काळ आपली तलवार काढून एका झटक्यात शुर्पणखेचे नाक आकाशात उडवून लावले. रक्तबंबाळ शुर्पणखा रडत रडत आपला भाऊ रावण याच्याकडे राम-लक्ष्मण यांची तक्रार घेऊन गेली. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 17 – लक्ष्मणानी शुर्पणखेचे नाक कापले Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 16 – भरत भेटीची गोष्ट 

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीराम लक्ष्मण आणि सीता चित्रकूट पर्वतावर पर्णकुटीत राहत होते. श्रीराम वनवासात आहेत हे ऐकून. भरताला राग आला. वाईट वाटले. भरताचा आक्रोश ऐकून पाषाणालाही पाझर फुटला असता. भरत म्हणाला. “मला राजा होण्याची इच्छा नाही. मी आत्ताच वनात जाऊन माझ्या लाडक्या श्रीरामाला परत घेऊन येतो. सर्व ऋषींनी भरताचे कौतुक केले. ते म्हणाले “भरता तुझी कीर्ती जगभर पसरेल. श्रीरामाबरोबरच लोक तुझेही गुणगान करतील. तुझं भावावरील प्रेम भारतीय संस्कृतीचा मानबिंदू ठरेल. भरताने सर्व आचार्यांना नम्र भावाने वंदन केले. संपूर्ण कुटुंब मंत्रिमंडळ अयोध्या वासी आणि प्रचंड सैन्यासह चित्रकुटाच्या दिशेने निघाला. वाटेत अनेक अडथळे आले. पण तो थांबला नाही. चित्रकूट पर्वतावर श्रीरामांच्या पर्णकुटीत पोचला. धावत रामाच्या पाया पडला. रामाची भेट झाल्यामुळे त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तो म्हणाला “ श्रीरामा, अयोध्या तुझी वाट पाहतेय. तू परत ये राज्य सांभाळ.” रामाने भरताला प्रेमाने घट्ट आलिंगन दिले. मिठी मारली. आणि सांगितले वडिलांनी दिलेल्या आज्ञेचे पालन करणे हे माझं कर्तव्य आहे. मी परत येऊ शकत नाही. अयोध्येचा राज्यकारभार बघणे. हा तुझा राजधर्म आहे. मी माझे कर्तव्य पाळतो. तू तुझा राजधर्म पाळ. भरताने चंदनाच्या लाकडी पादुका म्हणजे चपला श्रीरामांसमोर ठेवल्या. आपल्या पायाचा स्पर्श या पादुकांना करा. त्यांचा मी राज्याभिषेक करीन. व आपला प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार सांभाळेन. असे भरताने श्रीरामांना सांगितले. भरताने त्या पादुका डोक्यावर घेतल्या. आणि तो अयोध्येला परत गेला. त्याने आयुष्यभर साधेपणा ठेवला. आपले आपल्या भावावरील निस्वार्थ प्रेम. कर्तव्य आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे भरत आणि राम यांचं आदर्श भावंडांचं नातं 14 हजार वर्षानंतर सुद्धा आजही भारतीय संस्कृतीमधे रुजलेलं आहे. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 16 – भरत भेटीची गोष्ट  Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 15 – श्रावण बाळाचा आणि राजा दशरथाचा मृत्यू.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीरामाच्या वनवासाने राजा दशरथाची परिस्थिती दयनीय झाली होती. श्री रामाच्या आठवणीने राजा दशरथ तळमळत होता. मंत्री सुमंत धीर देत होते. आधार देत होते. राजा, तू धार्मिक आहेस. चांगला शिकलेला विद्वान आहेस. धैर्यवान आणि शूरवीर आहेस. आयुष्यात चढ उतार येत असतात. अंधार आणि उजेड येत असतात. चांगल्या घटना, वाईट घटना, घडत असतात. सुख आणि दुःख येत असते. जात असते. तुझ्यासारख्या तपस्वी व्यक्तीने या परिस्थितीचा शांतपणे, सामना करायला हवा. राजा दशरथाला आठवले. श्रावण बाळाच्या अंध आई-वडिलांच्या शापामुळेच हे सगळे घडते आहे. एकदा राजा दशरथ जंगलात शिकारीला गेला होता. अंधार पडू लागला होता. राजाला नदीकाठाच्या दिशेने झुडपाच्या आड कुणीतरी जनावर पाणी पीत असल्याचा आवाज आला. राजाने मारलेला धनुष्याचा बाण लागून, “अगं आई ग, मेलो” असा आवाज ऐकू आला. धावत जाऊन राजाने पाहिले तर एका तरुणाच्या छातीत तो बाण घुसला होता. तरुण वेदनेने तळमळत होता. त्यानी सांगितले माझे नाव श्रावण आहे. माझे आई-वडील वृद्ध आणि अंध आहेत. मी त्यांना खांद्यावर कावडीत घेऊन चालत तीर्थयात्रेला निघालो आहे. ते तहानलेले आहेत. त्यांना हे पाणी प्यायला नेऊन दे. असे म्हणून तो गतप्राण झाला. राजा दशरथ श्रावण बाळाच्या वृद्ध आई-वडिलां जवळ आला. श्रावणाच्या मृत्यूची हृदय द्रावक हकीकत सांगितली. श्रावणाच्या आई-वडिलांनी दुःखानी टाहो फोडला. आणि मृत्यूशयेवर असतानाच राजा दशरथाला शाप दिला. “आमच्यासारखाच तुलाही मुलाच्या विरहानेच मृत्यू येईल”. राजा दशरथ म्हणाला, तो भयानक शाप आज खरा होणार आहे. राम… राम… राम… दशरथाच्या घशाला घरघर लागली. श्रीरामाच्या चैतन्यमयी मूर्तीचे ध्यान करत त्याने प्राण सोडला. त्याचे निधन झाले. तो स्वर्गवासी झाला. प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 15 – श्रावण बाळाचा आणि राजा दशरथाचा मृत्यू. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 14 – श्रीराम चित्रकूट पर्वताकडे निघाले.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! अयोध्येतील नागरिक नदीच्या तीरावर गाढ झोपले असतांना राम-लक्ष्मण सीता रथात बसून निघाले. सकाळ झाल्यावर लोकांच्या लक्षात आलं. आपल्या नशिबाला दोष देत सगळेजण आपापल्या घरी परतले. रथ गंगा नदीच्या तीरावर आला. श्रीराम लक्ष्मण सीता यांनी रथातून उतरून पवित्र गंगा नदीला नमन केले आणि गंगास्नान केले. आदिवासी राजा निषाद राज याला श्रीराम त्यांच्या राज्यात आला आहे हे कळले. राजा निषाद श्रीरामांचा निस्सीम भक्त होता. त्याने श्रीरामांना आपल्या राजवाड्यात राहण्याची विनंती केली. पण श्रीरामांनी नम्रपणे नकार दिला. माझे वडील राजा दशरथ यांनी मला, 14 वर्षे तपस्वी जीवन जगण्याची आज्ञा दिली आहे. आणि वडिलांच्या आज्ञेचे पालन मला करायचे आहे. असे सांगितले. श्रीरामांनी मंत्री सुमंत यांनासुद्धा परत जाऊन राजा दशरथ यांच्या मंत्र्याचे काम करावे. अशी विनंती केली. अत्यंत दुःखी अंतकरणाने मंत्री सुमंत परत गेले. राम लक्ष्मण सीता एखाद्या यात्रीकरू सारखे घनदाट जंगलातून प्रयाग गावी पोचले. गंगास्नान केल्यानंतर ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले. श्रीरामांना पाहून भारद्वाज ऋषींना खूप आनंद झाला. त्यांनी त्यांचे स्वागत केले. भारद्वाज ऋषी म्हणाले श्रीरामा तुझ्या येण्याने माझी तपश्चर्या ध्यानधारणा उपास आणि तीर्थयात्रा यांचे सार्थक झाले. माझी सर्व स्वप्ने पूर्ण झाली आहेत. भारद्वाज ऋषींच्या सूचनेवरून सुंदर आणि नीरव शांतता असलेल्या चित्रकूट पर्वतावर राहण्यासाठी राम लक्ष्मण आणि सीता प्रवासाला निघाले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 14 – श्रीराम चित्रकूट पर्वताकडे निघाले. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 13 – राम वनवासाला निघाले.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सर्वांचा निरोप घेऊन राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाले. रथ त्यांची वाटच पाहत होता. जनतेला अनावर, दुःख झाले होते. लोक धाय मोकलून रडत होते. एक प्रचंड जनसागर त्यांच्या रथाच्या मागून चालत निघाला. कुणालाच रामाला एकटं सोडायचे नव्हतं. सगळ्यांनाच रामाबरोबर वनवासात जायचे होते. रामानी हात जोडून सगळ्या लोकांना विनंती केली की त्यांनी परत जावं. कुणीही त्याचं ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. लहान मोठे स्त्री-पुरुष सगळे मागून चालत होते. रथ तमसा नदीच्या किनारी पोचला. रात्र झाल्याने रामाने प्रवास थांबवला व विश्रांती घ्यायचा निर्णय घेतला. बरोबर आलेला, जनसागर सुद्धा तिथेच थांबला. दुःखानी आणि चालून चालून थकल्याने सगळे लोक लगेच आजूबाजूला जमिनीवरच झोपी गेले. मध्यरात्री रामानी मंत्री सुमंत त्यांना उठवले आणि हळू आवाजात त्यांच्या कानात सांगितले. या बरोबर आलेल्या लोकांना आयोध्येत परत जावेच लागेल. तरच माझं कर्तव्य आणि माझं ध्येय पूर्ण होईल. कुणीही उठायच्या आत आपण रथात बसून आवाज न करता निघून जाऊ. सुमंतांनी तसेच केले झोपलेल्या बिचार्‍या श्रद्धाळू लोकांना सोडून रथ आवाज न करता शांतपणे जंगलाच्या दिशेने निघाला. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 13 – राम वनवासाला निघाले. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 12 – लक्ष्मणाचे बंधुप्रेम आणि वनवासाची तयारी.

श्रीराम, श्रीराम, श्रीराम ! रामाच्या वनवासाची बातमी ऐकून लक्ष्मणाला खूप राग आला. त्यानी रामाला सांगितले आपण अन्यायाविरुद्ध लढायला हवे. आपण तुझा राज्याभिषेक करू. कोण आडवे आले तर मी युद्ध करीन. पण रामानी ठामपणे सांगितले. लक्ष्मणा, शांत हो. परिस्थिती नाजूक आहे. हा रघुवंशाच्या सन्मानाचा व अभिमानाचा, प्रश्न आहे. वडिलांनी दिलेले वचन पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. मी माझ्या आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन करणार. राज मुकुटा पेक्षा मला कर्तव्य मोठे वाटते. लक्ष्मण म्हणाला असं असेल तर मी ही तुझ्याबरोबर वनवासात येणार. कुठल्याही परिस्थितीत मी तुझी साथ सोडणार नाही. रामाने ते मान्य केले. सितेनीही वनवासात रामाला सोबत करण्याचा हट्ट धरला. आणि तो रामाला मान्य करावा लागला. सगळे दुःखात होते. राजा दशरथ दुःखाने चक्कर येऊन पडला होता. त्यांनी रामाला विनंती केली की मला सोडून जाऊ नको रे. राणी कैकयीने मला दुष्ट पणे फसवले आहे. रामाने विनम्रपणे सांगितले की आयोध्या राजसत्ता राजेशाही जीवन याचा मला अजिबात मोह नाही. आता यापुढे वनवास आणि आदिवासी जीवन हेच माझ्या मालकीचं आहे दुष्ट कपटी मंथराने कैकेयीच्या मदतीने आधीच त्यागाचं प्रतीक असलेली भगवी वस्त्रे कैकयीच्या मदतीने आणून ठेवली होती. राम लक्ष्मण आणि सीता भगवी वस्त्रे घालून आपल्या कुटुंबाला आणि राजमहालाला सोडून जंगलात वनवासात जाण्यासाठी रथाच्या दिशेने निघाले. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 12 – लक्ष्मणाचे बंधुप्रेम आणि वनवासाची तयारी. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 11 – मंथरेचे विष आणि कैकेयीचा वर

श्रीराम, श्रीराम, श्रीराम! इकडे श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. सगळे आनंदात होते. पण तिकडे कैकेयीच्या महालात काही वेगळेच नाटक घडत होते. कैकेयीची दुष्ट दासी मंथरा कैकेयीच्या कानात विष ओतत होती. रामाच्या राज्याभिषेकाचा डाव उधळून टाकण्याची योजना तिच्या मनात पेरत होती. रामाचा राज्याभिषेक झाला की भरताला त्याचा गुलाम व्हावं लागेल. कौशल्या राजमाता होईल. कैकयीला दासी व्हावे व्हावे लागेल. मंथरेने कैकेयीच्या कानात विष ओतले. आणि कैकेयी तिच्या कारस्थानाला, बळी पडली. कैकेयिनी सगळे दागिने फेकून दिले. केस मोकळे सोडले. साधे, काळे, कपडे घातले. आणि ती रुसून बसली. राजा दशरथ कैकेयीच्या महालात आल्यावर समोरचे दृश्य बघून त्याला धक्काच बसला. रामाच्या राज्याभिषेका सारख्या मंगल प्रसंगी तू का नाराज आहेस. अनेक आढेवेढे घेऊन अनेक नाटकं करून कैकेयीने राजा दशरथाला हतबल केले. एका युद्धात, कैकेयीने राजा दशरथाचा जीव वाचवला होता. त्यावेळी दशरथाने तिला दोन वर दिले होते. त्याची आठवण तिनी करून दिली. राजा दशरथ म्हणाला सांग तुला काय देऊ. कैकेयी म्हणाली मग ऐका तर नीट लक्ष देऊन ऐका. पहिल्या वरानी उद्या माझ्या भरताला राज्याभिषेक करावा. आणि दुसऱ्या वराने रामाला वल्कले नेसून 14 वर्षे वनवासात पाठवावे. ते ऐकून दशरथाच्या तोंडून शब्दही फुटेना. राजा दशरथाने गयावया केली. पण कैकेयीने निक्षून सांगितले. माझ्या दोन्ही वरांची पूर्तता ही झालीच पाहिजे. दुष्ट कैकयीचा हट्टीपणा बघून राजा दशरथ राम राम म्हणत जमिनीवर कोसळला. बेशुद्ध झाला. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 11 – मंथरेचे विष आणि कैकेयीचा वर Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 10 – रामाच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला

श्रीराम, श्रीराम, श्रीराम! अयोध्येमध्ये आनंदी आनंद होता. राम लक्ष्मण राजा दशरथाला राज्यकारभारात मदत करत होते. पण, राजा दशरथाला, एक दिवशी जाणवले. आपण वृद्ध हो चाललो आहोत. म्हातारपण आलेले आहे. केस पांढरे झाले आहेत. आता, रामाच्या हाती, राजमुकुट सोपवून निवृत्त व्हायची वेळ आली आहे. आता तपश्चर्या करण्याची आणि देवपूजा करण्याची वेळ आलेली आहे. राजा दशरथाने गुरु वशिष्ठांचा सल्ला घेतला. गुरु वशिष्ठ म्हणाले राम एक उत्कृष्ट राजा होऊ शकेल. पण त्याला आधी राज दरबार, बोलवावा लागेल. सर्व मंत्र्यांना बोलवावं लागेल. त्यांची जनतेची प्रजाजनांची संमती घ्यावी लागेल. राजा दशरथाने दुसऱ्याच दिवशी दरबार बोलावला. आणि रामाला राज्याभिषेक करण्याचा आपला विचार सगळ्यां समोर मांडला. संपूर्ण राजदरबाराने एक मुखाने घोषणा केली. आम्ही सर्व जण तुमच्याशी सहमत आहोत. राजकुमार राम हा एक आदर्श  आहे.  दयाळू आहे. शूर आहे. शहाणा आहे. नीतिमान आहे. आम्हाला सर्वांना तो आवडतो. संपूर्ण राजदरबारात एक सुद्धा दरबारी रामाला राजा करण्याच्या विरोधात नव्हता. राजा दशरथाने रामाला बोलवून सांगितले की या दरबाराची इच्छा आहे की तू आता राज्यकारभार हाती घेऊन अयोध्येचा राजा व्हावे. जशी आपली आज्ञा प्रभू रामचंद्र म्हणाले. गुरु वशिष्ठांनी ग्रह नक्षत्रांचे गणित मांडून राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. रामाच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकून आयोध्या नगरवासी खुश झाले. ते त्यांचे स्वप्न होते. गुरु वशिष्ठांनी राम व सीतेला राजाची आणि राणीची कर्तव्ये समजून सांगितली. ते म्हणाले राजा होणे सोपे नाही. ते एक आव्हान आहे. राजा हा प्रजेचा मालक नसतो.  सेवक असतो. जनतेमधून आलेल्या मंत्रिमंडळाचे म्हणणे राजाने नेहमी लक्षात घ्यावे. दरबारातील लोकांकडे दुर्लक्ष करू नये. कारण तेच राजाचे डोळे असतात आणि कान असतात. राजाच्या मनात सर्वांविषयी दयाभाव हवा. न्याय गरिबांपर्यंत पोचायला हवा. युद्धात सैन्याचे नेतृत्व करायला हवे. सीतेलाही गुरु वशिष्ठांनी राणीची कर्तव्ये सांगितली. आणि शेवटी दोघांनाही मनापासून आशीर्वाद दिले. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 10 – रामाच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 9 – स्वयंवर झाले सीतेचे

श्रीराम, श्रीराम, श्रीराम! दुसऱ्या दिवशी, सकाळी सकाळी, विश्वामित्र, श्रीराम आणि लक्ष्मण, यांना घेऊन, स्वयंवर मंडपाकडे, निघाले.स्वयंवर मंडप माणसांनी फुलून गेला होता. पृथ्वीवरचे सर्व राजे तिथे हजर होते. काही राक्षसही राजाचे मायावी रूप घेऊन आले होते. त्यात लंकेचा राजा रावणही होता. श्रीरामाचे मोहक रूप पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. त्याचे चालणे, बोलणे, असणे सारेच आकर्षक आणि मनाला भुरळ पाडणारे होते. राम आणि लक्ष्मण यांच्यासाठी उच्चासने राखून ठेवली होती. पण, उच्चासनावर न बसता आपले गुरु विश्वामित्र ऋषी यांच्या पायाजवळ ते नम्रतेने बसले होते. राजा जनकाने स्वयंवरमाला घेऊन उभ्या असलेल्या सीतेजवळ येऊन जाहीर केले यज्ञाच्या वेदीवर एक शिवधनुष्य ठेवलेले आहे. हे धनुष्य भगवान शंकराकडून आले आहे. या प्रचंड शिव धनुष्याला वाकवून जो कोणी वीर प्रत्यंचा चढवील म्हणजे दोरी अडकवेल त्याला माझी जानकी स्वयंवर माला अर्पण करेल. एवढे मोठे धनुष्य बघून साऱ्या सभेत शांतता पसरली. बहुतेक राजांनी निराश होऊन मान खाली घातली. शेवटी एक राजपुत्र हिम्मत करून शिव धनुष्याजवळ गेला. पण ते प्रचंड धनुष्य त्याला जागचे हलवताही येईना. मान खाली घालून आपल्या जागेवर तो परत येऊन बसला. आणखी काही राजांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली पण कुणालाच ते जमले नाही. सगळ्यांची फजिती पाहून लगेच राजा रावण असुरी हास्य करत उठला आणि म्हणाला…………………. ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. स्वयंवर झाले सीतेचे.स्वयंवर झाले सीतेचे. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 9 – स्वयंवर झाले सीतेचे Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 8 – अहिल्या शिळा राघवे मुक्त केली.

श्रीराम, श्रीराम, श्रीराम! मिथिलेचा राजा जनक, याची मुलगी सीता, हिचे त्याने, स्वयंवर, करायचे ठरवले होते. स्वयंवराच्या अटी, पूर्ण करणाऱ्या, व सीतेला आवडणाऱ्या राजपुत्राशी, तिचे लग्न होणार होते. विश्वामित्र ऋषींना, त्यांचे निमंत्रण आले. विश्वामित्र ऋषींनी, राजा दशरथाची, परवानगी घेतली. आणि राम लक्ष्मण, यांना घेऊन, स्वयंवरासाठी निघाले. जंगलातून जात असताना, एका निर्मनुष्य ठिकाणी, राम लक्ष्मण यांना, एक झोपडी दिसली. त्या झोपडीमधे, एक दगडाची, मानवी मूर्ती होती. दोघांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी विश्वमित्र ऋषींना विचारले कुणाची आहे ही झोपडी, आणि ती दगडाची मूर्ती, कुणाची आहे. त्यांनी सांगितले, ही झोपडी गौतम ऋषी, यांची आहे. आणि ती दगडाची मूर्ती, गौतम ऋषींची पत्नी, अहिल्या, हिची आहे. गौतम ऋषींच्या, एका शापामुळे, तिची, दगडाची मूर्ती, झाली आहे. गौतम ऋषींची बायको, अहिल्या, ब्रह्मदेवाची मुलगी होती. ती अतिशय सुंदर होती. तिच्या सौंदर्यावर भाळून, मायावी शक्तीनी, ऋषी गौतम यांचे, रूप घेऊन. झोपडीत प्रवेश केला. स्वतःच्याच रूपातील, दुसरी व्यक्ती बघून, गौतम ऋषींचा राग, अनावर झाला. त्यांनी अहिल्येला, शाप दिला. आणि त्या, शापाचा परिणाम म्हणून, अहिल्येचे, दगडी मूर्तीत, रूपांतर झाले. पण त्यात, आपल्या पत्नीची, काहीच चूक नव्हती, हे त्यांच्या, लक्षात आले. त्यांनी, उ:शापही, दिला. जेव्हा केव्हा, श्रीरामांच्या, पवित्र पायाचा स्पर्श, या दगडाला होईल, त्यावेळेला तू, परत, मानवी रूपात येशील. विश्वामित्र ऋषींनी, आज्ञा दिली, की रामाने, आपला पवित्र पाय लावून, शिळा, म्हणजे दगड झालेल्या, अहिल्येचा उद्धार करावा. तिला शापातून मुक्ती द्यावी. रामाच्या, पवित्र पायाचा, स्पर्श होताच, त्या दगडातून, दिव्य स्वरूपात अहिल्या प्रकट झाली. तिनी अतिशय भक्ती भावाने, रामचंद्रांचे, पाय धरले. श्रीरामांच्या पायांवर, तिच्या अश्रूंचा, अभिषेक होत होता. ती आज, स्वतःला, धन्य समजत होती. भाग्यवान समजत होती. तिला प्रत्यक्ष श्रीरामांचे दर्शन झाले होते. तिनी त्यांचे, आशीर्वाद मागितले. ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 8 – अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. Read Post »

Children & Stories

रामायणाच्या गोष्टी 7 – राम लक्ष्मणांनी, सुबाहू, मारीच राक्षसांना व त्राटिका राक्षसिणिला संपवले.

श्रीराम, श्रीराम, श्रीराम! जंगलातल्या आश्रमाकडे जातांना, विश्वामित्र ऋषी, राम लक्ष्मणांना, राक्षस कसा त्रास देत आहेत हे वर्णन करून सांगत होते. अचानक ढगातून, गडगडाट व्हावा, असा आवाज आला. साऱ्या सृष्टीला, हादरवून सोडणारे, विकट हास्य करीत, एक अक्राळ विक्राळ, अजस्त्र राक्षसिण, त्यांचा रस्ता अडवून, उभी होती. ती विश्वामित्रांना म्हणाली. तुम्ही तुमच्या रक्षणासाठी, या कच्च्या-बच्चांना, आणलेत. मी तर यांना, केळ्यासारखं, खाऊन टाकीन. झडप घालून, अजस्त्र हाताने, ती रामाला, एक झापड मारणार, तोच विश्वामित्र म्हणाले. रामा, काळजी घे, हीच आहे ती, त्राटिका. तिचा हात, रामापर्यंत पोचायच्या आधीच, रामाच्या बाणानी, त्राटिकेचा, वेध घेतला. आणि ती क्षणार्धात खाली पडली. रामाने शौर्याने व कौशल्याने त्राटिकेला मारले. विश्वामित्र खुश झाले आणि म्हणाले. तुम्हा दोघांची निवड करण्यात माझी अजिबात चूक झाली नाही. माझी निवड अगदी योग्य होती. आश्रमात पोचल्यावर रामाने सांगितले गुरुवर्य आता आपण आपला यज्ञ निर्वेधपणे चालू ठेवू शकता. आम्ही दोघे भाऊ यज्ञाचे रक्षण करू. त्राटिकेच्या मृत्यूची बातमी ऐकून, तिचे दोघे राक्षस भाऊ, सुबाहू, आणि मारीच, रागाने वेडेपिसे झाले. इतर राक्षसांना घेऊन, ते तडक यज्ञाच्या जागी पोचले. यज्ञ सुरू झाला होता. ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. प्रभू श्रीरामचंद्र की जय.प्रभू श्रीरामचंद्र की जय.प्रभू श्रीरामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 7 – राम लक्ष्मणांनी, सुबाहू, मारीच राक्षसांना व त्राटिका राक्षसिणिला संपवले. Read Post »

Scroll to Top