Marathi

beach, yoga, sunset, silhouette, person, yoga pose, shore, seashore, sea, ocean, meditate, meditation, pose, balance, calm, nature, tranquil

योगशास्त्र शिक्षणाची नवी दिशा — बारामतीत बी.ए. (योग) व एम.ए. (योग) अभ्यासक्रम उपलब्ध

रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध महाराष्ट्र शासन व विद्यापीठ अनुदान परिषदेच्या (UGC) मान्यताप्राप्त कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्न बारामतीतील पहिल्या योग महाविद्यालयात शैक्षणिक वर्षापासून योगशास्त्र विषयातील बी.ए. (योग) आणि एम.ए. (योग) हे अभ्यासक्रम सुरू होत आहेत. हे अभ्यासक्रम जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ रूरल पेडियाट्रिक (बाल कल्याण केंद्र), बारामती यांच्या वतीने राबविले जाणार आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य टिकवण्यासाठी आणि निरामय जीवन जगण्यासाठी योगसाधनेची नितांत आवश्यकता आहे. योगशास्त्राचा उपयोग केवळ शारीरिक स्तरावर मर्यादित नसून तो मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावरही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे योगशास्त्राचा सर्वांगीण आणि सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती डॉ. अनिल मोकाशी यांनी दिली. आज संपूर्ण जग योगशास्त्राकडे एका चिकित्साशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहू लागले आहे. त्यामुळे भारतीय योगशास्त्राची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि शास्त्रांविषयी पाश्चात्त्य देशांमध्ये विशेष कुतूहल आहे. या पार्श्वभूमीवर योगविद्या, वेदशास्त्र आणि संस्कृत विषयांचे सखोल ज्ञान असलेल्या तज्ज्ञांची गरज वाढत आहे आणि ही गरज भविष्यात अधिकच वाढणार आहे. योगशास्त्र हे केवळ आसनांपुरते मर्यादित नाही; यापलीकडे योगाचा व्यापक आणि खोल आशय आहे. बारामतीसारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगशिक्षण उपलब्ध व्हावे आणि त्यातून सक्षम योगशिक्षक तयार होऊन त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करावे, या उद्देशाने हे योग महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती योगाचार्य डॉ. निलेश महाजन यांनी दिली. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध हॉस्पिटल्स, आरोग्य केंद्रे, जिम, वेलनेस सेंटर्स तसेच पंचतारांकित हॉटेल्समध्ये योगशिक्षक म्हणून संधी उपलब्ध होऊ शकते. याशिवाय स्वतःचा योगवर्ग किंवा योगा स्टुडिओ सुरू करण्याचीही संधी आहे. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषयाचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योगअध्यापक म्हणूनही नियुक्तीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. योगशास्त्र हे एक स्वतंत्र चिकित्सा शास्त्र म्हणून पुढे येत असल्याने आरोग्य क्षेत्रात कार्य व संशोधन करण्यासाठीही मोठा वाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भारत सरकारतर्फे योगशास्त्राच्या प्रचार व प्रसारासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे योगशास्त्राच्या प्रसाराला मोठी गती मिळाली आहे. योगशास्त्र या विषयामध्ये शैक्षणिक प्रगतीसोबतच स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधीही उपलब्ध आहे. त्यामुळे पारंपरिक पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणामध्ये बी.ए. (योग) व एम.ए. (योग) हे अभ्यासक्रम लाभदायक ठरू शकतात. प्रवेशासाठी पात्रता अशी माहिती योगतज्ज्ञ डॉ. भक्ती महाजन यांनी दिली.

योगशास्त्र शिक्षणाची नवी दिशा — बारामतीत बी.ए. (योग) व एम.ए. (योग) अभ्यासक्रम उपलब्ध Read Post »

Good Senior Couple

गोष्ट आम्हा दोघांची

जगावेगळ्या माणसाची आणि जगावेगळ्या लेखकाची ओळखसुद्धा जगाववेगळीच असायला हवी. नाही का? मी स्वतःबद्दल प्रथमपुरुषी प्रथमवचनी ओळख लिहायची असे ठरवले. म्हणून ही “लेखकाची ओळख : माझी गोष्ट, आमची गोष्ट”. अशी काही स्वलिखित पुस्तकात, स्वतःची गोष्ट लिहिण्याची प्रथा नाही. पण माझ्यासारखे आयुष्य जगण्याची तरी कुठे प्रथा आहे? मी जरा वेगळा, वेगळा, वेगळाच, (चौकट राजा) आहे, हे मला अगदी लवकरच, लहानपणीच समजलं होतं. मी माझं वेगळेपण ओळखल्यामुळे व जपल्यामुळेच माझी कारकीर्द घडली. यालाच इंग्लिश मध्ये ‘करिअर’ म्हणतात. करिअर म्हणजे शिक्षण किंवा व्यवसाय नाही. करिअर म्हणजे कारकीर्द. तुम्ही आयुष॒यात जे काही करता, ती कारकीर्द. कुणाचीही कारकीर्द १/३ स्वतः व्यक्तीवर, १/३ कुटुंबावर, आणि १/३ समाजावर, मित्र, शाळा, कॉलेज, सहकारी किंवा परिस्थितीवर अवलंबून असते. वयानुरूप आणि अनुभवानुरूप स्वतःचा विकास होत जातो. क्षमता वाढत जातात. आणि तुम्ही जास्त चांगलं काम करू लागता. बुद्धिमत्ता (आय क्यू) वाढत नाही. पण कामगिरी चांगली होत जाते. कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती काळानुसार आणि वेळेनुसार बदलती राहत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या कारकीर्दीला अनेक वळणे मिळत असतात. नव्या संधी व नव्या दिशा निर्माण होतात. हे काळा बरोबर स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला पालटण्याचे गणित मला फार चांगले जमले. मी 100 % बारामतीकर. आमची डॉक्टरकीची तिसरी पिढी. आता आमची चौथी पिढी सुद्धा डॉक्टर झालेली आहे. 75 वर्षाची वैद्यकीय व्यवसायाची परंपरा. माझे शिक्षण बारामतीत. लेखन, वाचन भाषण, नाटक, अभ्यास यात कायम पुढे. एमबीबीएस नागपूरला गव्हर्नमेंट मेडिकल मधे, डीसीएच सायन हॉस्पिटल मधे, एमडी, एफसीपीएस वाडिया चिल्ड्रन मधे. फेलो इंडियन अकॅडमी ऑफ पेडिॲट्रिक्स मुंबईमध्ये आणि पीएचडी पेडिॲट्रिक्स बालविकास व वाढ क्षेत्रात पुणे विद्यापीठात, बीजे मेडिकल, ससूनमधे. हे माझं शिक्षण. भरपूर ओपीडी. भरपूर इन डोअर. मस्त व्यवसाय. माझी पत्नी डॉक्टर माधुरी, सोलापूरची एमबीबीएस. डिलिव्हरी सिझर, बिझी. आणि माझ्यासारखा जगावेगळा माणूस आयुष्यभर सांभाळला. मुलगा गौतम ऑटोमोबाईल इंजिनियर. आमच्या बाल कल्याण केंद्र मतिमंद, मूकबधिर, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. माझी सून अंकिता आमच्याच की मूकबधिर शाळेमध्ये शिक्षिका. माझा नातू समिहन (१०), व नात कनक (२) हे दोन घटक आमचा वर्तमानकाळ व्यापून, भविष्यकाळातील कारकीर्द घडवत आहेत. अॅपटीट्युड टेस्ट, कल चाचण्या, आय क्यू टेस्ट म्हणजे कंपास पेटीतील सहा इंची पट्टीने १० एकर जमीन मोजण्यासारखं आहे. मला स्वतःला नाटकाची आवड. मी स्वतःला नाटकवाला मानतो. डॉक्टर झालो नसतो तर ॲक्टरच झालो असतो. अगणित नाटकात कामे केली. कॉलेज, विद्यापीठ, राज्य नाट्य महोत्सव, नाट्य साधना. विविध स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे. आम्ही नाटक घेऊन इंग्लंड अमेरिका कॅनडा प्रवास केला. गणेशोत्सवात, खेडोपाडी, साखर कारखान्यांवर, इरिगेशन कॉलनी मधे अनेक प्रयोग. मस्त मित्र परिवार. फुल एन्जॉय. पण एके दिवशी उपरती झाली. मला अमाप आनंद मिळायचा. पण कुटुंबाचा आणि समाजाचा त्यात काहीच फायदा होत नव्हता. जगाची लाईफस्टाईल वेगळी आणि नाटकवाल्यांची लाईफस्टाईल वेगळी. मॅच होईना. माझ्या आयुष्याच्या ध्येय धोरणात नाटक काही बसेना. माझं प्रथम कर्तव्य समोर येणाऱ्या आईच्या बाळाला सेवा देण्याचं आहे. त्यामुळे ठरवून जड अंतःकरणाने संपूर्ण नाट्यसंन्यास घेतला. नंतर सुरू झालं भाषणांचं युग. दुसरी तिसरीत असतांनाच आमचे दिक्षित गुरुजी नगरपरिषदेच्या सर्व शाळातून “बघा कसा घडाघडा सकाळ वाचतोय ते” असे सांगत फिरवून आणायचे. मग भाषणे, कथाकथन, नाट्यवाचन, वादविवाद स्पर्धा. माझी ओरेटरी जी बहरली ती आजयागायत पुरते आहे. मेडिकल असोसिएशन, महिला मंडळे, गणेशोत्सव, शाळा कॉलेजच्या स्नेहसंमेलनात, राज्यभर, देशभर, हजारो भाषणे. पंधरा-वीस वर्षे चालले ते प्रकरण. मजा आली. धमाल एन्जॉय केलं. पण समाजाचं त्यानी काय भलं होतंय, मोजमाप करता येईना. माझ्या मलाच नोंदीही करता येईनात. माझा बायोडाटा मात्र अधिकाधिक इम्प्रेसिव होत गेला. पण बायोडाटा मोठा करणे हे माझे आयुष्याचे उद्दिष्ट नव्हतेच. आणि एके दिवशी वेळेचा फार अपव्यय होतो या कारणास्तव मी भाषणे बंद केली. लेखनाचं क्षेत्र मात्र फार लाभी ठरलं. जर्नल, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, विशेष पुरवण्या शेकडो लेख छापून आले. येताहेत. अनेक लेख, विज्ञान कथा, पुस्तके. अनेक प्रकाशन संस्थांनी ती छापली. माझ्या प्रसिद्ध झालेल्या लेखनाची नुसती यादी द्यायची तरी दोन पाने लागतील. म्हणून मी त्या यादीला आणि मला मिळालेल्या असंख्य पुरस्कारांना संपूर्ण फाटा देतो.व्यवसाय सुरु करण्यापूर्वी डॉ.किरण शहा या माझ्या मित्राने “तुला किती उत्पन्न अपेक्षित आहे” असा प्रश्न विचारला. पहिल्याच महिन्यात अपेक्षेच्या पाचपट उत्पन्न झाले. त्यामुळे पैसे कमविण्यासाठी व्यवसाय कधी करावाच लागला नाही . व्यवसाय करत गेलो पैसे मिळत गेले . काका काकू (फॅमिली ॲडॉप्शन मुळे आई-वडील) डॉक्टर असल्याने व्यवसायाच्या पहिल्या दिवशीच हॉस्पिटल , कार , बंगला हजर होते . आई वडिलांनी सांगितले नाव कमव पैसे आपोआप मिळतील. मी व्यवसाय सुरू केला त्यावेळी (1978) तज्ञ सल्लागार ही संकल्पनाच समाजात नव्हती. इंजेक्शन नाही औषध नाही, मग पैसे कशाचे द्यायचे? असा प्रश्न असायचा. बिन इंजेक्शनचा व्यवसाय करायला फार मोठे धैर्य लागले. अगदी ‘एकला चालो रे’ किंवा महात्मा गांधींच्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ सारखे. आणि तो घेतला वसा मी आजवर (74) सोडला नाही. बारामतीच्या शंभर किलोमीटर परिसरात, पुणे सातारा नगर सोलापूर या चार जिल्ह्यांच्या मधल्या टापूत पंधरा वर्षे मी एकटाच बालरोग तज्ञ होतो. फुल मोनोपली. वैद्यकीय सत्ता. प्रवासाच्या सोयी नव्हत्या. अंधश्रद्धा, बाहेरचं, देवाचं, अशा अनेक अडचणी होत्या. समाज प्रबोधन हे वैद्यकीय सेवेपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. खेडोपाडी लोकांच्या सोयीसाठी विजिट करावी लागे. जी पी डॉक्टरांना देखील बालरोग तज्ञाची गरज समजून सांगावी लागे. तुम्ही सेप्ट्रान देता, आम्हीही सेप्ट्रान देतो. मग तुमची गरज काय? असा प्रश्न होता. पंधरा-वीस वर्षे ‘आठवडी बाजार करणारा’ देशातील मी एकमेव बालरोगतज्ञ असावा. खेडोपाडच्या आठवडी बाजारात, एखाद्या दवाखान्यात जाऊन, पेशंट बघायचे. ज्या गावात नवीन बालरोग तज्ञ येईल, त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात, ‘गावाची गरज भागली’ असे जाहीर करून विजिट बंद करायची. ही मोडस ऑपरंडी. त्यातही समाजसेवेपेक्षा व्यावसायिक दृष्टिकोनच जास्त होता. नामांकित, मानांकित होता येतं. हज्जारो ट्युबेकटोमी ऑपरेशनला असिस्ट करणारा बालरोगतज्ञ म्हणून माझा जागतिक विक्रम असेल. आधीची वीस वर्षं आईबरोबर, नंतरची वीस वर्षं बायकोबरोबर ! कौटुंबिक जबाबदारी. एकदा कौटुंबिक चर्चेत पुण्याचे डॉक्टर डी. बी. शिरोळे इतके ग्रेट का आहेत. त्यांच्यात असं काय स्पेशल आहे की सगळं जग त्यांचा आदर करतं, असा विषय निघाला. माझं असेसमेंट होतं, त्यांनी समाजाला गरज असताना, शेकडो बालरोगतज्ञ निर्माण करून, समाजाला दिले. ते नुसते व्यावसायिक होऊन पैसे गोळा करत बसले नाहीत. ते शिक्षक झाले. यातच त्यांच्या ग्रेटपणाचे रहस्य आहे. यावर माझ्या भावाचे उत्तर होतं “तुला कोणी सांगितलं तू शिक्षक होऊ नकोस म्हणून. तू शिक्षक हो.” आता बारामतीत राहून वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात शिक्षक होण्याचा मार्गच नव्हता. पण “जर्नल ऑफ रुरल पेडिॲट्रिक्स” काढून मी तो मार्ग शोधला. माझं जर्नल अमर्याद यशस्वी झालं. खेडोपाडी, राज्यभर, भारतभर, जगभर मला ओळख मिळाली. माझे विद्यार्थी निर्माण झाले बालआरोग्यक्षेत्रात बारामतीत मी अनेक गोष्टी पहिल्यांदा सुरू केल्या. लहान मुलांचा ईसीजी, इईजी, ऑडिओमेट्री, नवजात बालकांसाठी एनआयसीयु, अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या. त्यातच नवजात बाळाला कृत्रिम श्वास देणारे रिस्पिरेटर मशीन मी बारामतीत संशोधन करून बनवले. त्याचे ऑफिशियल सरकारी पेटंट मिळाले. देशभर हजार एक मशीन विकली. पण धंदा व्यवसाय करणे हे माझे आयुष्याचे उद्दिष्ट नसल्याने

गोष्ट आम्हा दोघांची Read Post »

Dr. Anil Mokashi

दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

#21 “दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे.”बापरे, बापरे! केवढा प्रचंड अर्थ ठासून भरलाय श्री समर्थ रामदास स्वामींच्या या एका वाक्यात! “दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे. अभ्यासे प्रकट व्हावे. नाही तरी झाकोनी असावे. नेमकचि बोलावे. तत्काळची प्रतिवचन द्यावे.” जसजसा या वाक्याचा अर्थ समजायला लागतो, तसतसे मेंदूतल्या ज्ञानाचे एकेक दालन उघडायला लागते. हे फक्त शाळेतल्या भिंतीवर लिहायचं ‘सुभाषित’ नाही, तर मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे, त्रिकालाबाधित सत्य आहे. लेखन आणि वाचनाचे आयुष्यातील अनुभव माझा मुलगा (३५) एक दिवस मला (७५) म्हणाला, “बाबा, अक्षर सुंदर दिसावं म्हणून तू एवढं महागडं, शंभर रुपयाचं, जाड टोकाचं रिफील का वापरतोस? परवडत नाही आता आपल्याला. आपली आर्थिक परिस्थिती बदललेली आहे. हॉस्पिटल बंद केलंय आपण. आणि तरीही तू रोज इतकी पानंच्या पानं लिहीत असतोस. ते वाचतंय तरी कोण?”उत्तरादाखल माझ्या जिभेवर “दिसामाजी काहीतरी…” आलं, पण मी मनाला आणि जिभेला ब्रेक लावला. दोस्त खात्यात हसण्यावारी नेलं. अस्थायी होतं राव ते! जाऊ दे. आपलं दुःख आपल्या जवळ. दुसऱ्याला काय सांगायचं! असंच एकदा तीस वर्षांपूर्वी, माझ्या बायको बाबतही झालं. मी चाळीशीतला सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ, आणि ती पस्तिशीतली सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ होती. त्याकाळची घटना. रात्री जेवल्यानंतर झोपताना, “अपंग क्षेत्रातील समस्या व उपाय” या माझ्या क्रांतिकारक, नव्या लेखाचा पहिला परिच्छेद पूर्ण वाचून दाखवण्याआधीच बायकोने, “बघू हो ते नंतर, झोपा आता गुपचूप. मला सकाळी सहाला सिझर आहे. आणि तुम्हालाही बाळासाठी यायचं आहे,” असं म्हणून मला पृथ्वीवर आणलं. माझ्या जिभेवर “दिसामाजी काहीतरी…” आलं, पण मी मनाला आणी जिभेला ब्रेक लावला. अस्थायी होतं राव ते वाक्य! जाऊ दे. आपलं दुःख आपल्या जवळ. दुसऱ्याला काय सांगायचं! त्या दिवशी मात्र मला “नॉर्मल” होण्याची गरज आहे, याचा साक्षात्कार झाला. सोशल मीडियाच्या युगात लेखनाची क्रांती बाकी देशाचं मला माहित नाही, पण “दिसामाजी काहीतरी” लिहिणाऱ्या जमातीला, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया आल्यापासून “अच्छे दिन आये है”. सुगीचे दिवस आले आहेत. आपले आपण अखंडीत लिहीत राहावे. सगळ्या ग्रुपवर सगळ्या लोकांना पोस्ट करत राहावे. कोणी वाचो न वाचो, आपल्याला काय त्याचे देणे घेणे? किती लोकांनी सोशल मीडियावर मला ब्लॉक केले असेल, मी कधी बघायच्या भानगडीतच पडलो नाही. आपल्याला काय त्याचे. लेखन-वाचन: आयुष्याची गुरुकिल्ली लेखन आणि वाचन या जीवनावश्यक कला आहेत. मी तिसरीत असतानाच आमच्या गुरुजींनी “बघा हा मुलगा, कसा घडाघडा ‘संपूर्ण सकाळ’ वाचून दाखवतो ते. शिका काही याच्याकडून,” असं म्हणून, मला नगरपालिकेच्या सर्व शाळांमधून फिरवून आणलं. तेंव्हापासून लागलेला ‘वाचनाच्या किड्याचा झूनॉटिक डिसीज’, क्रॉनिक होऊन आजवर टिकून आहे. तसंच लेखनाच्या बाबतीतही झालं. म.ए.सो. शाळेच्या बाईंनी, माझा “तुकोबाची पालखी” हा निबंध, संपूर्ण शाळेला वाचून काय दाखवला, त्यानंतर मी “दिसामाजी जन्मभर” लिहीतच राहिलो. व्यक्तिमत्त्व विकास हो, अती व्यक्तिमत्त्व विकास! मेडिकलला गेल्यावर तर इतर सगळ्याच ९९% बुद्धिमान मुलांवर मात करून, साधं पास व्हायचं असेल तरी, तेच तेच प्रकरण, अनेकदा वाचण्याशिवाय पर्यायच नव्हता. सगळे सहपाठी जेमतेम कसेबसे एकदा, मेटाकुटीला येऊन ‘नेल्सन टेक्स्टबुक ऑफ पेडिअॅट्रीक्स’ वाचायचे. मी तीन वर्षांत १३ वेळा ‘ए टू झेड’ वाचलं. प्रयत्नांती परमेश्वर! शास्त्रशुद्ध लेखन-वाचन कौशल्य वाचन-लेखन कौशल्ये पद्धतशीरपणे शिकवता येतात. ती निष्ठेने जोपासावी लागतात. वाचनाने आयुष्याची क्षितिजं रुंदावतात, तर लेखन मनाची सुस्पष्टता वाढवतं. एकूण काय तर वाचन लेखन मनन चिंतन अभ्यासात,सत्कारणी लावतो जो वेळ या दिनक्रमात. भाषणे चर्चा वादविवाद परिसंवादात,जो नाही पोकळ चमकोगिरी करीत. विषय आपला समजून घेतो आणि देतो,आनंदाने कष्टाने जो ज्ञानाच्या खोलात जातो. असा समर्पित ज्ञानाची लालसा असणारा,विद्यार्थी दाही दिशांत नावाजला जाणारा. लेखन वाचनाचा खजिना आहे हिताचा,वर्तमान काळाचा व ताकदवान मनाचा. प्रयत्न करावा अर्थ समजून घेण्याचा,जिव्हाळ्याचा चांगला विश्वासू माणूस होण्याचा. वागावे कसे जगावे कसे आपल्या या समाजात,आणावे वारंवार वाचनात व ऐकण्यात. ग्रंथ हेच गुरु आणि शिक्षक सदा साथीला,कळेल कशासाठी आलो आपण जन्माला. लेखन आणि वाचनाचा आनंद घ्या, कारण या सवयींमुळे आपण अधिक प्रगल्भ, अधिक सजग, आणि अधिक सृजनशील होतो. “दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे,” हे वाक्य फक्त वाचायचं नाही, तर आयुष्यात जगायचं आहे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे Read Post »

Dr. Anil Mokashi

मुलांसाठी सुंदर शिकवण: एकीचे बळ

#18 मुलांनो, आपण कधी विचार केला आहे का की एकत्र राहण्याचे किती फायदे असतात? याच विषयावर मी तुम्हाला एका शेतकऱ्याची मजेशीर आणि विचारप्रवर्तक गोष्ट सांगतो. या गोष्टीतून आपण खूप काही शिकू शकतो. शेतकऱ्याने आपल्या पाच मुलांना एकत्र येण्याची शिकवण दिली. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण वापरले – लाकडांच्या मोळीचे. तुम्हाला माहिती आहे का? ज्या काठ्या एकत्र बांधलेल्या होत्या, त्या कोणालाही मोडता आल्या नाहीत. पण, जशा त्या सुट्ट्या केल्या, प्रत्येक काठी मोडली गेली. हे दाखवतं की, जेव्हा आपण सगळे एकत्र राहतो, तेव्हा आपली ताकद वाढते. पण, एकटे राहिल्यास, आपण दुबळे होतो. तुम्हीही तुमच्या वर्गातील मित्रांसोबत, घरात, किंवा कुठेही असाल, नेहमी एकीने वागा. यामुळे केवळ तुमचे मैत्रीत चांगले नाते राहणार नाही, तर तुम्ही एकमेकांना संकटांतूनही बाहेर काढाल. Youtube Channel – Dr. Anil Mokashi व्हिडिओ बघा आणि मुलांसोबत चर्चा करा ही सुंदर शिकवण मी तुम्हाला एका गोष्टीतून समजावून दिली आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे बघा. यात मी स्वतः ही कथा सांगतोय. तुम्हालाही नक्की आवडेल, आणि ही शिकवण तुम्हाला रोजच्या आयुष्यात उपयोगी पडेल! बालवयातील शिक्षणासाठी आणि एकत्रीत सहकार्याच्या विचारांसाठी हा व्हिडिओ नक्की बघा! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मुलांसाठी सुंदर शिकवण: एकीचे बळ Read Post »

Children Sitting on Brown Chairs Inside the Classroom

शालेय सुरक्षा आता रामभरोसे सोडून चालणारच नाही.

#11 अपघात टाळता येतात. चुकून झालेच तर ते पद्धतशीरपणे हाताळावे लागतात. शाळेतील मुलांची सुरक्षा ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. ‘सगळेच जबाबदार’ म्हटल्यावर ‘कोणीच जबाबदार’ रहात नाही. जबाबदारी योग्य व्यक्तींना नेमून द्यावी लागते. व्यवस्थापनाने व मुख्याध्यापकांनी शाळेतील शिक्षकांपैकी एक ‘बाल सुरक्षा अधिकारी’ नेमावा. त्याने सुरक्षा नियम व व्यवस्थापन शिकून घ्यावे. आपली टीम बनवावी. तिचे नेतृत्व करावे. शाळा सुरक्षा अधिकारी, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, क्लास मॉनिटर या सर्वांनी मिळून एकत्रितपणे सुरक्षा हा विषय हाताळावा. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे सुरक्षा, प्रथमोपचार प्रशिक्षण आयोजित करावे. फक्त शाळेतीलच नाही तर घरातील, समाजातील, रस्त्यावरील, आरोग्याची सुरक्षा शिकवण्याची जबाबदारी घ्यावी. शाळेच्या प्रवेशद्वारावर जबाबदार कर्मचारी नेमावा. त्याने आलेला विद्यार्थी शिक्षकांच्या ताब्यात आणि जाणारा विद्यार्थी पालकांच्या ताब्यात देण्याचा नियम पाळावा. ताबा घेणाऱ्या पालक, पालक प्रतिनिधीची शाळेत नोंद असावी. परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष असावे. त्यांची नोंद असावी. अहवाल असावा. वाहनचालकांचे नाव, पत्ता, फोन नंबर, ओळखपत्राची शहानिशा व्हावी. शाळेची बस असेल तर कडक शिस्तीत नियमांचे पालन व्हावे. ताबा घेणे व ताबा देणे गंभीरपणे नोंदीसह करावे. शाळेच्या परिसरात, पटांगणावर मुले जबाबदार व्यक्तीच्या नजरेच्या टप्प्यात असावी. प्रथमोपचार पेटी असावी. घडणाऱ्या घटनांची लेखी नोंद असावी. घटनेचे तपशीलवार वर्णन असावे. साक्षिदारांच्या सह्या असाव्या. फलकावर इमर्जन्सी फोन नंबर असावे. शालेय सुरक्षा अधिकारी, मुख्याध्यापक, व्यवस्थापन, डॉक्टर्स, अॅम्बुलन्स, अग्निशामक, पोलीस इ. काही गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यास ठराविक डॉक्टर्सकडे नेण्यासाठी त्या डॉक्टर्स आणि सर्व पालकांची लेखी पूर्वसंमती घ्यावी. जवळपासचा डॉक्टर निवडावा. ‘डॉक्टरांची फी तसेच औषधोपचाराचा खर्च ही पालकांची जबाबदारी असेल’ अशी पालकांची पूर्वसंमती लेखी स्वरूपात घ्यावी. बाल शोषण ही एक गंभीर समस्या आहे. बाल शोषण ओळखणे, प्रतिबंध, उपाय यांचे नियोजन हवे. शोषण शारीरिक, लैंगिक, मानसिक किंवा दुर्लक्ष या स्वरूपात असू शकते. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मुलांशी येणारा ‘नजरेआड संपर्क’ टाळावा. अशा जागा व प्रसंग टाळावे. बाहेरून शाळेत येणाऱ्या कंत्राटी कामगारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी नेमून द्यावी. शारीरिक शिक्षा हा आता एक गुन्हा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. शिक्षेच्या भीतीने नाही तर कौतुकाच्या अपेक्षेने मुले चांगली वागतात. बाल शोषणाची लक्षणे आढळल्यास लगेच नोंद करावी. पालकांना, व्यवस्थापनाला लेखी स्वरूपात कळवावे. मानसिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. मुलांची भांडणे, दादागिरी, गुंडगिरी, रॅगिंग, व्यसने, अनैतिकता यांची हाताळणी कुशलतेने करावी. मी का मध्ये पडू? मला काय त्याचे? असा दृष्टिकोन एखादवेळी अंगलट येतो. अपंगांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. आत्तापर्यंत पालकांनी, शाळांनी, समाजाने व सरकारने या विषयाला हातच घातलेला नाही. भावी पिढीला रामभरोसे सोडून आता चालणारच नाही. कृती करावीच लागेल. आता चर्चा पुरे!  – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

शालेय सुरक्षा आता रामभरोसे सोडून चालणारच नाही. Read Post »

chikungunya

बा अदब बा मुलाहिजा, होशियार, सम्राट चिकनगुन्या आ रहे है !

#07 सर्व विषाणू जगताच्या सदस्यांना सम्राट चिकनगुन्याचा नमस्कार. आज आपण इथे महाराष्ट्र काबीज केल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत. त्या निमित्ताने आपण मानवजातीवर केलेल्या आक्रमणाचा, आपल्या तयारीचा आणि मानवजातीच्या तयारीचा आढावा घेणार आहोत. भारताबाबत “बारी अब कि, चिकनगुन्या कि” असा आपला नारा आहे. पण त्यासाठी आपल्याला रणनीती ठरवायला पाहिजे. आपण चिकनगुन्या, अल्फा प्रजातीतील आहोत. चीनमध्ये राज्य करणारे ओयांग मोयांग विषाणू आपले सख्खे भाऊबंद असून तेही अल्फाच आहेत. आर.एन.ए. कुलातील आपली चुलत शाखा म्हणजे एच.आय.व्ही., फ्लू आणि डेंगी. आपले डी.एन.ए. कुलातील जातीबांधव आहेत देवी, कांजिण्या व नागीण. आपण सगळे पूर्ण ताकदीनिशी आपापला साम्राज्यविस्तार करण्याच्या मागे आहोत. माणसाला वाटते पृथ्वीवर त्याचे राज्य आहे. माकडांना वाटते पृथ्वीवर त्यांचे राज्य आहे. पण खरं तर पृथ्वी आपली आहे. आपल्या सर्वश्रेष्ठ विषाणू जातीसाठी आपल्या संख्येच्या आधारावर पृथ्वीवर शंभर टक्के आरक्षण हे मिळवायलाच हवे. देवाची पण तीच इच्छा आहे. म्हणून तर देवाने आपल्या विषाणू समाजाला स्फोटक प्रजनन क्षमतेचे वरदान दिले आहे. अॅडीस इजिप्ती या डासांची नेमणूक देवाने आपले वाहन म्हणून केली आहे. त्यांच्या पोटात बसून आपण एका माणसापासून दुस-या माणसापर्यंत व असाच जगभर आपल्या विषाणूवृत्तीचा साम्राज्यप्रसार करतो. मी सम्राट चिकनगुन्या आज अॅडीस इजिप्ती डासांची आपल्या साम्राज्याचे “ऑफीशियल कॅरिअर” म्हणून जाहीर नेमणूक करतो. (प्रचंड टाळ्या, विषाणू हृदयसम्राट चीकुनगुण्याचा विजय असो, विजय असो, अशा आरोळ्या, तुता-या इ.इ.) आपल्या चिकुनगुन्या साम्राज्याची मुहूर्तमेढ आफ्रिका खंडातील टांझानिया देशात १९५२ साली झाली. त्यादिवशी श्रीमंत थोरले चिकुनगुन्या यांची पहिल्यांदा ओळख पटल्याची नोंद माणसाने केली आहे. तिथून सुरु झालेला आपल्या अश्वमेध रोखण्याची ताकद पृथ्वीवर कुणाचीही नाही. आपण अजिंक्य आहोत. आपण विश्वविजेते आहोत. १९६३ साली आपण कलकत्ता पार झेंडा फडकवला. २००५ पर्यन्त दक्षिण भारतातल्या दोन लाख माणसांच्या शरीरात आपण प्रवेश केला. २००६ मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, संपूर्ण मराठवाडा आणि ओरिसा सर् केले. आता आपली प्रजा सर्वत्र छान धुमाकूळ घालीत आहे. आपल्या चिकुनगुन्या नावाची एक स्टोरी आहे. चिकनचा आणि चिकुनगुन्याचा काही संबंध नाही हे स्पष्ट करतो. नाहीतर बिचारा पोल्ट्री उद्योग! फट म्हणता बंद पडायचा! आपण माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर तो पाठदुखीने (आपले मूळ स्थान, सगळ्यांनी नमस्कार करावा.) “मोकांडे” भाषेत वाकणे, वाकडे चालणा-याला  कुणगुण्या म्हणतात. त्यावरूनच आपलं चिकुनगुन्या हे समर्पक नाव पडले. मराठवाड्यातील लोक आपल्याला आकड्या म्हणून ओळखतात. १९५२ ते २००५ हा कालखंड आपल्यला फार खडतर व परीक्षेचा गेला. १९५२ मध्ये पृथ्वीवर आपल्या “फक्त दोनच सिटा” लागल्या. फक्त दोन देशात आपले अस्तित्व होते. आपण खूप धडपड केली. कधी विषाणूवाद, कधी समाजवाद, कधी इतर विषाणूंबरोबर सीट शेअरिंग. काही जमेना. पण २००५ मध्ये क्रांती झाली. आपल्या गुणसूत्रांमध्ये बदल घडून आला. आणि नेमकी त्याचवेळी भारतीयांची समूह प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) कमी झाली. चमत्कार झाला. दोन वरून उडी मारून आपल्या ३०० सिटा लागल्या. ३०० देशात आपले राज्य आले. आज या घडीला मला सांगायला आनंद होतो आहे कि, आपले मानवावरील आक्रमण यशस्वी झाले आहे. प्रचंड टाळ्या. २८ कारखान्यातील प्रत्येकी १२५ ट्रक भरून आणलेल्या विषाणूंच्या आरोळ्या. सम्राट चिकनगुन्या आगे बढो. हम तुम्हारे साथ है! येऊन येऊन येणार कोण, चिकनगुन्याच आणखी कोण? माझ्या विषाणू बांधवांनो, लक्षात ठेवा, आपली डी.एन.ए. जातीची चुलत बहीण सम्राज्ञी देवी (स्मॉल पॉक्स) एकेकाळी पृथ्वीवर राज्य करत होती. पण या, या माणसाने लस शोधून काढून तिच्या साम्राज्याचा नायनाट केला. तिचा सर्वनाश केला. तिला नामशेष केले. (शेम, शेम, आरोळ्या). आम्ही माणसाला त्रास देत असलो तर आम्ही त्याला मारून तर टाकीत नाही ना? चिकनगुन्या जीव घेणा नाही हे काय माणसाला माहित नाही? मग तो का आमच्या विरुद्ध कट कारस्थाने करतो? आपण शरीरात गेल्यावर माणसाला थंडी तापून ताप येतो. अंगावर पुरळ येते, अंग दुखते, सांधे दुखतात, डोके दुखते, डोळे दुखतात, डोळे लाल होतात, प्रकाश सहन होत नाही. काही लहान मुलांना झटके येवू शकतात. हिरड्यातून थोडेसे रक्त येऊ शकते. एक दोन आठवड्यातच रुग्ण पूर्णपणे बरा होतो. क्वचितच काही जणांना बरीच वर्षे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. माझ्या चिकनगुन्या बांधवानो, अंतिम यशासाठी माझी विनंती आहे कि ”एक व्हा” संघटीत व्हा. लाखोंच्या संख्येने मानवावर आक्रमण करा. आर.एन.ए. विषाणूंच्या सर्व प्रजातींच्या एकीचे बळ जाणा. ही एकी नेतृत्वासाठी नको. कार्यासाठी हवी. आपापले स्वतंत्र अस्तित्व ठेऊनही सीट शेअरिंग होऊ शकते. आपल्या व डेंगीच्या युतीचा परिणामकारक अनुभव लक्षात ठेवा. अॅडीस इजिप्ती हे डेंगी साम्राज्याचेही ऑफिशियल कॅरिअर आहे. डेंगीबरोबरच चिकनगुन्यांनी डासांच्या पोटात सीट शेअरिंग केल्यामुळे एकाचवेळी चिकनगुन्या व डेंगी होऊ शकतो. अतिरक्तस्त्रावाचे संहारक शस्त्र या युतीमुळेच आपल्याला मिळाले आहे याची जाणीव ठेवा. युती आघाडीच्या जमान्यात १२५ वर्षाचे ढोल निरुपयोगी ठरतात. जमिनीवरील बेरजाच उपयुक्त ठरतात. माणसांनी चिकनगुन्या विरुद्धच्या लढाईत आखलेली रणनीती समजावून घ्या. त्याप्रमाणे आपली धोरणे आखा. माणसाने आपल्या विरुद्ध त्रिसूत्रि कार्यक्रम आखला आहे. १. निदान २. उपचार ३.  प्रतिबंध. मित्रांनो माणसाच्या या वैज्ञानिक प्रगतीने घाबरून जाण्याचे काही कारण नाही. नाण्याला दुसरीही बाजू असते. चिकनगुन्याचे तत्काळ निदान करणारे तंत्र अजून माणसाला अवगत झाले नाही. आज घडीला पूर्ण भारतातले सँम्पल पुण्याच्या नॅशनल इनस्टिटयूट ऑफ व्हॉयरॉलॉजीत पाठवावे लागतात. तेवढया कालावधीत आपण पुढच्या राज्यात जाऊन पण पोहचतो. आणि भारतीय समाजाची बेफिकिरी सुध्दा आपल्याच पथ्यावर पडते आहे. जोपर्यंत भारतातील मिडिया आपल्या बाजूनी आहेत तोवर काळजी करण्याचे कारण नाही. मेडिया समाजाला खेळवून, आपल्या साम्राज्य वाढीकडे दुर्लक्ष करायला लावून, आपल्यालाच मदत करतो आहे. त्यांचा या मदतीसाठी मी बेस्ट चॅनेल, बेस्ट वृत्तपत्र, बेस्ट मासिक अशा विविध पुरस्कारांची मालिकाच जाहीर करीत आहे. जय चिकनगुन्या, जय अल्फा, जय आर.एन.ए. जय विषाणू, बा अदब बा मुलाहिजा होशियार, सम्राट चिकुनगुन्या आ रहे है l – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बा अदब बा मुलाहिजा, होशियार, सम्राट चिकनगुन्या आ रहे है ! Read Post »

Scroll to Top