Story

BKK Staff

मी आणि माझी शाळा

मी आणि माझी शाळा. शाळा म्हणजे फक्त एक इमारत, चार भिंती, जमीन, साहित्य, लाईट, पाणी, शासनमान्यता, अनुदान नाही. संस्था माणसांनीच बनते. आज आपल्या शाळेत जवळजवळ 60 जण काम करत आहेत, 500 मुले शिकत आहेत. त्यांचे कुटुंबीय धरले. तर दैनंदिन जीवनात शाळेशी हजाराहून जास्त माणसांचा संबंध येतो. शाळा ही एक जिवंत समाजव्यवस्था आहे. Ecosystem, परिसंस्था आहे. आपलं काम शिक्षण सेवा क्षेत्रात मोडतं. हे सर्विस इंडस्ट्री. मानवी विकास हा आपल्या कर्तव्याचा गाभा. म्हणून विद्यार्थी केंद्रितता महत्वाची ठरते. आधी विद्यार्थी, मग पालक,मग स्टाफ, आणि मग व्यवस्थापन, संस्थाचालक. ही खरी सेवा साखळी आहे. उलटी साखळी नाही चालत नाही. संस्थेची यशस्वी वाटचाल ही फक्त बांधकाम, भौतिक सुविधा, परवाने, अभ्यासक्रम यावर अवलंबून नसते. ती अवलंबून असते — संघभावनेवर. विश्वासावर. संवादावर. आणि सुस्पष्ट कार्यपद्धतीवर. नियम, नियमावली, कार्यपद्धती या शब्दांकडे सूचना” म्हणून न पाहता “सहकार्याची चौकट” म्हणून पाहणं आवश्यक आहे. कधीकधी नियम बंधनकारक वाटतात. बदल समजून घेतला, तर तोच बदल सुरक्षेचा आधार ठरतो. उदा. कागदोपत्री पुरावा, फोटो, मंथली रिपोर्ट. संस्थेच्या वाटचालीत स्थळ काळ वेळेप्रमाणे नवीन निर्णय, नवीन कार्यपद्धती स्वीकाराव्या लागतात. आधी छान चाललं होतं ना? मग बदल कशाला?” असं वाटतं. बदल नेहमीच जड जातात. पण तो हिताचा बदल आवश्यकही असतो. बदलाची मानसिक तयारी असावी. आजचा विद्यार्थी, आजचा पालक, आजचा समाज – या सगळ्यात सतत बदल घडतोय.आपण जुन्या चौकटीत अडकून राहिलो, तर प्रगती खुंटणार. म्हणूनच कार्यपद्धतीचे नियम, बदल दडपण आणण्यासाठी नसतात. स्पष्टता, पारदर्शकता, समन्वय आणि सुधारणेसाठी असतात. संस्था उभी राहते जमिनीवर, इमारतीवर, पण चालते, टिकते ती आपापसातल्या संबंधावर, नात्यांवर. नियमांची चौकट ही आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. धन्यवाद! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मी आणि माझी शाळा Read Post »

हर्षवर्धन, ह्युएनत्संग आणि बुद्ध सर्किट पर्यटन.

हर्षवर्धन, ह्युएनत्संग आणि बुद्ध सर्किट पर्यटन. एक होता राजा – हर्षवर्धन. विद्वान, शांत, उदार राजा.त्याचं साम्राज्य अफाट होतं. पण ते त्यानी तलवारीने नाही, तर ज्ञान, धर्म आणि प्रेमानी जिंकलं होतं. राजा कविता करायचा, विचारवंतांचा सल्ला ऐकायचा,तो शिवभक्त होता. तो गौतम बुद्धाचाही चाहता होता.सगळ्या धर्मांचा आदर करणारा – असा हा सम्राट! त्याच काळात चीनमधून ह्युएनत्संग नावाचा एक बौद्ध भिक्षू भारतात आला.पायात चप्पल नाही, खांद्यावर झोळी…वाळवंटं पार केली, डोंगर चढला – कारण त्याला पाहायचा होता बुद्धाचा देश! जिथे गौतम बुद्ध जन्मला. वावरला. त्याला समजलं, भारतामधला धर्म पुस्तकी नाही. धर्म लोकांच्या मनात, रोजच्या जीवनात आहे. इथले लोक धर्म जगतात. नम्रतेनं, प्रेमानं! ह्युएनत्संगने हर्षवर्धनला भेट दिली.राजाने प्रयाग आणि कनोज येथे मोठ्या धर्मसभा भरवल्या.हजारो बौद्ध, जैन, सनातन विचारवंत एकत्र बसले.“धर्म म्हणजे भांडण नाही, तो सहवास आहे!” – हे शिकवलं गेलं. ह्युएनत्संग भारावून गेला.भारताच्या विकसित संस्कृतीचं त्यानी “सी-यू-की” या त्याच्या पुस्तकात वर्णन केलं आहे.त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीची ओळख जगभर पोचली. आजही तोच विचार पुढे चालतो आहे.भारत सरकारने ‘बुद्ध सर्किट’ नावाचा एक सुंदर पर्यटन मार्ग तयार केला आहे.गौतम बुद्धाच्या जीवनाशी संबंधित स्थळं एकमेकांशी जोडली आहेत –लुंबिनी, बोधगया, सारनाथ, कुशीनगर… हजारो लोक त्या पवित्र जागांवर जातात. नतमस्तक होतात.बुद्धाच्या पावलांवर पाऊल ठेवतात. भारताचा अनुभव घेतात. “इतिहासाची वाट चालणारे हे पाय… उद्याच्या पर्यटनामुळे संपन्न झालेल्या भारताचं रूपडं बदलत आहेत.” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

हर्षवर्धन, ह्युएनत्संग आणि बुद्ध सर्किट पर्यटन. Read Post »

Vikram Vetal

विक्रम वेताळ गोष्टीतला आणि खरा राजा विक्रमादित्य

विक्रम वेताळ गोष्टीतला आणि खरा राजा विक्रमादित्य मुलांनो, मी आता काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मोठ्याने, एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. तयार? तहान लागते तेव्हा काय पिता? – पाणी! विहिरीत काय असतं? – पाणी. समुद्रात काय असतं? – पाणी. नदीत काय असतं? – पाणी. पावसातून काय पडतं? – पाणी. बर्फ वितळला की त्याचं काय होतं? – पाणी. किती छान! कुठलाही प्रश्न विचारला, तर तुमचं उत्तर एकच – पाणी. आता मला सांगा. साखर चवीला कशी लागते? – गोडमीठ चवीला कसे लागते? – खारट. मिरची चवीला कशी लागते? – तिखट. लिंबू चवीला कसे लागते? – आंबट. आवळा चवीला कसा लागतो? – तुरटम्हणा – तुरट! चपाती कशाची करतात? गव्हाची. भाकरी कशाची करतात? ज्वारीची-बाजरीचीभात कशाचा करतात? तांदळाचा. वरण कशाचं करतात? डाळीचं. बघितलं का. प्रश्न विचारला, की विचार करावा लागतो. विचार केला की उत्तर मिळतं. उत्तर मिळालं की आपण हुशार, संशोधक होतो. विक्रम-वेताळाच्या गोष्टीतला विक्रम पौराणिक आहे. म्हणजे गोष्टीतला. एकदा राजा विक्रम, वेताळाला खांद्यावर घेऊन चालला होता. वेताळ रोज एक गोष्ट सांगायचा, आणि शेवटी एक प्रश्न विचारायचा. दोन राजे जंगलातून चालले होते. समोर एक आदिवासी मुलगी डोक्यावर लाकडांची मोळी घेऊन चालली होती.अचानक समोर आला एक उपाशी वाघ! पहिल्या राजाने तलवारीचे सपासप वार करून वाघ ठार मारला. दुसऱ्याने त्या मुलीला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले.आणि तिला तिच्या घरी, आई वडिलांकडे पोचवले. ती निघाली एक हरवलेली राजकन्या! वेताळाने विचारलं. तिने लग्न कोणाशी करावं? वाघाशी लढणाऱ्या शूरवीराशी, की तिला सुरक्षित ठेवणाऱ्या आधारवडाशी? राजा विक्रम म्हणाला –“शौर्य महत्त्वाचं, पण माणुसकी त्याहून मोठी. आधार देणारा राजा श्रेष्ठ!” वेताळ हसला. उत्तर बरोबर होतं. आणि वेताळ नेहमीप्रमाणे पुन्हा वडाच्या झाडावर उलटा लोंबकळू लागला हे झालं गोष्टीतलं. पण इतिहासातही एक विक्रमादित्य होऊन गेला. सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य! छत्रपती शिवरायांच्या १५०० वर्षे आधीचा राजा. त्याच्या दरबारात होती नवरत्ने. विद्वान, गायक, साहित्यिक, विचारवंत. त्याने सुराज्य दिलं. आणि आजच्या भारतीय संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली. एकदा एका गरीब शेतकऱ्याची गाय चोरीला गेली. शेजारी म्हणाला, “ही गाय माझी आहे. “प्रकरण गेलं राजाकडे. राजाने दोघांनाही गायीसमोर उभं केलं आणि गायीला हाक मारून बोलवायला सांगितलं. गाय सरळ गेली शेतकऱ्याकडे. त्याच्या अंगाला डोकं घासू लागली. प्रेम दाखवू लागली. राजा म्हणाला –”गायीला फसवता येत नाही. तिला सत्य कळतं.” राजानी गाय दिली शेतकऱ्याला. आणि दंड केला शेजाऱ्याला. हेच खरं न्यायाचे राज्य! राजा विक्रमादित्याने भारतीय संस्कृतीची पायाभरणी केली. जय हिंद!जय महाराष्ट्र! भारतमाताकी जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

विक्रम वेताळ गोष्टीतला आणि खरा राजा विक्रमादित्य Read Post »

Chakradhar Swami

जात ही मनात असते, रक्तात नसते

जात ही मनात असते, रक्तात नसते” – श्रीचक्रधर स्वामी भारतात सगळीकडे सुलतानी राजवटी होत्या. समाजात जातीपातीचं विष जाणूनबुजून पेरलेलं होतं. समाज पिचलेला होता आणि शासक मस्तवाल झाले होते. अशा काळया कालखंडात शिवाजी महाराजांच्या सुमारे ३५० वर्षे आधी श्रीचक्रधर स्वामी, गुजरातहून महाराष्ट्रात आले. त्यांनी विखुरलेला समाज एकसंघ करण्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती केली.‘सर्व जीव समान’ असा संदेश देऊन प्रत्येक माणसात असलेल्या देवाची जाणीव करून दिली. एका गावात, एका सकाळी, मंदिराच्या पायऱ्यांवर श्रीचक्रधर स्वामी शांत बसले होते. ते बसले की सकाळही शांत होत असते. तेवढ्यात काही लहान मुले धावत आली. स्वामींच्या भोवताली गोल रिंगण करून बसली. कुणी टिवल्या बावल्या करत होतं. कुणी खोड्या करत होतं. कुणी गोळ्या चघळत होतं. त्यातला एक धिटूकला मुलगा पुढे आला. आणि म्हणाला. “स्वामी तुम्ही कोणत्या जातीचे?” स्वामी थोडं हसले. म्हणाले, “माझी जात? अहो मलाच माहित नाही! मी फक्त माणूस आहे. आणि तू? तू कोण आहेस?” मुलगा थोडा गोंधळला… पण मग त्याचा चेहरा उजळला. “मी पण माणूस! तुम्ही पण माणूस, मी पण माणूस! ” तो म्हणाला. स्वामी हसले, म्हणाले –“जात ही मनात असते, रक्तात नाही. मन स्वच्छ ठेवलं, तर देव आपल्या जवळ येतो!” मुलांना पटलं. मुलांच्या मनातली जात गेली. त्यांच्यातली माणुसकी जागी झाली. त्यांनी आपापल्या घरी जाऊन सांगितलं. “जात ही मनात असते, रक्तात नसते”. सगळ्या गावाला ते पटलं. शाळेच्या फळ्यावर दुसऱ्या दिवशी सुविचार लिहिला गेला. “जात ही मनात असते, रक्तात नसते. मुलांना जातीद्वेष शिकवू नका!” ही गोष्ट सगळीकडे पसरली,ती शाळा आदर्श शाळा झाली. ते गाव आदर्श गाव झालं. श्रीचक्रधर स्वामींवरील‘लीळाचरित्र’ हे पहिलं मराठी पुस्तक ठरलं. त्यांनी उच्च –नीच, जाती–पातीच्या भिंती पाडल्या. माणूसकीचं राज्य महाराष्ट्रात आणलं. जात मनात असते, रक्तात नाही. मुलांना जातीद्वेष शिकवू नाही. सर्व जीव एक समान,नसावा द्वेष, नसावा मान!प्रत्येकात देव पाहावा,महानुभाव पंथ घडवावा श्रीचक्रधरस्वामींचा सांगावा! जय श्रीचक्रधरस्वामी.जय शिवाजी.जय महाराष्ट्र.जय हिंद.भारत माता की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

जात ही मनात असते, रक्तात नसते Read Post »

Samrat Ashoka

सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज.

सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज. २३०० वर्षांपूर्वी मौर्य घराण्यात एक राजा झाला. अशोक. लहानपणी अशोक खूप हट्टी, चिडखोर, आक्रस्ताळा, धटिंगट, दांडगट आणि रागीट होता. त्याचे खेळ म्हणजे युद्ध, तलवार. सम्राटाचा मुलगा असल्यामुळे मोठा झाल्यावर तो वंशपरंपरागत, आपोआप, सम्राट झाला. संपूर्ण भारतावर त्याचं राज्य होतं. पण एक राज्य उरलं होतं – कलिंग. मोठा समुद्रकिनारा, सुजलाम सुफलाम जमीन. कष्टाळू माणसे. कलिंग म्हणजे आजच्या भारताचा ओरिसा. अशोकाने ठरवलं – “कलिंग जिंकलंच पाहिजे! “त्यानी एक भीषण युद्ध छेडलं. कलिंग युद्ध. तलवारी, कापाकापी, धनुष्यबाण, रक्त, मृत्यू… सर्वत्र हाहाकार! लाखो लोक मारले गेले, घरं जळाली, कुटुंबं उध्वस्त झाली. वाताहात झाली. राजा अशोक विजय साजरा करायला वाजत गाजत युद्धभूमीवर गेला… पण तिथे फटाके नव्हते. तिथे होते रक्ताचे थारोळे. आणि रडणारे लोक. सगळीकडे मृतदेह, आरडाओरडा, रडारड, आक्रोश आणि दुःखाचे डोंगर. युद्ध जिंकलं… पण अशोकाला समाधान नव्हतं. मनात आनंद नव्हता. काहीतरी चुकतंय असं त्याला आतून वाटत होतं. तेवढ्यात एक लहानगी मुलगी, रक्ताने माखलेल्या आपल्या मरण पावलेल्या वडिलांच्याकलेवराला घट्ट मिठी मारून हमसून हमसून रडत होती. ते हृदय द्रावक दृश्य बघून अशोकाचं काळीज हेलावून गेलं. त्याला प्रश्न पडला. “मी हे काय केलं? का केलं? कशासाठी केलं? या युद्धातून मला काय मिळालं?” त्या क्षणी अशोकाच्या मनात मोठ्ठा बदल झाला. चूक काय आणि बरोबर काय, हे त्याला बरोबर उमगलं. त्याला बोध झाला. अशोकाला उपरती झाली. अचानक त्याच्या मनात गौतम बुद्धांच्या बोधिसत्वाची आणि त्यांना झालेल्या बोधाची आठवण आली. त्याला मार्ग सापडला. बौद्ध धर्माचा. गौतम बुद्धांचा शांतीमार्ग, करुणा आणि नीतीने भरलेला.” त्यानी ठरवलं. ही वेळ युद्धाची नाही… बुद्धाची आहे! त्याने तलवार बाजूला ठेवली. बौद्ध धर्म, माणुसकी, सहिष्णुता – हे त्याचं नवं शस्त्र झालं. आधी तो स्वतःला देशाचा आणि जनतेचा मालक समजत होता. आता त्यानी देशाचा आणि जनतेचा सेवक बनायचे ठरवले. त्याने सर्व लोकांना प्रेमाने वागवायला सुरुवात केली. गरीब, आजारी, वृद्ध – सगळ्यांची तो काळजी घेत असे. प्रजेसाठी रस्ते, विहिरी, रुग्णालयं, धर्मशाळा बांधली. शिलालेखांमधून त्याने सांगितलं दयेमधेच खरी ताकद असते. त्याने गौतम बुद्धांचा संदेश श्रीलंका, भूतान, नेपाळ, म्यानमार, अफगाणिस्तान, जगभर पोचवला. आणि तो झाला भारतीय इतिहासातला पहिला धर्मराज. धर्माचे रक्षण करणारा. आपले शिवाजी महाराज देखील म्हणायचे “देव धर्म आणि देशासाठी, प्राण वेचलं आम्ही”. सम्राट अशोक म्हणायचा “लोकांना तलवारीच्या जोरावर नाही प्रेमाच्या जोरावर जिंकायचे असते” उत्तर प्रदेश राज्यात, वाराणसी जिल्ह्यात, वाराणसी म्हणजे पूर्वीचे “काशी”. सारनाथ या गावात गौतम बुद्धांनी पहिलं धर्मचक्र प्रवर्तन (धम्मचक्र प्रवर्तन) केलं होतं. प्रवर्तन केलं. म्हणजे त्यांनी धर्मशिक्षण सुरू केलं. गौतम बुद्धांच्या उपदेशामुळे समाजात परिवर्तन घडलं. परिवर्तन घडलं म्हणजे लोकांच्या विचारात आणि जीवनशैलीत बदल झाला. सम्राट अशोकाने तिथे एक मोठा सिंहस्तंभ बांधला. आजही तो उभा आहे. त्या सिंहस्तंभावरचं अशोक चक्र आपल्या राष्ट्रध्वजावर, तिरंग्यावर आहे. ते आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. आपल्या परंपरेचं प्रतीक आहे. म्हणूनच “सम्राट अशोक: युद्धाकडून बुद्धाकडे नेणारा धर्मराज” ठरला. जय महाराष्ट्रजय हिंदभारत माता की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज. Read Post »

Scroll to Top