श्रीराम, श्रीराम, श्रीराम!
इकडे श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. सगळे आनंदात होते.
पण तिकडे कैकेयीच्या महालात काही वेगळेच नाटक घडत होते. कैकेयीची दुष्ट दासी मंथरा कैकेयीच्या कानात विष ओतत होती. रामाच्या राज्याभिषेकाचा डाव उधळून टाकण्याची योजना तिच्या मनात पेरत होती.
रामाचा राज्याभिषेक झाला की भरताला त्याचा गुलाम व्हावं लागेल. कौशल्या राजमाता होईल. कैकयीला दासी व्हावे व्हावे लागेल. मंथरेने कैकेयीच्या कानात विष ओतले. आणि कैकेयी तिच्या कारस्थानाला, बळी पडली.
कैकेयिनी सगळे दागिने फेकून दिले. केस मोकळे सोडले. साधे, काळे, कपडे घातले. आणि ती रुसून बसली.
राजा दशरथ कैकेयीच्या महालात आल्यावर समोरचे दृश्य बघून त्याला धक्काच बसला. रामाच्या राज्याभिषेका सारख्या मंगल प्रसंगी तू का नाराज आहेस. अनेक आढेवेढे घेऊन अनेक नाटकं करून कैकेयीने राजा दशरथाला हतबल केले.
एका युद्धात, कैकेयीने राजा दशरथाचा जीव वाचवला होता. त्यावेळी दशरथाने तिला दोन वर दिले होते. त्याची आठवण तिनी करून दिली. राजा दशरथ म्हणाला सांग तुला काय देऊ.
कैकेयी म्हणाली मग ऐका तर नीट लक्ष देऊन ऐका. पहिल्या वरानी उद्या माझ्या भरताला राज्याभिषेक करावा. आणि दुसऱ्या वराने रामाला वल्कले नेसून 14 वर्षे वनवासात पाठवावे. ते ऐकून दशरथाच्या तोंडून शब्दही फुटेना. राजा दशरथाने गयावया केली. पण कैकेयीने निक्षून सांगितले. माझ्या दोन्ही वरांची पूर्तता ही झालीच पाहिजे.
दुष्ट कैकयीचा हट्टीपणा बघून राजा दशरथ राम राम म्हणत जमिनीवर कोसळला. बेशुद्ध झाला.
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

