डिजिटल जग आणि मूल
बदलत्या बालपणाशी जुळवून घेताना “आजकालची मुलं फार बदलली आहेत!” हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. कधीकधी आपणही म्हणतो. पिढ्यांमधले अंतर काही आजचे नाही. प्रत्येक पिढीला पुढची पिढी वेगळी वाटली आहे. पण आजचा बदल केवळ नेहमीचा generation gap नाही. केवळ आपलेच मूल बदललेले नाही.सगळीच मुले बदललेली आहेत.सगळ्यांचीच मुले बदललेली आहेत. कारण— बालपणाची संपूर्ण परिसंस्थाच बदलली आहे. मुलाला फक्त आई-वडील वाढवत नाहीत. त्याच्या भोवतालचे कुटुंब, शाळा, मित्र, समाज, आरोग्य आणि वातावरण—हे सारे मिळून त्याला घडवत असतात. यालाच आपण ‘बालपणाची परिसंस्था’ म्हणतो. डिजिटल क्रांतीने या संपूर्ण परिसंस्थेलाच बदलून टाकले आहे. घर बदलले. शाळा बदलली. मित्रांशी संबंध बदलले. खेळ बदलले. मनोरंजन बदलले. माहिती मिळवण्याचे मार्ग बदलले. एकमेकांशी बोलण्याच्या पद्धती बदलल्या. आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता—AI—आल्यामुळे शिकणे, प्रश्न विचारणे, उत्तरे शोधणे आणि ज्ञानाशी संवाद साधणेही बदलत आहे. डिजिटल जग आता फक्त मोबाईलमध्ये नाही म्हणूनच हा प्रश्न आता फक्त “मोबाईल आणि मूल” एवढा राहिलेला नाही. मोबाईल हे एक साधन आहे. डिजिटल जग त्याहून खूप मोठे आहे. ते घरात आहे. शाळेत आहे. अभ्यासात आहे. खेळात आहे. मित्रांच्या गप्पांमध्ये आहे. मनोरंजनात आहे. खरेदीत आहे. आरोग्यविषयक माहितीत आहे. आणि हळूहळू मुलाच्या विचारविश्वातही प्रवेश करत आहे. डिजिटल जग बालपणाच्या परिसंस्थेतील केवळ एक घटक राहिलेले नाही; ते संपूर्ण परिसंस्थेत मिसळले आहे. बालपणाच्या सीमा बदलल्या पूर्वी घराला दार होते. शाळेला गेट होते. मित्र आसपासचे असायचे. खेळ मैदानावर व्हायचा. माहिती आई-वडील, शिक्षक, पुस्तके आणि आसपासच्या समाजातून मिळायची. मुलाच्या जगाच्या भौगोलिक सीमा होत्या. आज त्या सीमा जवळजवळ नाहीशा होत आहेत. एका छोट्याशा स्क्रीनमधून जग मुलाच्या घरात येते. आणि त्याच स्क्रीनमधून— मूलही जगात प्रवेश करते. मुलाच्या हातात केवळ एक मोबाईल आलेला नाही. त्याच्या हातात जगाची खिडकी आली आहे. मग हे चांगले की वाईट? डिजिटल जग म्हणजे वाईट आणि आपले जुने जग म्हणजे चांगले—इतके साधे हे गणित नाही. डिजिटल जगाने मुलांसाठी ज्ञानाची प्रचंड दारे उघडली आहेत. मुलाला जगातील उत्तम शिक्षक ऐकता येतात. विज्ञान पाहता येते. भाषा शिकता येतात. संगीत ऐकता येते. चित्रकला करता येते. दूरच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी संपर्क ठेवता येतो. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी नवीन साधने उपलब्ध झाली आहेत. आणि आता AI मुलाच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकते, समजावून सांगू शकते आणि त्याच्याशी संवादही साधू शकते. पण याच जगात चुकीची माहिती आहे. हिंसक किंवा वयाला अयोग्य मजकूर आहे. सायबरबुलिंग आहे. सततची तुलना आहे. जाहिराती आहेत. आणि मुलाचे लक्ष शक्य तितका वेळ स्वतःकडे धरून ठेवण्यासाठी बनवलेल्या डिजिटल यंत्रणाही आहेत. म्हणून प्रश्न डिजिटल जग स्वीकारायचे की नाकारायचे हा नाही. प्रश्न आहे— या डिजिटल जगात आपल्या मुलाला वाढायला कसे शिकवायचे? फक्त Screen Time पुरेसे नाही किती तास मोबाईल पाहिला? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण त्याहूनही काही प्रश्न महत्त्वाचे आहेत. मूल स्क्रीनवर काय पाहते? ते का पाहते? त्यातून काय शिकते? कोणाशी संवाद साधते? कशावर विश्वास ठेवते? कुणाशी स्वतःची तुलना करते? आणि त्या डिजिटल अनुभवामुळे त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यातून काय बाजूला पडत आहे? झोप? खेळ? व्यायाम? अभ्यास? कुटुंबातील गप्पा? मित्रांसोबतचा प्रत्यक्ष सहवास? की स्वतःशीच निवांत राहण्याचा वेळ? म्हणून आता केवळ Screen Time मोजून डिजिटल बालपण समजणार नाही. ‘श्यामची आई’ आता कुठून आणणार? आपल्या पिढीला श्यामची आई प्रिय आहे. त्या काळातील साधेपणा, संस्कार, कुटुंबातील जवळीक आणि जगण्याची मूल्ये आपल्याला आजही हवी आहेत. पण श्यामच्या आईच्या काळचे वातावरण आज कुठून आणणार? आता तसाच श्याम नाही.तशीच श्यामची आई नाही.आणि तशी परिसंस्थाही राहिलेली नाही. श्यामची आई आपल्याला आजही मूल्ये देऊ शकते. पण तिच्या काळचे बालपण आपण आजच्या मुलावर लादू शकत नाही. मूल्ये टिकवता येतात.काळ मागे नेता येत नाही. “आबा, मला माझा स्वतःचा व्लॉग सुरू करायचा आहे…” काही वर्षांपूर्वी माझा दहा वर्षांचा नातू समिहन मला म्हणाला, “आबा, मला माझा स्वतःचा व्लॉग सुरू करायचा आहे. मदत कराल?” प्रश्न माझ्यासमोरही उभा राहिला. त्याला डिजिटल जगापासून दूर ठेवायचे? की त्याला त्या जगात जबाबदारीने वावरायला शिकवायचे? मी त्याला वाढदिवसाला एक टॅबलेट दिला. आणि त्यासोबत एक चिठ्ठी दिली— “अटी आणि नियम.” आज मागे वळून पाहताना वाटते, उत्तर त्या टॅबलेटमध्ये नव्हते. उत्तर त्या सोबतीत होते. मुलाला संधी द्यायची. त्याच्या नव्या जगाबद्दल उत्सुकता ठेवायची. त्याच्याबरोबर शिकायचे. धोके समजावून घ्यायचे. मर्यादा ठरवायच्या. आणि हळूहळू स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकवायचे. बंदी नाही. बेबंदपणाही नाही. आपल्यालाच पुन्हा शिकावे लागेल आजच्या मुलांना कालच्या जगासाठी तयार करून उपयोग नाही. ती मोठी होणार आहेत उद्याच्या जगात. आणि गंमत अशी की— ती ज्या जगात मोठी होणार आहेत, त्या जगाचा पूर्ण अनुभव आपल्यालाही नाही! म्हणून पालकांनी शिकावे लागेल. आजी-आजोबांनी शिकावे लागेल. शिक्षकांनी शिकावे लागेल. डॉक्टरांनी शिकावे लागेल. आणि अनेकदा— मुलांकडूनही शिकावे लागेल. आपण त्यांना आपला अनुभव देऊ. त्यांच्याकडून नवे जग समजून घेऊ. मग कदाचित generation gap ही दरी न राहता दोन पिढ्यांना जोडणारा पूल बनेल. आपली भूमिका काय? डिजिटल जग मुलांपासून बंद करणे हे उत्तर नाही. मुलाला डिजिटल जगात एकटे सोडणे हेही उत्तर नाही. आपले काम प्रत्येक डिजिटल दाराला कुलूप लावणे नाही. कोणते दार उघडायचे, किती उघडायचे आणि त्या दारातून दिसणाऱ्या जगाकडे कसे पाहायचे—हे मुलाला शिकवायचे आहे. नियंत्रणापेक्षा संवाद. भीतीपेक्षा समज. बंदीपेक्षा विवेक. केवळ वापरापेक्षा निर्मिती. आणि डिजिटल संपर्काबरोबर प्रत्यक्ष मानवी नाती. बालपण मात्र जपायचे आहे तंत्रज्ञान बदलत राहील. आजचा मोबाईल उद्या बदलेल. आजचे सोशल मीडिया उद्या वेगळे असेल. AI आणखी बदलेल. पण मुलाच्या काही गरजा हजारो वर्षांपासून बदललेल्या नाहीत. प्रेम. सुरक्षितता. स्वीकार. खेळ. कुतूहल. मैत्री. संवाद. कौतुक. आपलेपणा. आणि आपल्या माणसांचा सहवास. त्यामुळे डिजिटल युगासाठी आपल्याला जुन्या बालपणाची नक्कल नको. आजच्या काळाला अनुरूप चांगले बालपण घडवायचे आहे. मूल्ये टिकवायची; माध्यमे बदलू द्यायची. बालपण जपायचे; काळ मागे न्यायचा नाही. डिजिटल क्रांती थांबवता येणार नाही. तशी गरजही नाही. बदलत्या जगाशी आपण जुळवून घ्यायचे. आणि त्या जगाशी जुळवून घेताना मुलांचे बालपण फुलवत राहायचे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)











