माझ्या प्रिय आयांनो,
फक्त मुलांना मोठं करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही.
मुलांना वाढवणं हा तुमच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण भाग आहे, हे नक्की. पण म्हणून तुमचं संपूर्ण अस्तित्वच मातृत्वाच्या कर्तव्यावर ओवाळून टाकण्याची गरज नाही.
ताई, स्वतःकडे दुर्लक्ष करू नका बरं!
आधुनिक विज्ञान आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. मुलांचा विकास केवळ अन्न, औषधे, लसीकरण किंवा शिक्षणावर अवलंबून नसतो. मुलांच्या विकासावर त्यांच्या caregiver च्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा देखील खोल परिणाम होत असतो.
चांगली आई होण्यासाठी, सुरक्षित मातृत्वासाठी, तिचे वय 20 ते 35 हवे, वजन 45 किलो हवे, उंची 145 सेमी (4 फूट 9 इंच) हवी.
किडकिडीत आईची मुलं किडकिडीत होतात. दणदणीत आईची मुलं दणदणीत होतात. घाबरट आईची मुलं भितृट होतात. खंबीर आईची मुलं आत्मविश्वासू होतात.
एका वेळी एक मूल बोटाला, एक मूल कडेला आणि एक मूल पोटात असलेल्या आईचे हालच असतात. चार जिवांवर अन्याय. दोन मुलात कमीत कमी तीन वर्षाचे अंतर हवे.
शिक्षणामुळे आयांना आरोग्य, पोषण, लसीकरण आणि बालविकास याबाबत अधिक माहिती मिळते. त्यामुळे त्या मुलांची वैज्ञानिक पद्धतीने काळजी घेऊ शकतात. त्या प्रथा आणि अंधश्रद्धांच्या आहारी जात नाहीत.
सतत थकलेली, झोपेअभावी त्रस्त, तणावाखाली असलेली किंवा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणारी आई कितीही प्रेमळ असली तरी तिच्यावरचा भार वाढत जातो.
उलट सशक्त, आत्मविश्वासू, आनंदी आईच आपल्या मुलाला सुरक्षित, स्थिर आणि पोषक वातावरण देऊ शकते.
म्हणूनच आईची काळजी घेणे हा बालसंगोपनाचाच एक महत्त्वाचा भाग आहे.
योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित आरोग्य तपासणी, थोडा विरंगुळा, स्वतःसाठी थोडा वेळ, भावनिक आधार आणि सन्मान — या गोष्टी आईच्या गरजा नाहीत, तर मुलांच्या विकासासाठीची गुंतवणूक आहेत.
म्हणूनच आता कुटुंब, आजी-आजोबा, वडील, समाज आणि मुलांच्या विश्वातील सर्व मोठ्या माणसांनी एक गोष्ट समजून घ्यायला हवी:
मुलं सशक्त हवी असतील तर आया सशक्त हव्या ना!
आईला सशक्त करणे हे सुद्धा एक प्रकारचे बालसंगोपनच आहे.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


