ऊन तापत चाललय. उकाडा वाढत चाललाय. दिवस मोठा मोठा होऊ लागलाय. बाहेर खेळायला, धमाल मस्ती करायला जास्त वेळ मिळू लागलाय. पण जरा जपून. ऊन बाधण्यापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे.
सूर्य बॅड बॉय कि गुड बॉय ?
तसा सूर्य हा गुड बॉयच आहे. सूर्य जरी तोंट, आग ओकत असला तरी तो फार छान छान कूल गोष्टी करत असतो. तो आपल्याला ऊब देतो. तो झाडांना ,फुलांना वाढवतो. तो आपल्या कातडीखाली ‘ड’ जीवनसत्व निर्माण करतो. ड जीवनसत्वाच्या मदतीने अन्नातले कॅल्शियम आतडयातून रक्तात शोषलं जातं. आणि हाडं बळकट होतात. म्हणजे तसा सूर्य हा गुड बॉयच आहे.
पण आपण काळजी घेतली नाही तर तो बॅड बॉय होऊ शकतो. सूर्यकिरणांमध्ये काही अदृश्य डोळयांना न दिसणारे अतिनील अल्ट्राव्हायोलेट (आपण यू.व्ही. म्हणू) किरण असतात. ते सूर्यदाह, सनबर्न करतात. सूर्यांची उष्णता शरीराला सहन न झाल्याने उष्माघात होतो. आपण काळजी घेतली नाही, शिस्त लावली नाही तर सूर्य बॅड बॉय होऊ शकतो.
सूर्यदाह : कातडीची आग होऊ देऊ नका.
यू.व्ही.किरण ढगांतून, हवेतून प्रवास करत आपल्या कातडीवर पडतात. यू.व्ही. किरणांमुळे कातडी भाजल्यासारखी, करपल्यासारखी होते.कातडी गोरी असेल तर सूर्यदाह लवकर होतो. काळी असेल तर उशीर होतो. काळ्या कातडीतील मेलेनिन हे रंगद्रव्य कातडीचे यू.व्ही. किरणांपासून संरक्षण करते.
सूर्यदाह झाल्यावर कातडीची आग होते, जळजळ करते. कातडीवर पाणी भरलेले फोड येतात. अशा कातडीवर मोठेपणी सुरकुत्या पडण्याची शक्यता जास्त असते. क्वचित मोठेपणी कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. काळजी घेतलेली बरी.
सकाळी १० ते ४ सूर्यप्रकाश प्रखर असतो. तेंव्हा अघुतन मधून सावलीत जावे. सनस्क्रीन लोशन लावावे. सनस्क्रीन लोशन ३० किंवा जास्त एस पी एफ चे असावे. एस पी एफ. म्हणजे सन प्रोटेक्टींग फॅक्टर. उन्हात जाण्याच्या १५, २० मिनिट आधी लावावे. शरीराच्या ज्या ज्या भागावर ऊन पडणार त्या त्या भागावर लावावे. दर २ तासांनी लावावे. पोहतांना पाण्यावर पडणारे सूर्यकिरण परावर्तीत होऊन दुप्पट प्रमाणात कातडीवर पडतात.त्यामुळे पोहतांना व घाम येत असेल तर सनस्क्रीन लोशन जास्त वेळा लावावे. चेहऱ्यावर सावली पडेल अशी टोपी घालावी. हात पाय दिसणार नाहीत असे अपारदर्शक ढिले कपडे घालावे. प्रखर उन्हात यू.व्ही किरण अडवणारे गॉगल घालावे.
उष्माघात : पाणी प्या, ओल्या फडक्याने पुसून घ्या.
शरीराचं तापमान नियंत्रण करणारा एक थर्मोस्टॅट नावाचं केंद्र मेंदूमध्ये असतं. हवेंचं तापमान वाढलं कि घाम येऊन शरीर थंड केलं जातं. लहान मुलांचं तापमान नियंत्रण केंद्र अपरिपक्व असल्याने ते व्यवस्थित काम करत नाही. पत्ता तापतो, भांडी तापतात तशी मुले तापतात. त्यांना थंड करावं लागतं. उन्हाळ्यात दिवसातून ३,४ वेळा ओल्या फडक्याने पुसून घ्यावे. शर्ट ओला करून पिळून अंगात घालावा. वाळलेल्या कोरडया माठाले पाणी गार होत नाही. वाळलेल्या ओल्या माठाले पाणी गार होते.
शरीराला पाणी कमी पडले तरच उन्हाळा बाधतो. पाणी कमी पडले तर उकडून सुद्धा घाम येत नाही. शरीर तापतच जाते. तापाची औषधे (क्रोसिन) शरीर थंड करत नाहीत, घाम आणतात. शुष्कता स्थिती (डीहायड्रेशन) असेल तर तापाच्या औषधांचा गुण येत नाही. म्हणून भरपूर पाणी प्यावे. दिवसातून (चोवीस तासातून) ६ पेक्षा जास्त वेळा लघवी व्हावी. उन्हाळयामुळे, उलटी-जुलाबामुळे, आजारात अन्न पाणी कमी गेल्यामुळेसुद्धा शुष्कता स्थिती येते.
उष्माघातामुळे शरीराचं तापमान वाढते. कातडी लाल होते, डोकं दुखतं, चक्कर येते. डोळे खोल जातात. लघवी कमी होते. नाडीचे ठोके वाढतात. दम लागतो. असंबद्ध बडबडणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणं दिसतात. असं काही जाणवलं तर शाळेत किंवा घरात मोठ्या माणसांना सांगायला हवे. उष्माघाताचे निदान योग्य झाले नाही तर टॉयफॉईड, मलेरिया, न्यूमोनिया असे चुकीचे निदान ठोकून औषधांचा मारा होतो. मूळ उष्माघात बाळावतोच राहतो.
उष्माघाताच्या मुलाला ओ.आर.एस.(जलसंजीवनी) भरपूर पाजावे. कपडे कमी घालावे. पंखा चालू करावा. ओल्या कपडयाने पुसून घ्यावे.
तर मुलांनो, ज्यांना सूर्यदाह आणि उष्माघातापासून स्वतःला वाचवायचे आहे त्यांनी सनस्क्रीन लावावे, पाणी प्यावे, ओल्या फडक्याने पुसावे आणि कूल रहावे.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)



मला तुमचे सर्व लिखाण मनापासून आवडते
अत्रे वा,
मलाही माझे लिखाण मनापासून आवडते!..
समान शीले व्यसने्षु सख्यम
Peer group motivation.
आपण एकाच मुशीत घडलेले buddies आहोत
thanks