होईल हो. आत्ता तर जेमतेम दोन अडीच वर्ष होताहेत लग्नाला. इथून होते सुरुवात एका दुष्टचकाची. मागून लग्न झालेल्या भावंडांना पहिले मूल झाले की पहिल्यांदा मनात पाल चुकचुकते. आपल्याला कधीच मूल होणार नाही काय ? डॉक्टरी उपाय सुरु होतात. येणारीप्रत्येक मासिक पाळी नैराश्याचे झटके देअून जाते. उध्वस्त जीवनाचा अर्थ समजता. चिडचिडहोते. भांडणे वाढतात. निष्कारण एकमेकांना दुखावले जाते. समंजस कुटुंबातल्या समंजस जोडप्यांना ‘दोष कुणाचा’ यात रस नसला तरी “गिल्टी फीलिंग” काढून टाकावे लागते. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु होते. मिळेल तो सल्ला ऐकण्याची प्रवृत्ती वाढते. न जाणो या मार्गाने
यश आले तर ! आशा मरत नाही. मन हार मानायला तयार होत नाही. पण हळूहळू मूल कधीच होणार नाही हे मनाला समजायला लागतं.
अनेक वर्ष ज्या डॉक्टरांवर देवासारखी श्रध्दा ठेवली असते, जो डॉक्टर सुप्रसिध्द, यशस्वी, तज्ञ, बुध्दिमान वाटला असतो तोच डॉक्टर अचानक वेळ खाअू, पैसेखाअू, कच्चा वाटू लागतो. कशाला फुकट चकरा मारायच्या असे वाटू लागते. आपण उगीच या डॉक्टरच्या नादी लागलो असे वाटले म्हणजे समजावे प्रयत्नांचा अंत आला आहे. पाच, दहा, पंधरा वर्षांनी मूल झालेली माणसे दिसायला लागली म्हणजे समजावे, आता पुरे !

वाईट दोघांनाही वाटत असतं. कुचंबणा तर होतेच. पण वाईट वाटतं हे स्पष्टपणे बोलायला मन नकार देतं. मूल नाही म्हणून आमचं काही बिघडत नाही. आम्ही आनंदी आहोत. असं चारचौघात आवर्जून सांगण्यात माणूस धन्यता मानतो. समाजात न मिसळण्याची प्रवृत्ती वाढते. मनातून कुढत असतांनाच चेहरा मात्र आनंदी, सुखी माणसाचा चढवला जातो. आमच्या आयुष्यात काही त्रुटी नाही, भावंडांची मुले आपलीच आहेत की, असं आवर्जून इतरांना सांगितले जाते. पण या वाक्यांतला फोलपणा लवकरच लक्षात येवू लागतो. चेह-यावर वय दिसू लागते. अकाली प्रौढत्वाच्या खुणा ओळखायला येतात.
या परिस्थितीत काही नशिबवान जोडप्यांना दत्तकाची माहिती मिळते. समोरासमोर कुणी सांगितलं तर पटकंन पटत नाही. पण ही दत्तकाची सुचना योग्यवेळी जोडप्यांच्या मनात रुजायला लागते. पहिली प्रतिक्रिया विचार बाजूला सारायची असते. नाही. आपल्या ‘टॅडिशनल फॅमिली” मधे इतका मॉडर्न विचार चालायचा नाही असे वाटते. पण ते खोटे असते. कारण आजकाल कोणच्याच ‘फॅमिली’ तितक्या ‘टॅडिशनल’ नसतात. आणि दत्तक हा सुध्दा इतका काही ‘मॉडर्न’ विचार राहिलेला नाही. कुणाचे तरी प्रोत्साहन, वाचन, किंवा उदाहरण पाहून दत्तकाची कल्पना जोडप्यापैंकी कुणाच्यातरी एकाच्या मनात रुजायला लागते. दोघांनीही चर्चा केली तर ती लवकर रुजते. दोघांच्याही मनात प्रश्न असतो. दुस-याला काय वाटेल. माझे विचार तुझ्यावर लादले तर जाणार नाही ना, असे निष्कारणच म्हटले जाते. दोघांनी एकदा हा विचार मान्य केला की एकदम आयुष्य बदलते. अचानक डोक्यात लख्ख उजेड पडतो. जीवनातला आनंदाचा मार्ग स्पष्ट दिसायला लागतो.
मग प्रश्न येतो ‘जग काय म्हणेल याचा नातेवाईक, कुटुंबिय समाज यांच मत विचारत बसणे हा मूर्खपणा असतो. कुटुंबियांना विश्वासात घ्यावेच लागते. पण निर्णय स्वतःचा स्वतःच घ्यायचा असतो. मूल दत्तक घेण्याचा निर्णय कुटुंबियांना सांगितला तर सगळयांनाच तो आवडतो. मत विचारलं तर मात्र फाटे फुटू शकतात. कोणी म्हणतं नात्यातलं घेवू, नात्यातलं मूल हे नातेवाइकाचंच राहतं. “जन्मभरं मूल कसं हवं”? संपूर्णपणे आपलं. त्याला आपल्याशिवाय दुसरे आईवडिल नको. तरच ते कुटुंब बनतं. नाहीतर ‘यांच मूल त्यांनी संभाळलं हे बीरुद जन्मभर राहतं. आणि अशी मुलं असतात. त्या मुलाला आई वडिल नसतात आणि अशा मुलांना आई वडिल मिळवून देण्याचं कार्य करणा-या समाजसेवी संस्था असतात.
संस्थेकडे जाणे ही सुध्दा एक महत्वाची पायरी असते. संस्थांकडे कुमारीमातांची, आईला सामाजिक कारणांनी सांभाळ करणं अशक्य असलेली मुले येतात ही मुले कायदेशीररित्या त्यांच्या जन्मदात्या आयांनी संस्थेकडे सुपूर्द केलेली असतात. संस्था त्या मुलांचे पालनपोषण करत असते. संस्थेकडे जावून मूल कायदेशीरित्या दत्तक घेणं श्रेयस्कर असतं. संस्थेचे नियम, कागदपत्रांची पूर्तता व लागणारा वेळ परवडला, पण खाजगीरित्या डॉक्टरांकडून आणून संभाळलेलं मूल परवडत नाही. त्यात धोका असतो. जन्मदात्याचा नाव पत्ता व मूल नेलेल्याचा नाव पत्ता कुणालाही मिळू शकतो. पुढेमागे कायदेशीर कटकटी निर्माण होवू शकतात. ते
कुठल्याही परिस्थितीत टाळायलाच हवे.
संस्थांकडून दत्तक मिळण्याची पध्दत पूर्ण देशात एकच अशी कायद्याने मान्यता दिलेली पध्दत असते. ती मुलांच्या व आईवडिलांच्या दोघांच्याही दृष्टीने फायद्याची असते. संस्थेमधे पहिली भेट होते ती समाजसेविकेची किंवा सोशलवर्करची. या उच्चशिक्षित, प्रशिक्षित, अनुभवी व सह्दयी असतात. त्यांना संपूर्ण सहकार्य देणा-या जोडप्यांची दत्तकमूल घेण्याची प्रक्रिया सुरळीत व आनंददायी ठरते. त्या इंटरव्हयू घेतात, घरी भेट देतात, तुमचं घर त्यातली माणसं दिलेल्या मुलाला योग्य राहतील कि नाही हे बघतात. काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मग तुमचा अर्ज दाखल होतो. यात 2-4 महिने जाउ शकतात. मूल निवडण्याआधी किंवा दाखवण्याआधी सोशलवर्कर तुमच्याशी चर्चा करतात तुमची तयारी करुन घेतात.
मुलगा की मुलगी हा प्रश्न प्रत्येकाला सोडवावा लागतो. तुमच्या, तुमच्या कुटुंबाच्या रंग रुपाशी मिळते जुळते शोधून 1 किंवा 2 मुले दाखवली जातात. बहुतेक “होणा-या आयांना” दाखवलेले पहिलेच मूल आवडते. “प्रथमदर्शनी प्रेम” म्हणतात तसलीच ही भवनात्मक भानगड असते. मूल घरी यायला साधारणपणे 3 ते 9 महिने एखाद्या वेळेस वर्षसुध्दा लागू शकते. तशी गर्भारपणातसुध्दा बाळ यायला नउ महिने वाट पहावीच लागते की. फार उताविळपणा करुन चालत नाही!
मूल आल्यावरची परिस्थिती म्या पामराने काय वर्णावी! अहो आनंदसोहळाच तो! सर्व मळभ निघून जाते. सुखाचा पेला काठोकाठ भरल्याची जाणीव होते. हा निर्णय घ्यायला इतकी वर्ष वाया घालवली याची प्रकर्षाने जाणीव होते. ‘बेटर लेट वॅन नेव्हर’ म्हणून स्वतःची समजूत घालणंच आपल्या हातात असतं. शेवट गोड ते सगळं गोड म्हणतात तसं.
पण इथं तर एका नव्या आयुष्याची, एका नव्या कुटुंबाची सुरुवात असते. नवा संसार म्हणजे नव्या अडचणी विवंचना आल्याच की. त्याशिवाय त्याला संसार कसं म्हणणार. मधून मधून याचे जन्मदाते कोण असतील. कोणत्या जातीचे असतील असले उत्तर नसलेले प्रश्न मनात उद्भवतात. एखादी बाई ‘दत्त’ म्हणून समोर येवून उभी राहिली आणि “हे माझं मूल आहे” अस म्हणू लागल्याची दिवास्वन्प्नसुध्दा पडू शकतात. पण ते सगळे मनाचे खेळ असतात. ‘कूठून आलं आणि कुठे गेलं’ हे गुपित असतं. ते कुणालाही माहित नसतं. म्हणूनच संस्थेमार्फत कायदेशीर दत्तक यशस्वी ठरतं. आपण आपल्या मुलावर व भविष्यावर नजर ठेवावी. भूतकाळाच्या जोखडीतून मुक्त व्हावं हेच बरं.
मूल आल्यावर सगळयांना बिनधास्तपणे आम्ही मूल दत्तक घेतलयं म्हणून सांगावं. अजिबात लाजू नये. ते एक आयुष्यातल यश आहे. ते तसंच समाजाला सांगितलं तर समाजाला आपलं कौतुक करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. तुम्ही जर खोटं बोलला किंवा लपवाछपवी केली तर उघडे पडतं. लोक निश्तिच टिंगल करतात. दत्तकाचं तसं संपूर्ण प्रकरणच “आहे ते आनंदाने मान्य करणे व कौटुंबिक जीवन सुखी करणे.” यावर अवलंबून असतं. हे तत्व ज्याला समजलं त्याचा दत्तक यशस्वी झाला.
मुलाची वाढ व प्रगति ही जास्त करुन त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर आणिवातावरणावर अवलंबून असते. अनुवांशिकता व त्याच्या जन्मदात्या मातापित्यांच्या आर्थिक – सामाजिक परिस्थितीचा त्यावर काहीच परिणाम नसतो हे समजून घ्यायला हवे. कोणत्याही मुलाला विकासासाठी प्रेम, शिस्त व सुरक्षितता या तीन गोष्टींचा योग्य समन्वय साधावा लागतो. तसाच व तितकाच तो दत्तक मुलासाठीही साधावा लागतो. मुलाच्या वागणुकीचा बुध्दिमत्तेचा व यशाचा संबंध त्याच्या जन्मदात्यांशी न लावता पालनकर्त्या आई-वडिलांशी लावला तर यश निश्चित मिळते.
तू दत्तक आहे असं एका दिवशी समोर बसवून गंभीर चेह-याने सांगणे चुकीचे आहे. लहानपणापासूनच दत्तक हा शब्द अनेकवेळा सहजपणे मुलाच्या कानावरुन गेला असावा. दत्तक या शब्दाचा अर्थ न कळतासुध्दा तो दत्तक आहे हे त्याला कुणीतरी सांगायच्या आधीच माहित असावे. दत्तक म्हणजे काहीतरी ‘स्पेशल’, काहीतरी ‘चांगले’ अशी कल्पना त्याच्या मनात रुजावी. इतर दत्तक मुलांशी त्याची ओळख मैत्री असावी. मूळ संस्थेशी त्याचा संपर्क असावा. अनाथालय, अनाथ मुले, दत्तक देणारी संस्था, दत्तक-पालक मेळावे या जगाशी त्याची नैसर्गिक ओळख असावी. संस्थेशी संपर्क तोडून ‘दत्तक घेतले हा विषय गाडून टाकता येत नाही. तो पूर्ण जीवनभर समोर येणारा विषय आहे. त्याला नैसर्गिकपणे-सहजपणे सामोरे जाण्यातच शहाणपणा आहे.
एक ना एक दिवस आपल्या “मूळ जन्मदात्यांची चौकशी” करण्याची इच्छा त्याला होणारच. त्यासाठीही स्वतःची व मुलाच्या मनाची वैचारिक बैठक तयार करुन ठेवावी लागते. शक्यतो खरेच बोलावे. कधीहि खोटे बोलू नये. किती खरे बोलावे हा ज्या त्या मुलाच्या व आईवडिलांच्या परिपक्वतेवर अवलंबून असलेला प्रश्न आहे. आपल्या कुटुंबप्रधान संस्कृतीत तरी हा प्रश्न फार गंभीर स्वरुप धारण करत नाही.
तर चला, घ्या पुढाकार आणि सांगा अशा निपुत्रिक जोडप्यांना माझा निरोप.
कि बाबांनो,
मूल नाही म्हणून कुढत का बसता,
दत्तक घ्या ना.
या, आपण चर्चा करु.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
