ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा. त्यांनी उन्हात खेळावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये. त्यांनी सावलीत खेळावे.
ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी टोपी न घालता बाहेर हुंदडायला जावे. म्हणजे मस्त डोकं तापतं. फणफणून ताप येतो. हॉस्पिटल मधे इंजेक्शन सलाईन मिळतात. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी टोपी घालून बाहेर जावे.
ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी चपला न घालता तापलेल्या फरशीवर पाय ठेवावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी चपला घालून घराबाहेर पडावे.
ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी अज्जीबात पाणी पिऊ नये. आणि खुशाल रणरणीत उन्हात भर दुपारी सायकल दामटावी. पाणी कमी पिले तरच उन्हाळा बाधतो. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी भरपूर पाणी प्यावे. चोवीस तासात सहापेक्षा जास्त वेळा सू व्हायला हवी. अगदी आकडा मोजा. भरपूर पाणी पिणाऱ्याला उन्हाळा बाधत नाही.
तर बच्चमजी, तुम्हीच ठरवा, उन्हाळ्यात काय करायचे. काय नाही करायचे. शाळेतल्या मोठ्या मुलांना एवढं तरी आपलं आपल्यालाच समजायला हवे. ते सांगायला आई कशाला लागते!
एवढे बोलून “उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले” या विषयावरचं माझं भाषण मी समाप्त करतो.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

