मार्च महिना आला की तापानी फणफणलेली मुलं दवाखान्यात यायला सुरुवात होते. या तापाचं कारण लक्षात आलं नाही तर आग रामेश्वरी बंब सागेश्वरी अशी स्थिती निर्माण होते. ही उन्हाळयाची आग बाळांना फार त्रास देते. उष्माघात हा एक वर्षाखालील मुलांचा विशेषतः नवजात बालकांचा खास आजार आहे.
कच्चे तपमान नियंत्रण :-
शरिराच्या तपमानाचे नियंत्रन करणारे एक केंद्र मेंदुमध्ये असते हवेचं तपमान वाढलं की घाम येवून शरिर थंड होतं. लहान बाळांच तपमान नियत्रंण केंद्र अपरिपक्व असल्याने व्यवस्थित काम करत नाही. पत्रा तापतो, भांडी तापतात तशी मुलंही तापतात.
बाल उष्माघाताची कारणे व उपाय :-
उष्ण न खेळणारी हवा :
पत्र्याचे छप्पर, कमी उंचीच्या छताची खोली, खेळती हवा नसलेली कोंदट खोली असेल तर उष्माघाताची शक्यता खूप जास्त असते. बालउष्माघात व्हायलाउन्हातच जायला हवे असे नाही. 15 दिवसाच्या बाळाला सुध्दा बालउष्माघात होऊ शकतो. त्यासाठी खोली थंड हवी. नसेल तर करायला हवी. कुलर लावणे पंखा लावणे, दारं खिडक्यांवर ओल्या चादरी टॉवेल टाकणे इ. उपाय करता येतात. खेडयातील आयांनी दुपारच्या वेळी बाळाला घेऊन दाट सावली असलेल्या झाडाखाली बसावे. लिंबाची सावली छान गारवा देते. बाळाला ताप आला असता दारं खिडक्या बंद, पंखे बंद करुन बाळाला जास्त त्रास होतो.
अंगावरचे कपडे :
मोठया माणसांना उकडायला लागलं तर ते हलके, पातळ, सुती कपडे घालतात. पण तापलेल्या बाळाला टोपी, स्वेटर, ब्लॅकेटमधे दडपून ठेवतात. हे उपाय ताप वाढवणारे आहेत. वारं लागू नये “बाधेल” अशा गैरसमजुतीपायी बाळाचे नुकसान होते. बाळाला कमीतकमी, हलके, सुती कपडे घालावे तापलेल्या बाळाला उघडे ठेवणे सर्वात उत्तम.
शरिरातील पाण्याचे प्रमाण :
वाढलेले तपमान कमी करण्यासाठी देवाने फक्त एकच यंत्रणा आपल्या शरिरात बसवली आहे. तपमान वाढले कि घाम येतो. त्याचे बाष्पीभवन होण्यासाठी शरिरातील उष्णता वापरुन शरिर थंड होते. बाहेरुन कोरडया माठातले पाणी गार होत नाही. त्याचप्रमाणे घाम न आलेल्या बाळाचे तपमान वाढतच जाते. अशा बाळाला दिवसातून तीन चार वेळा गार पाण्याने पुसून घ्यायला हवे.
उन्हाळयामुळे, उलटी जुलाबामुळे किंवा आजारपणात अन्नपाणी, अंगावरचे दूध न घेतल्यामुळे शुष्कता स्थिती निर्माण होते. शरिरात पाणी कमी असेल तर ताप येवून सुध्दा शरिर घामावाट पाणी बाहेर सोडू शकत नाही. पॅरासिटॅमॉल क्रोसीन हे औषध घाम आणण्याचे काम करते. शुष्कता स्थिती असेल तर पॅरासिटॅमॉलचा गुण येत नाही. तेव्हा शुष्कता स्थितीचे निदान करुन पाणी पाजले तरच ताप उतरतो अन्यथा नाही.
बालउष्माघाताने अनेक मत्यू होतात. खुप रडणा-या व बेफाम तापलेल्या बाळाला योग्य निदान न झाल्याने अॅटिबायोटिक व झोपेच्या औषधांचा मारा केला जातो. पण मूळ कारण दूर न झाल्याने मुल तापतच राहते व रडतच राहते. त्यासाठी लहान बाळांच्या कुटुंबानी व फॅमिली डॉक्टरांनी बालउष्माघाताची शक्यता मनात ठेवली पाहिजे. तो होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे, झाल्यास वेळेवर निदान करुन उपचार केले पाहिजे, नाहीतर ही सुंदर नाजूक फुलं रणरणत्या उन्हाळयात नाहक कोमेजून जातील.
बालउष्माघाताची लक्षणे व उपाय :
कडक उन्हाळा, बंद खोली, भरपुर कपडे, शुष्कता स्थिती अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे बालउष्माघाताची सर्व तयारी पुर्ण झाली असे समजावे. या परिस्थितीत योग्य ते बदल केले नाही तर आजाराच्या गांभीर्याप्रमाणे बालउष्माघाताच्या तीन पाय-या ओळखता येतात.
| पायरी | तापमान (फॅ.) | हृदयाचे ठोके | डोळे | तोंड व जीभ | लघवी | इतर लक्षणे | उपाय |
|---|---|---|---|---|---|---|---|
| पायरी 1 | 99 ते 101 | 150 खाली | थोडे खोल | सुकलेली | कमी | खूप रडणे, आतडी, चेहरा लाल | मीठ-साखर पाणी, जलसंजीवनी, ओल्या फडक्याने पुसणे |
| पायरी 2 | 101 ते 104 | 150 ते 200 | खूप खोल | थोडा ओलावा | 8 तास नाही | रडणे, दम लागणे | अॅडमीट, सलाईन |
| पायरी 3 | 104 वर | 200 वर | खोल व मऊ | पूर्ण कोरडे | 12 तास नाही | दम लागणे, झटका येणे, बेशुद्ध होणे | अॅडमीट, थंड करणे, थंड खोली, थंड पाण्याने उपचार, तातडीचा औषधोपचार |
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
#

