श्रीराम श्रीराम श्रीराम !
सर्वांचा निरोप घेऊन राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाले. रथ त्यांची वाटच पाहत होता. जनतेला अनावर, दुःख झाले होते. लोक धाय मोकलून रडत होते. एक प्रचंड जनसागर त्यांच्या रथाच्या मागून चालत निघाला. कुणालाच रामाला एकटं सोडायचे नव्हतं. सगळ्यांनाच रामाबरोबर वनवासात जायचे होते.
रामानी हात जोडून सगळ्या लोकांना विनंती केली की त्यांनी परत जावं. कुणीही त्याचं ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. लहान मोठे स्त्री-पुरुष सगळे मागून चालत होते.
रथ तमसा नदीच्या किनारी पोचला. रात्र झाल्याने रामाने प्रवास थांबवला व विश्रांती घ्यायचा निर्णय घेतला. बरोबर आलेला, जनसागर सुद्धा तिथेच थांबला. दुःखानी आणि चालून चालून थकल्याने सगळे लोक लगेच आजूबाजूला जमिनीवरच झोपी गेले.
मध्यरात्री रामानी मंत्री सुमंत त्यांना उठवले आणि हळू आवाजात त्यांच्या कानात सांगितले. या बरोबर आलेल्या लोकांना आयोध्येत परत जावेच लागेल. तरच माझं कर्तव्य आणि माझं ध्येय पूर्ण होईल. कुणीही उठायच्या आत आपण रथात बसून आवाज न करता निघून जाऊ.
सुमंतांनी तसेच केले झोपलेल्या बिचार्या श्रद्धाळू लोकांना सोडून रथ आवाज न करता शांतपणे जंगलाच्या दिशेने निघाला.
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

