श्रीराम श्रीराम श्रीराम !
श्रीरामाच्या वनवासाने राजा दशरथाची परिस्थिती दयनीय झाली होती. श्री रामाच्या आठवणीने राजा दशरथ तळमळत होता. मंत्री सुमंत धीर देत होते. आधार देत होते. राजा, तू धार्मिक आहेस. चांगला शिकलेला विद्वान आहेस. धैर्यवान आणि शूरवीर आहेस. आयुष्यात चढ उतार येत असतात. अंधार आणि उजेड येत असतात. चांगल्या घटना, वाईट घटना, घडत असतात. सुख आणि दुःख येत असते. जात असते. तुझ्यासारख्या तपस्वी व्यक्तीने या परिस्थितीचा शांतपणे, सामना करायला हवा.
राजा दशरथाला आठवले. श्रावण बाळाच्या अंध आई-वडिलांच्या शापामुळेच हे सगळे घडते आहे.
एकदा राजा दशरथ जंगलात शिकारीला गेला होता. अंधार पडू लागला होता. राजाला नदीकाठाच्या दिशेने झुडपाच्या आड कुणीतरी जनावर पाणी पीत असल्याचा आवाज आला. राजाने मारलेला धनुष्याचा बाण लागून, “अगं आई ग, मेलो” असा आवाज ऐकू आला. धावत जाऊन राजाने पाहिले तर एका तरुणाच्या छातीत तो बाण घुसला होता. तरुण वेदनेने तळमळत होता. त्यानी सांगितले माझे नाव श्रावण आहे. माझे आई-वडील वृद्ध आणि अंध आहेत. मी त्यांना खांद्यावर कावडीत घेऊन चालत तीर्थयात्रेला निघालो आहे. ते तहानलेले आहेत. त्यांना हे पाणी प्यायला नेऊन दे. असे म्हणून तो गतप्राण झाला.
राजा दशरथ श्रावण बाळाच्या वृद्ध आई-वडिलां जवळ आला. श्रावणाच्या मृत्यूची हृदय द्रावक हकीकत सांगितली. श्रावणाच्या आई-वडिलांनी दुःखानी टाहो फोडला. आणि मृत्यूशयेवर असतानाच राजा दशरथाला शाप दिला. “आमच्यासारखाच तुलाही मुलाच्या विरहानेच मृत्यू येईल”.
राजा दशरथ म्हणाला, तो भयानक शाप आज खरा होणार आहे. राम… राम… राम…
दशरथाच्या घशाला घरघर लागली. श्रीरामाच्या चैतन्यमयी मूर्तीचे ध्यान करत त्याने प्राण सोडला. त्याचे निधन झाले. तो स्वर्गवासी झाला.
प्रभू श्री रामचंद्र की जय.
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

