श्रीराम श्रीराम श्रीराम !
जगात चांगली माणसे जास्त वाईट माणसे कमी असतात. पण राक्षसांच्या राज्यात दुष्ट राक्षस जास्त. आणि एखादाच चांगला बिभीषण असतो. बिभीषणाने सांगितल्यावरून हनुमान सीतेला शोधायला अशोक वनात गेला. अशोक वन अतिशय सुंदर होते. हजारो फळांच्या फुलांच्या झाडांनी बहरलेले होते. शेकडो राक्षसिणी तिथे पहाऱ्यावर होत्या. एका अशोक वृक्षाच्या झाडाखाली पारावर बसलेली सीतामाता हनुमानाला दिसली.
हनुमान शांतपणे त्या झाडावरून खालील दृश्य पहात होता. राक्षसिणी सीतेला छळत होत्या. सीता, दुःखी, कष्टी, हताश दिसत होती. कुणीही समोर नाही हे बघून संधी साधून हनुमानाने खाली उडी मारली आणि सीतेसमोर उभा राहिला. सीता घाबरली. तिला वाटले कुणी तरी मायावी राक्षस माकडाचे रूप घेऊन आपल्याला छळायला आलेला आहे.
श्रीरामाने दिलेली खुणेची अंगठी सीतेसमोर टाकून हनुमान म्हणाला. मी श्रीरामांचा दूत आहे त्यांनी मला पाठवले आहे. माझी ओळख पटवायला ही अंगठी दिली आहे. अंगठी पाहून सीतेला हायसे वाटले. श्रीराम व लक्ष्मण आपल्याला सोडवायला येत आहेत हे ऐकून तिला आधार वाटला. पण साध्या माकडांचे सैन्य या बलाढ्य राक्षसांना कसे हरवणार. सीतेला चिंता वाटू लागली. हनुमानाने हळूहळू मोठे होत आपल्या प्रचंड स्वरूपाचे दर्शन सीता मातेला घडवले. आणि तिचा हनुमानावर विश्वास बसला.
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

