श्रीराम श्रीराम श्रीराम !
अशोकवनात हनुमानाची सीतेशी भेट झाली. अनेक दिवस त्यानी काही खाल्लंच नव्हतं. त्याच्या पोटात कावळे कोकलत होते. समोर हजारो झाडे आणि त्यांना लगडलेली लाखो फळे! मग काय—हनुमान संपूर्ण अशोकवनावरच तुटून पडला!
रसाळ फळे तोंडात बकाबका कोंबली. झाडे उखडली फांद्या मोडल्या जमिनीवर फळांचा चिखलच झाला! पहाऱ्याच्या राक्षसिणी, घाबरून मागे सरकल्या. “कोण हा माकड?” त्यांना कळेना. रावणापर्यंत ही बातमी पोचलीच! “एका माकडाने संपूर्ण अशोकवन उद्ध्वस्त केले आहे!” रावणाचा राग अनावर झाला. “त्याला ठेचून टाका!”
रावणानी राक्षस सैन्य पाठवले. पण शक्तीमान, बुद्धिमान, हनुमानापुढे, काही ते टिकले नाही. एका क्षणात सगळे गडाबडा लोळत पडले! शेवटी रावणाने स्वतःच्या बलाढ्य मुलाला पाठवले—अंगदला!
हनुमानाच्या मनात एक योजना होती. हनुमानाला तर रावणाच्या दरबारात जायचे होते. सगळ्या गुप्त बातम्या रामापर्यंत, पोचवायच्या होत्या. मग काय? त्याने हुशारीने नाटकच रचले! लढता लढता तो अचानक जोरात ओरडला आणि बेशुद्ध पडला. मूर्च्छित झाला. राक्षसांनी त्याला दोरखंडानी घट्ट बांधले. आणि उचलून रावणाच्या दरबारात आणले.
रावण ऐटीत उंच सिंहासनावर बसला होता. पण हनुमानाने आपली शेपटी लांबवली गुंडाळली आणि मोठ्ठं उंच आसन पूच्छासनच तयार केलं आणि रावणापेक्षा फूटभर उंच बसला!
“तुच्छ माकडा “अशोकवन उध्वस्त केल्याची शिक्षा तुला मिळेल—मृत्युदंड!” इतक्यात विभीषण उठला. “राजन् हा राजदूत आहे! तोही रामाचा. राजदूताला मारायचे नसते. त्याला दुसरी काहीही शिक्षा द्या” रावण विचारात पडला. त्याच्या डोक्यात कल्पना चमकली. “शेपूट पेटवा याची. शेपटीला चिंध्या बांधा. त्यावर तेल टाका! पेटलेल्या शेपटासह याला गावभर फिरवा. धिंड काढा त्याची! मग समजेल याला राक्षसशक्ती काय असते ते!”
दरबारी राक्षस पेटलेल्या शेपटाकडे पाहून खदाखदा हसू लागले. हनुमानाची टिंगल टवाळी करू लागले. आणि हनुमान? तो तर पेटलेल्या शेपटाकडे पाहून मनातल्या मनात गालातल्या गालात खुदुखुदू हसत होता! त्याच्या सुपिक डोसक्यात एक भन्नाट आयडियाची कल्पना शिजत होती…
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

