रावणाची राणी मंदोदरी म्हणाली “रामाशी वैर म्हणजे विनाश!” रावण कुजकटपणे म्हणाला. रामाच्या पराक्रमाच्या फक्त अफवा आहेत. त्या लहान सहान मुलांना कच्च्या-बच्चांना सांगायच्या कपोल कल्पित कथा आहेत.
हे जंगलात राहणारे फळे कंदमुळे खाणारे माकडांसोबत फिरणारे भगवे कपडे घालणारे भिक मागून जगणारे माझ्यासारख्या सर्व शक्तिमान राजाशी कसे काय लढणार. त्याला विश्वासच नव्हता की रामही कधी जिंकू शकतो. राक्षसी शक्ती अमर आहे, विध्वंसातच विजय आहे! असेच त्याला वाटत होते. मंदोदरीचा सल्ला फेटाळून रावण युद्धाला निघाला.
युद्ध सुरू झाले. श्रीरामांनी हुकूम दिला “आक्रमण करा!” वानरांनी शंखनाद केला. रणदुंदुभी वाजल्या. “प्रभू श्रीरामचंद्र की जय!” अशा जयघोषात वानर लंकेत घुसले.
राक्षसांकडे संहारक शस्त्रे होती. वानरांनी प्रचंड दगडफेक केली वृक्ष उचलून भिरकावले. लंकेचा अभेद्य तट ढासळला! राक्षसांनी मायावी गरम राखेचा पाऊस वानर सैन्यावर पाडला. सगळीकडे अंधार दाटला पण रामाने अग्निबाण सोडला. तेजस्वी प्रकाशात, वानरांनी पुन्हा जोरदार हल्ला केला. राम-लक्ष्मणाच्या बाणांचा वर्षाव सुरू झाला. अस्वल सैन्यही मदतीला धावले. राक्षस गडगडत पडले किंकाळ्या फोडू लागले. वानर सेना वरचढ ठरली. लंकेत रामाच्या विजयाचा बिगुल वाजू लागला.
प्रभू श्रीरामचंद्र की जय!
प्रभू श्रीरामचंद्र की जय!
प्रभू श्रीरामचंद्र की जय!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

