श्रीराम श्रीराम श्रीराम !
सीता राम अयोध्येत परतले. सुंदर आणि आदर्श “रामराज्य” उभारलं. सगळीकडे आनंद होता शांतता होती. लोक सुखी होते सुरक्षित होते. कोणालाच उपासमार नव्हती अन्याय नव्हता रोगराई नव्हती.
राम आणि सीता प्रजेवर प्रेम करत. लोकांचं भलं व्हावं म्हणून दिवसरात्र काम करत. धर्म संस्कृती यांना महत्त्व देत. लोक प्रामाणिक होते.
अयोध्येत अपराध नव्हते भांडणं नव्हती. सगळेजण एकमेकांशी सन्मानाने वागत. ऋषींना देवासारखा मान मिळत होता. विद्वानांचं आदराने स्वागत होतं. संरक्षणासाठी भक्कम सैन्य होतं. खजिना पैशांनी भरला होता.
लहान मुलं गुरुकुलात शिकत. विद्वान आचार्य त्यांना चांगले संस्कार देत. अयोध्येतील लोक श्रीरामांच्या उत्तम चारित्र्याचं अनुकरण करत. म्हणूनच सगळेजण सुखी आणि समाधानी होते. राम हे दीपस्तंभ होते. मार्ग दाखवणारे. प्रकाश देणारे.
पण… या आनंदनगरीत कुणाला तरी हे सगळं बघवत नव्हतं! कुणाच्या तरी मनात मत्सराचा किडा वळवळत होता. आणि मग कुणीतरी खोडसाळपणे कुजबुज सुरू केली. “रावणाच्या ताब्यातली सीता पवित्र कशी?” अयोध्येवर संकटाचे काळे ढग येऊ लागले होते.
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

