रामायणाच्या गोष्टी 49 – लव-कुशांचे बालपण

श्रीरामांची आज्ञा. म्हणून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडलं. सीतेनी त्याला सांगितलं” या वनात एकटी जाणं माझ्या नशिबात आहे, पण रामांचा वारसा माझ्या पोटात वाढतोय.” दुःख होऊ नये म्हणून ही बातमी कर्तव्यकठोर रामाला त्याने कधीच सांगितली नाही.

भागीरथी नदीच्या तीरावर वाल्मिकी ऋषींना सीता एकटी सापडली. त्यांनी सन्मानाने तिला आश्रमात आसरा दिला. सुरक्षेच्या दृष्टीने तिचे नाव “वैदेही” ठेवले. तिला मायेचं पांघरूण मिळालं. गर्भारपणी, चांगला नैसर्गिक, आहार, विहार, विचार आणि, गर्भसंस्कार, मिळाले.

नऊ महिन्यांनी दोन तेजस्वी बाळांचा जन्म झाला. लव आणि कुश! त्यांच्या बाल लीलांनी सगळे आनंदले. त्यांचं बालपण आनंदी होतं. म्हणून मोठेपणी ते यशस्वी झाले.

वाल्मिकी ऋषींनी त्यांना प्रेम दिलं. संस्कार दिले. शिक्षण दिलं. भारतीय गुरुकुल शिक्षण परंपरे प्रमाणे 6 शास्त्रं आणि 64 कला, शिकवल्या. पारंगत केलं. कुणाशी कसं वागायचं. समाजाचे नितीनियम शिकवले. त्यांच्या जीवनाला एक शिस्त लावली.

लव ला धनुर्विद्या आवडायची. दिवस संपला तरी सराव चालूच. कुश ला संगीत आवडे. त्याच्या स्वरांनी संध्याकाळी आश्रम भारून जायचा.

लव आणि कुश ८-१० वर्षांचे झाले. त्यांची मुंज झाली. अल्लड बालपण संपून अनेक गोष्टी शिकण्याची विद्यार्थीदशा सुरू झाली. ते चौकस, हुशार, उत्साही, आनंदी, समंजस, तेजस्वी, आत्मविश्वासू आणि प्रेमळ झाले. त्यांना बघून कौतुकाने कुणीही म्हणायचे, “मुलं असावी तर अशी. आदर्श”

वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली रामकथा तर मुलांची तोंड पाठ होती. आवडती होती. आश्रमात त्यांची ओळख फक्त “वैदेही”चे, गुणी सुपुत्र अशीच होती. अजूनही रामकथेचं सत्य त्यांच्या आयुष्याशी जोडलं गेलं नव्हतं. ते क्षण लवकरच येणार होते.

प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top