रामायणाच्या गोष्टी 50 – रामाचा अश्वमेध

सीता वनात गेली. अयोध्येवर सृष्टी रुसली. पावसाचा थेंब नाही. नदी-नाले सुकले. शेतं करपून गेली. धान्य पिकलं नाही. प्रजेची उपासमार झाली. तहानलेली जनावरं वणवण भटकत होती. पक्षी तडफडत होते. सगळीकडे दु:ख आणि हाहाकार माजला होता.

हे बघून, राम अस्वस्थ झाले. प्रजेचं दु:ख त्यांना, सहन होईना.
गुरु वशिष्ठांनी सांगितले. सृष्टीच्या कोपावर एकच उपाय.
“अश्वमेध यज्ञ”.

रामांनी तयारी सुरू केली. शुभ्र पांढरा घोडा निवडला. त्याच्या गळ्यात सोन्याची पाटी लटकवली —”जो या घोड्याला अडवेल त्याला रामाशी युद्ध करावं लागेल!”घोडा गावोगाव धावत सुटला. अनेक राजांनी रामाची सत्ता मान्य केली. घोडा वाल्मिकी आश्रमाजवळ पोचला.

लव कुश खेळत होते. त्यांनी इतका उमदा इतका सुंदर इतका पांढरा शुभ्र घोडा कधीच पाहिला नव्हता. तो त्यांना खूप आवडला. घोड्याला पकडून त्यांनी एका झाडाला बांधून ठेवले.

घोड्याच्या गळ्यातली पाटी वाचली. दोघंही थबकले. “हा तर रामाचा घोडा!” लव म्हणाला. “त्याच रामाचा ज्यांनी आपल्या निरपराध आईला जंगलात सोडलं!” “आपल्या आईवर अन्याय करणाऱ्या राजाचा अश्वमेध आपण अडवायचाच!” कुश ठामपणे म्हणाला.

थोड्याच वेळात रामाची सेना आली. सेनापतीने हुकूम दिला, “घोडा सोडा!””नाही!” लव-कुश ठामपणे म्हणाले. युद्ध सुरू झालं. लव-कुश लहान असले तरी शूर आणि पराक्रमी होते. त्यांनी रामाची बलाढ्य सेना पराभूत केली. लक्ष्मण स्वतः युद्धासाठी आले. पण लव-कुशांनी त्यांनाही हरवलं.
शेवटी राम स्वतः आश्रमात आले. त्यांनी या लहान मुलांचं धैर्य पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं.

पण इतक्यात गुरु वशिष्ठ पुढे आले. त्यांनी आपले शिष्य लव कुश यांना आदेश दिला “युद्ध थांबवा!” त्याक्षणी लव कुश थांबले. गुरूची आज्ञा पाळली. सगळीकडे शांतता पसरली. रामाच्या सेनेला घाबरून नाही. गुरूची आज्ञा म्हणून ते थांबले. राम त्या शूर मुलांकडे बघतच राहिले. त्यांना प्रश्न पडला. कुणाची असतील बरे इतकी तेजस्वी शहाणी आणि आज्ञाधारक मुले?

प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top