श्रीराम श्रीराम श्रीराम !
लवकुश रामाच्या सैन्याशी लढतच होते. श्रीरामांना प्रश्न पडला “इतकी शूर मुलं कोण आहेत?” वाल्मिकी ऋषींनी लवकुशांना आज्ञा दिली.
“रामाशी युद्ध, थांबवा! आणि आता यापुढे रामाचं गुणगान करा. मी शिकवलेलं रामायण गा! श्री रामांचं चरित्र त्यांनाच ऐकवा. पण दान घेऊ नका इनाम घेऊ नका!”
गुरुजींची आज्ञा ऐकून लवकुश नरमले. त्यांना कळलं – “आपल्याला गुरुजींचं ऐकावंच लागेल.” ते समंजसपणे आपले वागणे, बदलायला तयार झाले.
सीता दोघांना बाजूला घेऊन म्हणाली “पती म्हणून त्यांचं प्रेम खरं होतं. राजा म्हणून त्यांनी कर्तव्य केलं. प्रजेच्या भल्यासाठी त्यांना मोठा त्याग करावा लागला.”
आईचे ऐकून लवकुश बदलले. धनुष्यबाण खाली ठेवले. युद्धाचा वेष बदलला. आश्रमाचा भगवा वेष परिधान केला. रामायण गाण्यासाठी परत आले. रामायणाच्या गोष्टी सांगता-सांगताच ते स्वतः आतून आमूलाग्र बदलले. ते समंजस झाले. ते जबाबदार झाले. ते मोठे झाले. ते तरुण झाले.
त्यांचे तेजस्वी रामायण गायन ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले.
श्रीरामही अतिशय खुश झाले. वाल्मिकी ऋषींनी सांगितले “श्रीरामा, हे दोघे तुझेच पुत्र आहेत!”
लवकुशांनी श्रीरामांची अनवधानानी म्हणजे अजाणते पणी युद्ध केले म्हणून क्षमा मागितली. त्यांचे पाय धरले.
त्यांचे आशीर्वाद मागितले. श्रीरामांनी त्यांना कडकडून मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. संपूर्ण आश्रम आनंदात न्हाऊन गेला.
महर्षींनी सीतेलाही बोलावले आणि रामाला सांगितले “ही शुद्ध आहे पवित्र आहे. माझी आज्ञा म्हणून तू हिचा स्वीकार कर.”
श्रीराम म्हणाले, “हो! मी संपूर्ण जनतेसमोर भर दरबारात हिचा स्वीकार करायला तयार आहे. लवकुशांनाही अयोध्येत घेऊन जाईन. पण… अजूनही पण होताच!” संपूर्ण आश्रमात आवाज घुमला.
प्रभू श्रीरामचंद्र की जय!
प्रभू श्रीरामचंद्र की जय!
प्रभू श्रीरामचंद्र की जय!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)