श्रीराम, श्रीराम, श्रीराम!
अयोध्येमध्ये आनंदी आनंद होता. राम लक्ष्मण राजा दशरथाला राज्यकारभारात मदत करत होते. पण, राजा दशरथाला, एक दिवशी जाणवले. आपण वृद्ध हो चाललो आहोत. म्हातारपण आलेले आहे. केस पांढरे झाले आहेत. आता, रामाच्या हाती, राजमुकुट सोपवून निवृत्त व्हायची वेळ आली आहे. आता तपश्चर्या करण्याची आणि देवपूजा करण्याची वेळ आलेली आहे.
राजा दशरथाने गुरु वशिष्ठांचा सल्ला घेतला. गुरु वशिष्ठ म्हणाले राम एक उत्कृष्ट राजा होऊ शकेल. पण त्याला आधी राज दरबार, बोलवावा लागेल. सर्व मंत्र्यांना बोलवावं लागेल. त्यांची जनतेची प्रजाजनांची संमती घ्यावी लागेल.
राजा दशरथाने दुसऱ्याच दिवशी दरबार बोलावला. आणि रामाला राज्याभिषेक करण्याचा आपला विचार सगळ्यां समोर मांडला.
संपूर्ण राजदरबाराने एक मुखाने घोषणा केली. आम्ही सर्व जण तुमच्याशी सहमत आहोत. राजकुमार राम हा एक आदर्श आहे. दयाळू आहे. शूर आहे. शहाणा आहे. नीतिमान आहे. आम्हाला सर्वांना तो आवडतो. संपूर्ण राजदरबारात एक सुद्धा दरबारी रामाला राजा करण्याच्या विरोधात नव्हता.
राजा दशरथाने रामाला बोलवून सांगितले की या दरबाराची इच्छा आहे की तू आता राज्यकारभार हाती घेऊन अयोध्येचा राजा व्हावे. जशी आपली आज्ञा प्रभू रामचंद्र म्हणाले. गुरु वशिष्ठांनी ग्रह नक्षत्रांचे गणित मांडून राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. रामाच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकून आयोध्या नगरवासी खुश झाले. ते त्यांचे स्वप्न होते.
गुरु वशिष्ठांनी राम व सीतेला राजाची आणि राणीची कर्तव्ये समजून सांगितली.
ते म्हणाले राजा होणे सोपे नाही. ते एक आव्हान आहे. राजा हा प्रजेचा मालक नसतो. सेवक असतो. जनतेमधून आलेल्या मंत्रिमंडळाचे म्हणणे राजाने नेहमी लक्षात घ्यावे. दरबारातील लोकांकडे दुर्लक्ष करू नये. कारण तेच राजाचे डोळे असतात आणि कान असतात. राजाच्या मनात सर्वांविषयी दयाभाव हवा. न्याय गरिबांपर्यंत पोचायला हवा. युद्धात सैन्याचे नेतृत्व करायला हवे.
सीतेलाही गुरु वशिष्ठांनी राणीची कर्तव्ये सांगितली. आणि शेवटी दोघांनाही मनापासून आशीर्वाद दिले.
प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्रीरामचंद्र की जय.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

