रामायणाच्या गोष्टी 17 – लक्ष्मणानी शुर्पणखेचे नाक कापले

चित्रकूट पर्वतावरील पर्णकुटीत राम लक्ष्मण सीता राहतात हे अयोध्येच्या लोकांना कळले होते. वनवासाची प्रतिज्ञा पाळण्यासाठी, तिघेही चित्रकूट पर्वतावरून निबिड जंगलात निघाले. वाटेत त्यांना अत्री ऋषींचा आश्रम लागला. जवळच त्यांना एक मानवी हाडांचा म्हणजे माणसांच्या हाडांचा प्रचंड मोठा डोंगर दिसला. तो हाडांचा डोंगर अवाढव्य विराघ राक्षसाने मारलेल्या लोकांच्या हाडांचा निघाला. श्री रामाने एकाच बाणात त्याला यमसदनास पाठवले. म्हणजे मारून टाकले.

जंगलातून मजल दरमजल करत राम लक्ष्मण सीता अगस्ती ऋषींच्या आश्रमात पोचले. तो आश्रम दंडकारण्यात होता. अगस्ती ऋषींनी भयाण उजाड आणि रुक्ष असा दंडकारण्याचा भूभाग पर्जन्यवृष्टी करून म्हणजे पाऊस पाडून झाडा फुलांनी बहरून टाकला. आणि दंडकारण्याचा प्रदेश सुपीक केला होता. अगस्ती ऋषींनी श्रीरामाला आत्ताच्या नाशिक जवळील पंचवटीचा मार्ग दाखवला. तिथे वास्तव्य करावे असे सुचवले.

पण तो प्रदेश शुर्पणखा नावाच्या लांब लांब नखे असलेल्या एका राक्षसीचा होता. तिचे शरीर बेढब आणि रूप, अक्राळ विक्राळ होते. ती लंकेचा राजा रावण याची बहीण होती. श्रीराम व लक्ष्मणाचे, मोहक रूप बघून ती वेडीच झाली. तिने एक रामायणातील सुप्रसिद्ध असुरी हास्य केले. हॅ हॅ हॅ हॅ. हॅ हॅ हॅ हॅ. तिने एका सुंदर तरुण मुलीचे मायावी रूप घेतले. आणि रामाला लग्नासाठी मागणी घातली. पण रामानी सीतेकडे बोट दाखवून सांगितले ही माझी पत्नी आहे. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मग तिने, लक्ष्मणाला मागणी घातली. लक्ष्मणानी सांगितले मी रामाचा आजन्म सेवक आहे. माझ्याशी लग्न केले तर तुला जन्मभर रामाची दासी बनून राहावे लागेल.

राम लक्ष्मण यांनी नकार दिल्याने शुर्पणखेला राग आला. तिनी आपल्या अजस्त्र हातानी एखादे फूल उचलतात तसे सीतेला उचलले. ते दृश्य बघून रामानी लक्ष्मणाला आज्ञा केली. लक्ष्मणा या दुष्ट शुर्पणखेचे नाक काप. लक्ष्मणानी तत्काळ आपली तलवार काढून एका झटक्यात शुर्पणखेचे नाक आकाशात उडवून लावले. रक्तबंबाळ शुर्पणखा रडत रडत आपला भाऊ रावण याच्याकडे राम-लक्ष्मण यांची तक्रार घेऊन गेली.

प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय

Scroll to Top