श्रीराम श्रीराम श्रीराम !
नाक कान कापलेली रक्तबंबाळ शूर्पणखा राक्षसीण रडत ओरडत आपला सख्खा भाऊ रावण याच्याकडे गेली. बहिणीची विद्रूप आणि केविलवाणी अवस्था बघून रावण संतापाने लाल लाल झाला. शूर्पणखेने रावणाला सीतेच्या सौंदर्याचे रसभरीत वर्णन ऐकवले. रामाचा वध करून सीतेला पट्टराणी करण्याची प्रतिज्ञा रावणाने घेतली. शूर्पणखेने रावणाला सांगितले. राम महापराक्रमी आहे. त्यावर कपटी, बेसूर, हास्य करत रावण म्हणाला. जिथे, शक्तीचा उपयोग होत नाही तिथे कपट नीती वापरावी. छळ कपट करावे. सरळ साध्या माणसांची फसवणूक करावी. आणि आपला दुष्ट हेतू साध्य करून घ्यावा. रावणाला तर सीताच हवी होती.
रावण मारीच राक्षसाला भेटला. मारीच राक्षसाला मायावी शक्तीने कोणतेही रूप घेता येत होते. रावणानी मारीचाला सांगितले. तू कांचन मृगाचे म्हणजे सोनेरी हरणाचे रूप घेऊन रामाच्या पर्णकुटीकडे जा. सोनेरी हरणाच्या मोहात पडून सीता रामाजवळ हट्ट करेल. राम तुझ्या मागे पळत येईल. आणि मी माझा डाव साधेन. मारीच राक्षसाला ते मान्य करणे भाग पडले. आणि तसेच झाले.
सीतेला आपल्या पर्णकुटी जवळ एक सोनेरी हरीण फिरताना दिसले. त्या हरणाच्या सौंदर्याने सीतेला मोहित केले. सीतेला, ते हरिण खूपच आवडले. सीतेने रामाजवळ हट्ट केला. असे अद्वितीय सुंदर हरिण आपल्या अंगणात बागडत हवे. रामाने तिची समजूत काढायचा प्रयत्न केला. श्रीरामाला शंका आली. एखाद्या मायावी राक्षसाने सोनेरी हरणाचे रूप घेतले असावे. असे, सोनेरी हरीण पृथ्वीवर असूच शकत नाही.
मृगजळाच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही. रखरखीत वाळवंटात दूरवर पाणी असल्याचा भास होणे म्हणजे मृगजळ. ते खरे नसते. त्याच्यामागे धावायचे नसते. पण सीता काही आपला हट्ट सोडेना. शेवटी श्रीरामांचा नाईलाज झाला. लक्ष्मणाला सीतेचे रक्षण करायला सांगून श्रीराम आपले दिव्य धनुष्यबाण घेऊन सोनेरी हरणाचा जंगलात पाठलाग करू लागले. राम लक्ष्मण सीता सोनेरी हरणाच्या मोहाच्या सापळ्यात पूर्णपणे अडकले.
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

