रामायणाच्या गोष्टी 19 – सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली

श्रीराम दिव्य धनुष्य घेऊन सोनेरी हरणाचा पाठलाग करू लागले. ते मायावी हरीण श्रीरामांना हुलकावणी देत खोलवर जंगलात लांब निघून जाई. श्रीरामांनी एकच तीक्ष्ण बाण त्या हरणावर सोडला. हरणाचे रूप घेतलेला मारीच राक्षस धाडकन जमिनीवर पडला. मारीच राक्षसाने पडता पडता श्रीरामाचा आवाज काढून लक्ष्मणा धाव रे मी मेलो. लक्ष्मणा धाव रे मी मेलो. लक्ष्मणा धाव रे मी मेलो. अशी आरोळी ठोकली. श्रीराम संकटात आहे हे ऐकून सीता घाबरली. भेदरली. तिने लक्ष्मणाला आज्ञा दिली. आत्ताच्या आत्ता श्रीरामांच्या मदतीला जा. लक्ष्मणाची सीतेला जंगलात एकटे सोडून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण कधी कधी स्वतःच्या इच्छेविरुद्ध वागावे लागते. लक्ष्मणाने जंगलात श्रीरामांच्या मदतीसाठी जाण्याचे ठरवले.

लक्ष्मणाने श्रीरामांचे नाव घेऊन एका बाणाने पर्णकुटीच्या सभोवताली जमिनीवर एक रेषा काढली. आणि सीतेला सांगितले. ही लक्ष्मण रेषा आहे. तिच्या आत कोणी येऊ शकणार नाही. पण सीतेने ही लक्ष्मण रेषा ओलांडून जाऊ नये. बाहेर धोका आहे.
लक्ष्मण रेषा म्हणजे नियम. सुरक्षेचे नियम कधीही मोडायचे नसतात. लहानपणी आई वडील नियम बनवतात. ते मुलांनी पाळायचे असतात. मोठेपणी आपले आपणच नियम पाळायचे असतात. ट्रॅफिक सिग्नल लाल झाल्यावर भर चौकातून गाडी दामटली तर ॲक्सीडेंट होणारच. लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा. ती कधीही ओलांडायची नसते.

लक्ष्मण दूर गेलेला पाहून रावण एका साधूचे रूप घेऊन पर्णकुटी बाहेर भिक्षापात्र घेऊन आला. सीता भिक्षा द्यायला आली. पण ती काही लक्ष्मण रेषा ओलांडेना. तिथे लक्ष्मण रेषा आहे हे रावणाच्या लक्षात आले. त्यानी चक्कर येऊन पडल्याचे नाटक केले. मी भुकेने तळमळत आहे. माझ्या अंगात एकही पाऊल पुढे टाकायची शक्ती नाही. तूच माझ्यापर्यंत येऊन मला भिक्षा दे. असे रावणाने सीतेला सांगितले. भुकेने होणारी त्याची तडफड पाहून सीतेला त्याची दया आली. आणि ती साधूच्या रूपात आलेल्या रावणाला अन्न द्यायला पुढे आली.

रावणाने तिचा हात एका झटक्यात पकडला. जबरदस्तीने आपल्या रथात ओढले. आणि आकाश मार्गाने लंकेकडे निघाला. घाबरून सीता आरडाओरडा करू लागली. तिची दयनीय अवस्था पाहून जंगलातले पशुपक्षीही ओरडू लागले.

सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि तिचा घात झाला. दुष्ट राक्षस रावणाने डाव साधला, सीतेला पळवून नेले. सीतेचे अपहरण झाले.

प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय

Scroll to Top