रामायणाच्या गोष्टी 20 – जटायूच्या बलिदानाने सीतेच्या शोधाला दिशा मिळाली.

सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून रावणाला सीतेला पळवून नेण्याची संधी मिळाली. अतिशय दुःखात असलेले राम, लक्ष्मण घनदाट जंगलात सीतेला शोधू लागले. एका झुडपामागून त्यांना कुणाचा तरी कण्हण्याचा आवाज ऐकू आला. तो गरुडांचा राजा, जटायू याचा आवाज होता. जटायू रामभक्त, शूर, पराक्रमी, आणि सद्वर्तनी होता.

जटायूने रावण सीतेला आकाश रथातून पळवून नेत आहे हे बघितले. सीता आक्रोश करत होती. संकटात सापडलेल्या स्त्रीला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे हे जटायूला माहीत होते. जटायूने, रावणावर, हल्ला केला. तुंबळ युद्ध झाले. त्याने आपल्या चोचीने रावणाला हजारो जखमा केल्या. रावणाचा आकाश रथ मोडण्याचा प्रयत्न केला. पण रावणाने तलवार काढली आणि जटायूचे दोन्ही पंख छाटून टाकले. जटायूचे प्राण त्याच्या पंखात होते. पंख छाटले गेल्याने जटायू निष्प्रभ झाला. शक्तीहीन झाला. व जमिनीवर कोसळला. तो वेदनेने तळमळत होता. विव्हळत होता. कण्हत होता.

जखमांमधून रक्ताच्या धारा वाहत होत्या. पण श्रीराम सीतेला शोधत येतील याची त्याला खात्री होती. श्रीरामांची भेट झाल्या झाल्या रावण सीतेला घेऊन आकाश मार्गे दक्षिण दिशेला गेल्याचे सांगितले. आणि मगच त्यानी श्रीरामांच्या हातात आपला प्राण सोडला.

जटायूच्या बलिदानाने सीतेच्या शोधाला दिशा मिळाली आणि राम-लक्ष्मण सीतेला शोधायला दक्षिण दिशेला निघाले.

Scroll to Top