श्रीराम श्रीराम श्रीराम !
सीतेचा शोध घेण्यासाठी रामभक्त हनुमान लंके कडे जायला तयार झाला. त्याच्या पराक्रमाला हुशारीला आणि चातुर्याला ते एक आव्हानच होते. त्यानी आपले शरीर हलवून एक प्रचंड गर्जना केली. आपले शेपूट फाडकन जमिनीवर आपटले. हळूहळू त्याचे शरीर पर्वताएवढे मोठे झाले. रागानी त्याचे डोळे लाल लाल झाले. आपले प्रचंड हात पसरून त्यानी श्रीरामांचे नाव घेतले “जय श्रीराम” आणि निळ्या आकाशात रामेश्वरमच्या समुद्र किनाऱ्यावरून उड्डाण केले.
रामेश्वरम पासून लंका 100 योजने दूर होती. एक योजन म्हणजे 20 किलोमीटर. आणि 100 योजने म्हणजे 2000 किलोमीटर. एका उडीत, दोन हजार किलोमीटर, अंतर कापायचे होते.
हनुमानाच्या अंगात ती क्षमता होती. पण ते त्याला माहीत नव्हते. श्रीरामांनी त्याला त्याच्या ताकदीची जाणीव करून दिली. आणि मग त्याचा आत्मविश्वास वाढला.
हनुमान खोबरे खायचा. अंगाला खोबरेल तेलाचे मालिश करायचा. आणि खूप व्यायाम करायचा. खेळायचा. म्हणून तो ताकदवान झाला. आणि प्रचंड ताकदीनं त्यानी उड्डाण केले. वाटेत अनेक विघ्ने आली. समुद्रातून मायावी पर्वत वर आला. आकाशातून राक्षस राक्षसिणि त्याच्यावर चालून आल्या. पण सगळ्यांना हरवून तो विजयी हनुमान श्रीरामचंद्रांचे नामस्मरण करत. समुद्राच्या दुसऱ्या तीरावरील लंकेत जाऊन पोचला.
आता लंकेत सीतामाता कुठे आहे हे शोधायचे होते. आज तुम्ही सगळे, घरी जाऊन हनुमानाचा “गुळ खोबरं” हा प्रसाद आईला मागा. गुळ खोबरे खाऊन हनुमानासारखे शक्तिमान आणि बुद्धिमान व्हा.
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

