श्रीराम श्रीराम श्रीराम !
श्रीरामानी हनुमानाला लंकेची बित्तमबातमी विचारली. स्वारी करायला कोणता मार्ग कमी धोक्याचा आहे. रक्षणासाठी किती सैन्यबळ आहे. लंके भोवती किती कोट आहेत. हल्ला करायला, कोणता मार्ग सोयीचा आहे. राक्षस नागरिकांचे रावणाविषयी काय मत आहे. हनुमानानी हेराच्या नजरेनी लंकेतील अनेक बारकावे टिपले होते.
श्रीरामानी सुग्रीवाला विचारले. एवढा मोठा समुद्र ओलांडून आपले वानर सैन्य लंकेपर्यंत कसे पोचेल. सुग्रीव म्हणाला. काळजी करू नका. आपण सागरावर सेतू उभारू, पूल उभारू त्याचं नाव रामसेतू ठेवू. आणि या रामसेतूवरून आपले कोट्यावधी वानर सैन्य लंकेत घुसवू.
वानर सेनापतींनीभराभर हुकूम सोडले. विस्कळीत वानर सैन्य दाही दिशातून गोळा झाले. पाहता पाहता ते सैन्य एखाद्या सागराप्रमाणे पसरले. लाटांप्रमाणे उसळणाऱ्या वानर सेनेच्या समोर महाप्रतापी श्रीराम आपल्या तेजस्वी पावलांनी चालत होते. वानर सैन्यात विलक्षण उत्साह संचारला होता. जय श्रीराम जय श्रीराम असे नारे दिले जात होते. दुष्ट राक्षस शक्तींना हरवून रामराज्य उभारण्यासाठी विशाल वानर सेना लंके कडे निघाली होती.
जय श्रीराम, या एका ना-याने अनेक राक्षस भयभीत झाले. पण चारी दिशातून जय श्रीराम नाऱ्यानी आकाश दणाणले. वाटेत काही राक्षसांची राज्ये होती. जय श्रीराम या नाऱ्याचा अनेकांना, राग येऊ लागला. जय श्रीराम हा नारा ऐकून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. एवढी प्रचंड मोठी वानर सेना अंगावर येतांना पाहून काही चोरांना वाटले की ही कुठल्या तरी भयंकर आजाराची साथ आहे.
पण सीतामातेचे कपटाने अपहरण केल्याचा राग संपूर्ण भारतवर्षात होता. जनतेचे श्रीरामांना समर्थन होते. सारे वानरसैन्य, अतिशय शिस्तीत सागर तीरावर आले. समोरचा अथांग सागर ओलांडून सगळ्यांना पलीकडे जायचे होते. रामसेतू कोण व कसा बांधणार हाच यक्ष प्रश्न होता. म्हणजे खूप मोठा प्रश्न होता.
वानर सेना स्वारीला, निघाली लंकेला!
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

