रामायणाच्या गोष्टी 36 – अंगदाची शिष्टाई

सीता मातेला परत आणायचं होतं. युद्धाशिवाय दुसरा मार्ग नव्हता. पण युद्ध म्हणजे विनाश ! श्रीरामांना हे टाळायचं होतं.

त्यांनी अंगदाला दूत म्हणून पाठवलं. अंगद हुशार, शूर आणि चतुर होता. तो निर्भयपणे रावणाच्या दरबारात गेला. शेपटीचे आसन करून बसला.

त्याने रावणाला रामाचा निरोप दिला—”राज्य नको, सोन्याची लंका नको. फक्त सीतेला परत दे. आम्ही शांततेत निघून जाऊ.”

अंगदाने समजावलं विनवण्या केल्या. पण रावण अहंकारी होता. तो खदाखदा हसत म्हणाला—”मी सीतेला माझ्या ताकदीवर आणलं. मी तुझ्यासारख्या तुच्छ माकडाचं का ऐकू!” रावणाचा अहंकार अंगदाच्या लक्षात आला.

अंगदाने आपला एक पाय पुढे केला. तो म्हणाला—”हा पाय कुणीही हलवून दाखवावा!”

संपूर्ण दरबार हसू लागला. सर्वांनी प्रयत्न केला. पण अंगदाचा पाय जागचा हलला नाही. शेवटी रावणाने स्वतः प्रयत्न केला. त्याने अंगदाचा पाय धरला. अंगद हसत म्हणाला. “सर्व शक्तिमान सुवर्णलंकेचा राजा रावण एका माकडाचे पाय धरतोय ? धरायचेच असतील तर श्रीरामांचे पाय धर! ते तुला माफ करतील.”

पण रावणाने श्रीरामाचा प्रस्ताव धुडकावला. अंगद निराश झाला. “विनाशकाले विपरीत बुद्धी! मी युद्ध टाळायचा प्रयत्न केला.
पण तुला युद्धच हवंय! श्रीराम तुझी इच्छा पूर्ण करतील!”

अंगदाची शिष्टाई निष्प्रभ ठरल्याचे ऐकून वानरसेना भडकली. त्यांच्या “पवनपुत्र हनुमान की जय, जय श्रीराम” गर्जनांनी लंका हादरू लागली!

प्रभू श्रीरामचंद्र की जय!
प्रभू श्रीरामचंद्र की जय!
प्रभू श्रीरामचंद्र की जय!

Scroll to Top