श्रीराम श्रीराम श्रीराम !
रामराज्य म्हणजे सुखाचं राज्य! सगळ्यांना पोटभर जेवायला. अन्याय नाही. सगळे आनंदात. राजा, राजाचा धर्म, म्हणजे कर्तव्य, पाळे. प्रजा प्रजेचा धर्म म्हणजे कर्तव्य पाळे. शिक्षक शिक्षकांचा धर्म म्हणजे कर्तव्य पाळत. विद्यार्थी विद्यार्थ्यांचा धर्म म्हणजे कर्तव्य पाळत. सगळं आल वेल छान सुरळीत चालू होतं.
पण रामाच्या हेरानं, एक बातमी आणली. “रजक नावाचा एक माणूस सगळ्यांना सांगतोय ‘रावणाच्या ताब्यातली सीता पवित्र कशी?’”
हे ऐकून रामांना खूप दुःख झालं. त्यांना सीतेच्या पवित्रतेवर तिळमात्र शंका नव्हती. पण राजा फक्त पती नसतो. तो प्रजेचा आधार असतो. प्रजेच्या मनात जर आपल्या राणीबद्दल शंका असेल तर ती शंका दूर करणंही राजाचंच कर्तव्य असतं.
रामांनी आपल्या आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय घेतला.
रामांनी लक्ष्मणाला आज्ञा दिली “सीतेला वनात सोडून एकटाच परत ये!”
लक्ष्मणाचा संताप उफाळला. “त्या रजकाची जीभच छाटून टाकतो!” तो म्हणाला.
“नको!” राम म्हणाले. “लोक म्हणतील मी माझा दोष झाकण्यासाठी रजकाला शिक्षा केली. लोकांची तक्रार ऐकलीच पाहिजे. तोच राजधर्म आहे. राजा न्याय करतो भावना नाही. मी पती म्हणून सीतेचा त्याग करू इच्छित नाही पण राजा म्हणून कर्तव्य पाळतोय. हा माझा धर्म आहे.”
दुसऱ्या दिवशी लक्ष्मण सीतेला रथात बसवून वनात निघाला. भागीरथी नदीच्या काठावर रथ थांबला. मोठ्या वटवृक्षाखाली सीता विसावली.
लक्ष्मणाचे डोळे पाणावले. तो म्हणाला, “सीते, श्रीरामांना माहीत आहे की तुम्ही पवित्र आहात. पण खोट्या अफवांना थांबवण्यासाठी तुमचा त्याग करावा लागतोय. हा त्यांच्या मनाचा मोठा दु:खद निर्णय आहे.”
हे ऐकून सीतेचं हृदय तुटलं. अश्रूंनी डोळे भरले. पण तिनं धीर धरला. “लक्ष्मण रामांना सांगा… माझ्या पोटात त्यांची दोन बाळं वाढतायत. त्यांच्या या बाळांसाठी तरी मला जगलंच पाहिजे!”
लक्ष्मण जड पावलांनी अयोध्येला परतला. वनात सीता एकटी उरली. फळं कंदमुळे खाऊन दिवस काढू लागली. पण संकटाच्या अंधारात दोन आशेची किरणं दिसत होती. सीतेच्या पोटात वाढणारे श्रीरामांचे तेजस्वी जुळे पुत्र लव आणि कुश!
श्रीरामांचे तेजस्वी जुळे पुत्र लव आणि कुश!
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

