रामायणाच्या गोष्टी 41 – रावणाचा निर्णायक अंत

लंकेच्या सुवर्ण सिंहासनावर मस्तवालपणे विळखा घालून बसलेला रावण मनातून अस्वस्थ होता. अयोध्येचे लाखों सैनिक आणि वानरसेना आक्रमण करून आली होती. रामनामाच्या प्रेरणेची शक्तीची त्याला पूर्ण कल्पना आली होती. पण तरीही तो फुशारक्या मारत होता. पोरकट वक्तव्ये करत फिरत होता. युद्धात आपण हरू शकतो ही कल्पनाच त्याच्या अहंकाराला सहन होत नव्हती.

पण रामाची तयारी नियोजनबद्ध शिस्तीत होती. राम रावण युद्ध सात दिवस चालले. आकाश बाणांनी भरून गेले. जमिनीवर तलवारींच्या ठिणग्या पडत होत्या. रावणाचे धनुष्य तुटले रथ कोसळला हत्तीही कोलमडले. रामाने त्याचे हात उडवले तरी नवे हात उगवत होते. डोके उडवले. तरी नवीन डोके उगवे. रामाला समजेना. असे का होते आहे.

लक्ष्मणाने गुपित उलगडलं “रावणाच्या बेंबीमध्ये अमृतकुंभ आहे. त्यातल्या प्रत्येक थेंबातून रावणाचे पुनर्निर्माण होईल. तो अमृतकुंभ फुटेपर्यंत रावण अमर राहील!”

रामाचा नेमका बाण रावणाच्या बेंबीवर आदळला. अमृतकुंभ फुटला ! एका क्षणात रावणाचा देह जमिनीवर कोसळला. सिंहासारखा गरजणारा राक्षस शांत झाला. रावणराज्याचा निर्णायक अंत झाला.

रामाविरुद्ध निकराची लढाई लढणाऱ्या रावणाचेही, शेवटचे शब्द होते – “हे राम!”

दोन्ही सैन्यांनी शस्त्रे खाली ठेवली. रामाने मिळवलेला विजय फक्त युद्धाचा नव्हता. तो विजय सत्याचा धर्माचा आणि अनीतीविरुद्ध संघर्षाचा होता.

राम आणि लक्ष्मणाने जयजयकारात लंकेत प्रवेश केला. सीता त्यांच्या प्रतीक्षेत होती. आता अयोध्येचा मार्ग खुला झाला होता !

प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top