श्रीराम श्रीराम श्रीराम !
पुष्पक विमान भारद्वाज ऋषींच्या आश्रमाजवळ उतरलं. श्रीरामांचा चौदा वर्षांचा वनवास त्याच दिवशी संपत होता. पण भरताचं मन बेचैन झालं होतं.अजून श्रीराम आले नव्हते. म्हणून त्यानं एक कठोर प्रतिज्ञा घेतली होती — “राम परत आले नाहीत, तर मी अग्नीमध्ये उडी घेईन!”
हे कळताच श्रीराम खूप व्याकुळ झाले. त्यांनी हनुमानाला ताबडतोब भरताला आणि गुहाला ते परत आल्याची आनंदाची बातमी द्यायला पाठवलं. हनुमान उडतच निघाला! भरताला म्हणाला “तुमची प्रतिक्षा संपली! श्रीराम, सीता आणि लक्ष्मण सुखरूप परत आले आहेत!”
हे ऐकताच भरताच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. त्यानं हनुमानाला कडकडून मिठी मारली. त्याचा गळा भरून आला. कित्येक वर्षांचा थांबलेला आनंद आज ओसंडून वाहत होता.
श्रीराम परत आल्यावर भरतानं चौदा वर्षं जपलेल्या त्या पादुका त्यांच्या पायांत घातल्या. डोळे भरून पाहिलं आणि म्हणाला, “आता तुम्ही अयोध्येच्या सिंहासनावर बसा. आणि रामराज्य स्थापून सगळ्यांना सुखी करा!” भाऊ असावा तर भरतासारखा. निस्वार्थी, प्रेमळ, श्रद्धावान!
अयोध्येत बातमी पसरताच आनंदाची लाट उसळली. सगळी जनता नाचू लागली, गाणी गाऊ लागली. सगळीकडे एकच जयघोष ऐकू येत होता.
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

