सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज.
२३०० वर्षांपूर्वी मौर्य घराण्यात एक राजा झाला. अशोक. लहानपणी अशोक खूप हट्टी, चिडखोर, आक्रस्ताळा, धटिंगट, दांडगट आणि रागीट होता. त्याचे खेळ म्हणजे युद्ध, तलवार.
सम्राटाचा मुलगा असल्यामुळे मोठा झाल्यावर तो वंशपरंपरागत, आपोआप, सम्राट झाला. संपूर्ण भारतावर त्याचं राज्य होतं. पण एक राज्य उरलं होतं – कलिंग. मोठा समुद्रकिनारा, सुजलाम सुफलाम जमीन. कष्टाळू माणसे. कलिंग म्हणजे आजच्या भारताचा ओरिसा. अशोकाने ठरवलं – “कलिंग जिंकलंच पाहिजे! “त्यानी एक भीषण युद्ध छेडलं. कलिंग युद्ध. तलवारी, कापाकापी, धनुष्यबाण, रक्त, मृत्यू… सर्वत्र हाहाकार! लाखो लोक मारले गेले, घरं जळाली, कुटुंबं उध्वस्त झाली. वाताहात झाली.
राजा अशोक विजय साजरा करायला वाजत गाजत युद्धभूमीवर गेला… पण तिथे फटाके नव्हते. तिथे होते रक्ताचे थारोळे. आणि रडणारे लोक. सगळीकडे मृतदेह, आरडाओरडा, रडारड, आक्रोश आणि दुःखाचे डोंगर.
युद्ध जिंकलं… पण अशोकाला समाधान नव्हतं. मनात आनंद नव्हता. काहीतरी चुकतंय असं त्याला आतून वाटत होतं.
तेवढ्यात एक लहानगी मुलगी, रक्ताने माखलेल्या आपल्या मरण पावलेल्या वडिलांच्या
कलेवराला घट्ट मिठी मारून हमसून हमसून रडत होती. ते हृदय द्रावक दृश्य बघून अशोकाचं काळीज हेलावून गेलं.
त्याला प्रश्न पडला. “मी हे काय केलं? का केलं? कशासाठी केलं? या युद्धातून मला काय मिळालं?”
त्या क्षणी अशोकाच्या मनात मोठ्ठा बदल झाला. चूक काय आणि बरोबर काय, हे त्याला बरोबर उमगलं. त्याला बोध झाला. अशोकाला उपरती झाली.
अचानक त्याच्या मनात गौतम बुद्धांच्या बोधिसत्वाची आणि त्यांना झालेल्या बोधाची आठवण आली. त्याला मार्ग सापडला. बौद्ध धर्माचा. गौतम बुद्धांचा शांतीमार्ग, करुणा आणि नीतीने भरलेला.” त्यानी ठरवलं. ही वेळ युद्धाची नाही… बुद्धाची आहे! त्याने तलवार बाजूला ठेवली. बौद्ध धर्म, माणुसकी, सहिष्णुता – हे त्याचं नवं शस्त्र झालं.
आधी तो स्वतःला देशाचा आणि जनतेचा मालक समजत होता. आता त्यानी देशाचा आणि जनतेचा सेवक बनायचे ठरवले. त्याने सर्व लोकांना प्रेमाने वागवायला सुरुवात केली. गरीब, आजारी, वृद्ध – सगळ्यांची तो काळजी घेत असे. प्रजेसाठी रस्ते, विहिरी, रुग्णालयं, धर्मशाळा बांधली.
शिलालेखांमधून त्याने सांगितलं दयेमधेच खरी ताकद असते. त्याने गौतम बुद्धांचा संदेश श्रीलंका, भूतान, नेपाळ, म्यानमार, अफगाणिस्तान, जगभर पोचवला. आणि तो झाला भारतीय इतिहासातला पहिला धर्मराज. धर्माचे रक्षण करणारा. आपले शिवाजी महाराज देखील म्हणायचे “देव धर्म आणि देशासाठी, प्राण वेचलं आम्ही”. सम्राट अशोक म्हणायचा “लोकांना तलवारीच्या जोरावर नाही प्रेमाच्या जोरावर जिंकायचे असते”
उत्तर प्रदेश राज्यात, वाराणसी जिल्ह्यात, वाराणसी म्हणजे पूर्वीचे “काशी”. सारनाथ या गावात गौतम बुद्धांनी पहिलं धर्मचक्र प्रवर्तन (धम्मचक्र प्रवर्तन) केलं होतं. प्रवर्तन केलं. म्हणजे त्यांनी धर्मशिक्षण सुरू केलं. गौतम बुद्धांच्या उपदेशामुळे समाजात परिवर्तन घडलं. परिवर्तन घडलं म्हणजे लोकांच्या विचारात आणि जीवनशैलीत बदल झाला.
सम्राट अशोकाने तिथे एक मोठा सिंहस्तंभ बांधला. आजही तो उभा आहे. त्या सिंहस्तंभावरचं अशोक चक्र आपल्या राष्ट्रध्वजावर, तिरंग्यावर आहे. ते आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. आपल्या परंपरेचं प्रतीक आहे. म्हणूनच “सम्राट अशोक: युद्धाकडून बुद्धाकडे नेणारा धर्मराज” ठरला.
जय महाराष्ट्र
जय हिंद
भारत माता की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


