विक्रम वेताळ गोष्टीतला आणि खरा राजा विक्रमादित्य
मुलांनो, मी आता काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मोठ्याने, एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. तयार? तहान लागते तेव्हा काय पिता? – पाणी! विहिरीत काय असतं? – पाणी. समुद्रात काय असतं? – पाणी. नदीत काय असतं? – पाणी. पावसातून काय पडतं? – पाणी. बर्फ वितळला की त्याचं काय होतं? – पाणी. किती छान! कुठलाही प्रश्न विचारला, तर तुमचं उत्तर एकच – पाणी.
आता मला सांगा. साखर चवीला कशी लागते? – गोड
मीठ चवीला कसे लागते? – खारट. मिरची चवीला कशी लागते? – तिखट. लिंबू चवीला कसे लागते? – आंबट. आवळा चवीला कसा लागतो? – तुरट
म्हणा – तुरट!
चपाती कशाची करतात? गव्हाची. भाकरी कशाची करतात? ज्वारीची-बाजरीची
भात कशाचा करतात? तांदळाचा. वरण कशाचं करतात? डाळीचं.
बघितलं का. प्रश्न विचारला, की विचार करावा लागतो. विचार केला की उत्तर मिळतं. उत्तर मिळालं की आपण हुशार, संशोधक होतो.
विक्रम-वेताळाच्या गोष्टीतला विक्रम पौराणिक आहे. म्हणजे गोष्टीतला. एकदा राजा विक्रम, वेताळाला खांद्यावर घेऊन चालला होता. वेताळ रोज एक गोष्ट सांगायचा, आणि शेवटी एक प्रश्न विचारायचा.
दोन राजे जंगलातून चालले होते. समोर एक आदिवासी मुलगी डोक्यावर लाकडांची मोळी घेऊन चालली होती.
अचानक समोर आला एक उपाशी वाघ!
पहिल्या राजाने तलवारीचे सपासप वार करून वाघ ठार मारला. दुसऱ्याने त्या मुलीला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले.
आणि तिला तिच्या घरी, आई वडिलांकडे पोचवले. ती निघाली एक हरवलेली राजकन्या!
वेताळाने विचारलं. तिने लग्न कोणाशी करावं? वाघाशी लढणाऱ्या शूरवीराशी, की तिला सुरक्षित ठेवणाऱ्या आधारवडाशी?
राजा विक्रम म्हणाला –
“शौर्य महत्त्वाचं, पण माणुसकी त्याहून मोठी. आधार देणारा राजा श्रेष्ठ!” वेताळ हसला. उत्तर बरोबर होतं. आणि वेताळ नेहमीप्रमाणे पुन्हा वडाच्या झाडावर उलटा लोंबकळू लागला
हे झालं गोष्टीतलं. पण इतिहासातही एक विक्रमादित्य होऊन गेला. सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य! छत्रपती शिवरायांच्या १५०० वर्षे आधीचा राजा.
त्याच्या दरबारात होती नवरत्ने. विद्वान, गायक, साहित्यिक, विचारवंत. त्याने सुराज्य दिलं. आणि आजच्या भारतीय संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली.
एकदा एका गरीब शेतकऱ्याची गाय चोरीला गेली. शेजारी म्हणाला, “ही गाय माझी आहे. “प्रकरण गेलं राजाकडे. राजाने दोघांनाही गायीसमोर उभं केलं आणि गायीला हाक मारून बोलवायला सांगितलं. गाय सरळ गेली शेतकऱ्याकडे. त्याच्या अंगाला डोकं घासू लागली. प्रेम दाखवू लागली.
राजा म्हणाला –”गायीला फसवता येत नाही. तिला सत्य कळतं.” राजानी गाय दिली शेतकऱ्याला. आणि दंड केला शेजाऱ्याला. हेच खरं न्यायाचे राज्य!
राजा विक्रमादित्याने भारतीय संस्कृतीची पायाभरणी केली.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
भारतमाताकी जय!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


