“नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद?” – भारतीय इतिहासाच्या गोष्टी १७
स्वामी विवेकानंद भारतीय इतिहासाचा एक चमकता तारा होते.
‘उठा, जागे व्हा’ — ‘उत्तिष्ठ, जाग्रत’ अशी हाक देऊन त्यांनी देशाला धैर्य दिलं.
त्यांनी भारताचं नाव जगभर उजळवलं.
त्यांनी शिकवलं—देव आकाशात नाही… देव आपल्या मनातल्या उजेडात आहे.
आज मी त्यांची गोष्ट सांगतोय… आणि माझ्या मनात एक ज्योत पेटली.
ही बघा—मी मेणबत्ती पेटवली.
ही आहे आजच्या गोष्टीची ज्योत.
आता या ज्योतितून तुमच्या हातातल्या उदबत्त्या पेटवू या.
तुम्ही माझ्यामागून गोष्ट म्हणाल, आणि ही ज्योत तुमच्या मनातही उजळेल.
याला म्हणतात—‘ज्योत से ज्योत जगाते चलो’.
मनातली ज्योत म्हणजे प्रेरणा. दैवी प्रकाश. देवाचा अंश.
कोलकात्यातील सिमुलिया स्ट्रीट…
इथे राहत होता एक चुणचुणीत, हसतमुख, खोडकर मुलगा—नरेंद्रनाथ दत्त.
खेळात, अभ्यासात, गाण्यात—तो सगळीकडे हुशार.
पण त्याची एक खास सवय—सतत प्रश्न!
“देव कुठे आहे?”
“माणसांनी चांगलं का वागावं?”
आई भुवनेश्वरी म्हणायची,
“बाळा, तुझ्या मनात प्रकाश असेल तर जगातील अंधार निघून जातो.”
एके दिवशी नरेंद्रने आपल्या गुरूंना—रामकृष्ण परमहंसांना विचारलं,
“तुम्ही देव पाहिलात का?”
रामकृष्ण म्हणाले,
“हो, पाहिलाय. प्रत्येक माणसात देव आहे.
तू तुझी शक्ती इतरांच्या भल्यासाठी वापर, तुला देव दिसेल.”
एकदा एका मुलाला कुत्र्याचं पिल्लू सापडलं.
नरेंद्रने त्याला परत आईकडे पोचवलं.
विवेकानंद म्हणाले,
“एखादा जीव वाचवतो तेव्हा—आपल्या हृदयात देव जागा होतो.”
शिकागोमध्ये जागतिक धर्मसंसद भरली होती.
जगभरातील विद्वान आपापल्या धर्माची स्तुती करत होते.
विवेकानंद उभे राहिले आणि म्हणाले—
“माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो!”
क्षणभर शांतता… आणि मग गडगडाट!
जगाला पहिल्यांदा कळलं—भारतात दुसऱ्या धर्मातील लोकही बंधू-भगिनी असतात.
स्वामी विवेकानंदांनी शिकवलं—
देव आपल्या मनातल्या उजेडात आहे.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


