मी आणि माझी शाळा.
शाळा म्हणजे फक्त एक इमारत, चार भिंती, जमीन, साहित्य, लाईट, पाणी, शासनमान्यता, अनुदान नाही. संस्था माणसांनीच बनते. आज आपल्या शाळेत जवळजवळ 60 जण काम करत आहेत, 500 मुले शिकत आहेत. त्यांचे कुटुंबीय धरले. तर दैनंदिन जीवनात शाळेशी हजाराहून जास्त माणसांचा संबंध येतो.
शाळा ही एक जिवंत समाजव्यवस्था आहे. Ecosystem, परिसंस्था आहे.
आपलं काम शिक्षण सेवा क्षेत्रात मोडतं. हे सर्विस इंडस्ट्री. मानवी विकास हा आपल्या कर्तव्याचा गाभा. म्हणून विद्यार्थी केंद्रितता महत्वाची ठरते. आधी विद्यार्थी, मग पालक,मग स्टाफ, आणि मग व्यवस्थापन, संस्थाचालक. ही खरी सेवा साखळी आहे. उलटी साखळी नाही चालत नाही.
संस्थेची यशस्वी वाटचाल ही फक्त बांधकाम, भौतिक सुविधा, परवाने, अभ्यासक्रम यावर अवलंबून नसते. ती अवलंबून असते — संघभावनेवर. विश्वासावर. संवादावर. आणि सुस्पष्ट कार्यपद्धतीवर.
नियम, नियमावली, कार्यपद्धती या शब्दांकडे सूचना” म्हणून न पाहता “सहकार्याची चौकट” म्हणून पाहणं आवश्यक आहे. कधीकधी नियम बंधनकारक वाटतात. बदल समजून घेतला, तर तोच बदल सुरक्षेचा आधार ठरतो. उदा. कागदोपत्री पुरावा, फोटो, मंथली रिपोर्ट.




संस्थेच्या वाटचालीत स्थळ काळ वेळेप्रमाणे नवीन निर्णय, नवीन कार्यपद्धती स्वीकाराव्या लागतात. आधी छान चाललं होतं ना? मग बदल कशाला?” असं वाटतं. बदल नेहमीच जड जातात. पण तो हिताचा बदल आवश्यकही असतो. बदलाची मानसिक तयारी असावी.
आजचा विद्यार्थी, आजचा पालक, आजचा समाज – या सगळ्यात सतत बदल घडतोय.
आपण जुन्या चौकटीत अडकून राहिलो, तर प्रगती खुंटणार.
म्हणूनच कार्यपद्धतीचे नियम, बदल दडपण आणण्यासाठी नसतात. स्पष्टता, पारदर्शकता, समन्वय आणि सुधारणेसाठी असतात.
संस्था उभी राहते जमिनीवर, इमारतीवर, पण चालते, टिकते ती आपापसातल्या संबंधावर, नात्यांवर.
नियमांची चौकट ही आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे.
धन्यवाद!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


