#05
पतंगांवरून हमरी तुमरीची भांडणं.
आरव आणि निरव दोघे चांगले मित्र होते. एकत्र खेळायचे, एकत्र अभ्यास करायचे, एकत्र शाळेत जायचे यायचे, एकत्र डबा खायचे. पण एक दिवशी सगळे बिघडले.
संक्रांतीचा दिवस होता. दोघे पतंग उडवत होते. आरवचा चमकदार निळा होता, तर निरवचा सोनेरी पिवळा. दोघांचेही पतंग आकाशात उंच भरारी घेत होते. दोघं खुशीत होते.
पण अचानक जोराचा वारा सुटला. त्यांचे पतंग जवळ जवळ आले. आरवचा पतंग निरवच्या पतंगात अडकला. आरवने पतंग सोडवण्यासाठी
मांजा जोरात खेचला. पण सुटायच्या ऐवजी निरवचा पतंग फाटू लागला. “इतक्या जोराने ओढू नकोस, माझा पतंग फाटतोय”. निरव ओरडला.
“तूच माझ्या मधे मधे येतोयस. तुझा पतंग लांब ने बरं”, आरव ओरडला.
काय होतंय काही कळण्या आधीच गुंताडा झाला. दोन्ही पतंग फाटले. आणि तुकडे तुकडे होऊन जमिनीवर पडले.
निरव त्वेषानी आरवच्या अंगावर धावून गेला. “तू माझा नवीन पतंग फाडलास”. आरव काय ऐकून घेतो काय. त्यानी निरवची गचांडीच धरली. “तू माझ्या मध्ये आलास, म्हणून माझा पतंग फाटलाय”.
पतंगांप्रमाणेच दोघांची मैत्रीही फाटली होती. दोघे एकमेकांचे शत्रू झाले होते. दोघे एकमेकांवर धावून आले होते. प्रसंग बाका होता. आता मारहाणी शिवाय पर्याय नाही.
आरवचे आजोबा बाकावर बसून हे सगळं बघत होते. ते म्हणाले. अरेच्या, पतंगांचा ॲक्सिडेंट झालेला दिसतोय. पतंग धडकलेले दिसतात एकमेकांना. बापरे दोन्ही पतंगांचा चोळामोळा झालाय या ॲक्सिडेंट मधे. पण यात अजून एक मोठी गडबड झाली आहे.
जेव्हा दोन पतंग आकाशात एकमेकात अडकतात, तेव्हा उडवणाऱ्या दोघांनी, एकमेकांना सहकार्य केलं तर गुंता सुटू शकतो. जोपर्यंत दोघं एकमेकांना सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत गुंता सुटूच शकत नाही.
तुमच्या दोघांच्या बाबतीत हेच झालं आहे. तुम्ही एकमेकांवर चिडले आहात. अरे तुमच्या मैत्रीलाच तिढा पडलाय. फक्त पतंगाच्या मांजाला नाही. एकमेकांना दोष देऊन हा गुंता सुटणार नाही. ओरडण्याऐवजी, भांडण्या ऐवजी चर्चा करा, एकमेकांना मदत करा. काहीतरी मार्ग निघेल.
या दोन फाटक्या पतंगांना जोडून, चिटकवून एक नवा पतंग तयार करता येईल का रे? मुलं म्हणाली हो, सहज करता येईल.
दोघांनी मिळून पतंगाचे तुकडे एकत्र करून एक छान मोठा, रंगीबेरंगी पतंग तयार केला. आणि एकत्र उडवायला लागले.
आरव आणि निरव, दोघांचाही राग शांत झाला होता. आपले भांडण झाले होते हेही दोघे विसरून गेले.
सॉरी निरव, आरव म्हणाला. मी पण सॉरी आहे, निरव म्हणाला.
गुंतलेला पतंग असो किंवा मित्रांमधील भांडण, एकत्र येऊन समंजसपणाने सोडवले तर नक्की सुटतात. ओढाताण केली तर संबंध तुटतात. एखाद्या वेळेस हातपाय देखील मोडतात.
विद्या वाचस्पति डाॅ. अनिल मोकाशी.
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी, (मुंबई).
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


Great. This will right childcare text book for india and world.
It is best.
It is in Simple language.
Need based.
With right examples.