#06
कोरोना लसीचा वाद
कोरोनाच्या लसीवरून बराच वाद सुरू आहे. या वैज्ञानिक किंवा वैद्यकीय प्रश्नावरचा वाद राजकीय आहे. कोविड-19 महामारी ही या शतकातील सर्वात भीषण मानवी आपत्ती होती. या महामारीमध्ये प्रत्येकाने एक तरी जवळची आणि प्रिय व्यक्ती गमावली आहे.
लोकांचे जीव वाचवण्यासाठी उपाय शोधणे ही आणीबाणीची समस्या होती. जगभरातल्या मानवजातीसाठी लसीचा जलद विकास, वितरण आणि लसीकरणाची प्रशासकीय व्यवस्था हा एकच मार्ग उपलब्ध आहे. हे साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच स्पष्ट झाले होते. हे अत्यंत अवघड काम होते.
सुदैवाने महामारी येण्यापूर्वीच आपल्याला व्हायरसची जीनोमिक आणि संरचनात्मक माहिती होती. मानवजातीच्या संहारक शत्रूला आपण वैज्ञानिक दृष्ट्या चांगलेच ओळखत होतो. कोरोनाच्याच कुटुंबाविरुद्ध आधी फ्लूची आणि नंतर स्वाईन फ्लूची लस आपण बनवलेली होती. आपल्याला यशस्वी अनुभव होता. लवकरात लवकर लस उपलब्ध करण्यासाठी, “1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या टप्प्याच्या अखंड चाचणीचे धोरण” उपयोगी पडले.
बाजारात अनेक प्रकारच्या कोविड-19 लसी उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रकाराच्या उत्पादनाचे तंत्रज्ञान वेगळे आहे. सर्वोत्तम तंत्रज्ञान निवडणे हे शास्त्रज्ञांचे काम आहे. सध्या जगात खालील प्रकारच्या कोविड लसी उपलब्ध आहेत:
1) एमआरएनए लस.
2) ॲडीनोव्हायरस वेक्टर लस.
3) प्रोटीन लस.
4) होलसेल इनॲक्टिव्हेटेड व्हायरल लस.
5) मोनोक्लोनल ॲन्टीबॉडीज.
संशोधन केलेली लस सुरक्षित आहे आणि परिणामकारक आहे याची खात्री झाल्याशिवाय लस नियामक अधिकारी तिच्या वापराला परवानगी देत नाहीत. आंतरराष्ट्रीय व भारतीय लस नियामक अधिकारी जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पुरेसे जबाबदार आहेत. याबाबत शंका घेण्याचे काहीच कारण नाही.
लहान मुलांमध्ये कोविड-19 लस
लहान मुलांमध्ये कोविड-19 झालेल्यांची संख्या कमी आहे, हे खरे आहे. झाला तरी त्याची तीव्रता कमी आहे, हेही खरे आहे. पण आपण सगळ्यांनी “सिरीयस इम्यून रिस्पॉन्स सिंड्रोम” (एसआयआरएस) झालेली मुले मृत्युमुखी पडतांना आपल्या डोळ्यांनी पाहिली आहेत. जे कुणी मरतात, ते बिचारे 100% मरतात. ही एक दुर्दैवी आकडेवारी आहे. करोनाबाधित मुलांसाठी ‘संख्याशास्त्र’ लागू पडत नाही. संख्याशास्त्र हे “सार्वजनिक आरोग्य धोरण ठरवण्यासाठी” उपयुक्त आहे, वैयक्तिक संरक्षणासाठी नाही.
लहान मुलांना लसीकरण केल्याने समुदाय संक्रमण (पॉप्युलेशन ट्रान्समिशन) रोखता येते. लहान मुलांनाही कोविड-19 लस द्यायलाच हवी. त्यांचे संरक्षण करायलाच हवे. तसे अभ्यास जगभर चालू आहेत.
कोविड-19 लस, हे एक ‘अनाथ औषध’ (ऑरफन ड्रग) आहे. कोणतीही लस हे आजार टाळण्यासाठी दिले जाणारे औषध आहे. ‘पुरेशा’ प्रकाशित पुराव्याअभावी 1) मुलांना कोविड-19 लसीचा लाभ मिळू शकत नाही आणि 2) कोविड-19 लसीला बाल ग्राहक मिळू शकत नाही. अशा औषधाला अनाथ औषध म्हणतात. म्हणून कोविड-19 लस हे अनाथ औषध आहे.
कोविड-19 बद्दलचे अनुत्तरीत प्रश्न
कोविड-19 संबंधी अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यासाठी काळ हे एकच उत्तर आहे. उत्तरे काळाच्या पोटात दडलेली आहेत.
1) लसीचे संरक्षण किती काळ टिकेल?
2) लसीचे बूस्टर डोस आवश्यक असतील की नाही?
3) या लसी खरोखरच सुरक्षित आहेत का?
4) संरक्षणासाठी कोणत्या पातळीची प्रतिकारशक्ती आवश्यक आहे?
5) लस रोगापासून, संसर्गापासून, किंवा दोन्हीपासून संरक्षण करते का?
6) लस दिलेल्या सर्वांना परिणामकारक आहे का?
7) म्युटेशन होऊन, रूप बदलणाऱ्या नवीन प्रकारांचे परिणाम काय आहेत?
या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल. कदाचित काही वर्षे लागतील. त्यांना आज कोणीही उत्तर देऊ शकत नाही. या प्रश्नांची उत्तरे न्यायालयांच्या अखत्यारीत येत नाहीत. हे विज्ञान आहे. शुद्ध आधुनिक विज्ञान. व्हॅक्सीनॉलॉजीचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स. लसीकरण शास्त्राचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि गणित.
त्यामुळे कोविड-19 लस ही एक वैज्ञानिक आणि वैद्यकीय समस्या आहे. त्याबद्दलची चर्चा त्या व्यासपीठावरच व्हायला हवी. ती राजकीय समस्या नाही.
लस संशोधन कोणत्याही देशाशी, कंपनीशी, धर्माशी, राजकीय पक्षाशी जोडायला नको, तर मानवतेचे, मानवी जीवनाचे रक्षण करण्याच्या विज्ञानाशी जोडायला हवे.
आधुनिक लसी ही वैज्ञानिक प्रगतीची फळे आहेत.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


कोविड-१९ लस हा लेख वाचून खुप काही संभ्रम होते ते मला समजलं
धन्यवाद सर
मार्गदर्शक लेख
Thank you Kavita. Waiting for your attention towards our joint proj.
संख्याशात्रिय कॉमेंट विशेष भावली असे लिहण्यासाठी अनुभवाची जोड लागते नाहीतर शास्त्रीय स्टडी नावाने शास्त्रीय सल्ले दिले जाते.
लहान मुलांच्या पालकांसाठी छान लेख
Thanks sir