#11
अपघात टाळता येतात. चुकून झालेच तर ते पद्धतशीरपणे हाताळावे लागतात. शाळेतील मुलांची सुरक्षा ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. ‘सगळेच जबाबदार’ म्हटल्यावर ‘कोणीच जबाबदार’ रहात नाही. जबाबदारी योग्य व्यक्तींना नेमून द्यावी लागते.
व्यवस्थापनाने व मुख्याध्यापकांनी शाळेतील शिक्षकांपैकी एक ‘बाल सुरक्षा अधिकारी’ नेमावा. त्याने सुरक्षा नियम व व्यवस्थापन शिकून घ्यावे. आपली टीम बनवावी. तिचे नेतृत्व करावे. शाळा सुरक्षा अधिकारी, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, क्लास मॉनिटर या सर्वांनी मिळून एकत्रितपणे सुरक्षा हा विषय हाताळावा. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे सुरक्षा, प्रथमोपचार प्रशिक्षण आयोजित करावे. फक्त शाळेतीलच नाही तर घरातील, समाजातील, रस्त्यावरील, आरोग्याची सुरक्षा शिकवण्याची जबाबदारी घ्यावी.
शाळेच्या प्रवेशद्वारावर जबाबदार कर्मचारी नेमावा. त्याने आलेला विद्यार्थी शिक्षकांच्या ताब्यात आणि जाणारा विद्यार्थी पालकांच्या ताब्यात देण्याचा नियम पाळावा. ताबा घेणाऱ्या पालक, पालक प्रतिनिधीची शाळेत नोंद असावी. परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष असावे. त्यांची नोंद असावी. अहवाल असावा. वाहनचालकांचे नाव, पत्ता, फोन नंबर, ओळखपत्राची शहानिशा व्हावी. शाळेची बस असेल तर कडक शिस्तीत नियमांचे पालन व्हावे. ताबा घेणे व ताबा देणे गंभीरपणे नोंदीसह करावे.
शाळेच्या परिसरात, पटांगणावर मुले जबाबदार व्यक्तीच्या नजरेच्या टप्प्यात असावी. प्रथमोपचार पेटी असावी. घडणाऱ्या घटनांची लेखी नोंद असावी. घटनेचे तपशीलवार वर्णन असावे. साक्षिदारांच्या सह्या असाव्या. फलकावर इमर्जन्सी फोन नंबर असावे. शालेय सुरक्षा अधिकारी, मुख्याध्यापक, व्यवस्थापन, डॉक्टर्स, अॅम्बुलन्स, अग्निशामक, पोलीस इ.
काही गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यास ठराविक डॉक्टर्सकडे नेण्यासाठी त्या डॉक्टर्स आणि सर्व पालकांची लेखी पूर्वसंमती घ्यावी. जवळपासचा डॉक्टर निवडावा. ‘डॉक्टरांची फी तसेच औषधोपचाराचा खर्च ही पालकांची जबाबदारी असेल’ अशी पालकांची पूर्वसंमती लेखी स्वरूपात घ्यावी.
बाल शोषण ही एक गंभीर समस्या आहे. बाल शोषण ओळखणे, प्रतिबंध, उपाय यांचे नियोजन हवे. शोषण शारीरिक, लैंगिक, मानसिक किंवा दुर्लक्ष या स्वरूपात असू शकते. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मुलांशी येणारा ‘नजरेआड संपर्क’ टाळावा. अशा जागा व प्रसंग टाळावे. बाहेरून शाळेत येणाऱ्या कंत्राटी कामगारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी नेमून द्यावी. शारीरिक शिक्षा हा आता एक गुन्हा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. शिक्षेच्या भीतीने नाही तर कौतुकाच्या अपेक्षेने मुले चांगली वागतात. बाल शोषणाची लक्षणे आढळल्यास लगेच नोंद करावी. पालकांना, व्यवस्थापनाला लेखी स्वरूपात कळवावे. मानसिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. मुलांची भांडणे, दादागिरी, गुंडगिरी, रॅगिंग, व्यसने, अनैतिकता यांची हाताळणी कुशलतेने करावी. मी का मध्ये पडू? मला काय त्याचे? असा दृष्टिकोन एखादवेळी अंगलट येतो. अपंगांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी.
आत्तापर्यंत पालकांनी, शाळांनी, समाजाने व सरकारने या विषयाला हातच घातलेला नाही. भावी पिढीला रामभरोसे सोडून आता चालणारच नाही. कृती करावीच लागेल. आता चर्चा पुरे!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


Yes sir you are right.
Thanks sandip. Get along join hands. Together we can make a change. In the interest of children.