मुलांनो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय… – मी सांगतोय स्वराज्य निर्मितीची गोष्ट.
मुलांनो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय.
माझं बालपण झालं शिवनेरी किल्ल्यावर.
माझी आई जिजाऊ, रोज मला गोष्टी सांगायची — रामाची, कृष्णाची, भीमाची!
त्या गोष्टींनी माझ्या मनात एक विचार पक्का झाला —
“आपलं राज्य आपणच उभं करायचं!”
तेव्हा जुलमी आक्रमक मोगल बादशहा, सुभेदार लोकांवर अन्याय करत होते.
गावं जळत होती, माणसं घाबरलेली होती.
मी ठरवलं — हा अन्याय थांबवायचाच!
लहानपणीच मी घोड्यावर बसायला शिकलो, तलवार फिरवायला शिकलो.
डोंगरावर चढायचो, मावळ्यांबरोबर खेळायचो — पण मनात एकच जिद्द होती.
थोडा मोठा झालो, तेव्हा मी तोरणा किल्ला जिंकला.
लोक म्हणाले, “हा बाळराजा मोठा राजा होणार आहे!”
मी राजगडावर राजधानी बसवली.
माझे मावळे — तानाजी, बाजी, नेताजी, येसाजी — हे माझे हात होते.
आम्ही किल्ल्यांवर स्वराज्याचा झेंडा फडकवला.
प्रतापगडावर अफझलखान आला.
मी म्हटलं — “ आई भवानी, मी धर्मासाठी तलवार उचलतोय.”
त्या दिवशी आमचा विजय झाला.
तेव्हा सह्याद्रीच्या डोंगर दर्यांमध्ये एकच वाक्य घुमलं —
“हर हर महादेव! जय भवानी! जय शिवाजी!”
त्या आवाजात भीती नाही, स्वाभिमान होता!
लोकांच्या मनात उमटलं — “हा आपला राजा आहे!”
मुलांनो, आज मी सिंहासनावर नाही,
पण मी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, पूर्ण केलं आणि भारताला स्वराज्य शिकवलं. माझं स्वराज्य आजही तुमच्या मनात जगतंय.
जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे, धैर्याने, इतरांसाठी काम करता,
तेव्हा माझं नाव पुन्हा घुमतं —
“जय भवानी! जय शिवाजी!”
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


