जात ही मनात असते, रक्तात नसते” – श्रीचक्रधर स्वामी
भारतात सगळीकडे सुलतानी राजवटी होत्या. समाजात जातीपातीचं विष जाणूनबुजून पेरलेलं होतं. समाज पिचलेला होता आणि शासक मस्तवाल झाले होते. अशा काळया कालखंडात शिवाजी महाराजांच्या सुमारे ३५० वर्षे आधी श्रीचक्रधर स्वामी, गुजरातहून महाराष्ट्रात आले.
त्यांनी विखुरलेला समाज एकसंघ करण्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती केली.
‘सर्व जीव समान’ असा संदेश देऊन प्रत्येक माणसात असलेल्या देवाची जाणीव करून दिली.
एका गावात, एका सकाळी, मंदिराच्या पायऱ्यांवर श्रीचक्रधर स्वामी शांत बसले होते. ते बसले की सकाळही शांत होत असते. तेवढ्यात काही लहान मुले धावत आली. स्वामींच्या भोवताली गोल रिंगण करून बसली. कुणी टिवल्या बावल्या करत होतं. कुणी खोड्या करत होतं. कुणी गोळ्या चघळत होतं. त्यातला एक धिटूकला मुलगा पुढे आला. आणि म्हणाला.
“स्वामी तुम्ही कोणत्या जातीचे?” स्वामी थोडं हसले. म्हणाले, “माझी जात? अहो मलाच माहित नाही! मी फक्त माणूस आहे. आणि तू? तू कोण आहेस?” मुलगा थोडा गोंधळला… पण मग त्याचा चेहरा उजळला. “मी पण माणूस! तुम्ही पण माणूस, मी पण माणूस! ” तो म्हणाला.
स्वामी हसले, म्हणाले –
“जात ही मनात असते, रक्तात नाही. मन स्वच्छ ठेवलं, तर देव आपल्या जवळ येतो!” मुलांना पटलं. मुलांच्या मनातली जात गेली. त्यांच्यातली माणुसकी जागी झाली. त्यांनी आपापल्या घरी जाऊन सांगितलं. “जात ही मनात असते, रक्तात नसते”. सगळ्या गावाला ते पटलं. शाळेच्या फळ्यावर दुसऱ्या दिवशी सुविचार लिहिला गेला.
“जात ही मनात असते, रक्तात नसते. मुलांना जातीद्वेष शिकवू नका!”
ही गोष्ट सगळीकडे पसरली,
ती शाळा आदर्श शाळा झाली. ते गाव आदर्श गाव झालं.
श्रीचक्रधर स्वामींवरील
‘लीळाचरित्र’ हे पहिलं मराठी पुस्तक ठरलं. त्यांनी उच्च –नीच, जाती–पातीच्या भिंती पाडल्या. माणूसकीचं राज्य महाराष्ट्रात आणलं.
जात मनात असते, रक्तात नाही. मुलांना जातीद्वेष शिकवू नाही.
सर्व जीव एक समान,
नसावा द्वेष, नसावा मान!
प्रत्येकात देव पाहावा,
महानुभाव पंथ घडवावा
श्रीचक्रधरस्वामींचा सांगावा!
जय श्रीचक्रधरस्वामी.
जय शिवाजी.
जय महाराष्ट्र.
जय हिंद.
भारत माता की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


