Children’s Stories

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 21 – रामभक्त शबरीची उष्टी बोरे

श्रीराम श्रीराम श्रीराम ! राम लक्ष्मण सीतेच्या शोधात जंगलातून जात होते. त्यांना एका लहानशा झोपडीमधे शबरी नावाची आदिवासी स्त्री भेटली. ती फुलांच्या माळा बनवत असे. शबरी खूप साधी होती, पण मनाने खूप मोठी होती. ती रामभक्त होती. एक ना एक दिवस आपल्याला रामाचे दर्शन होईल अशी तिला आशा होती. हातात फुले आणि मुखात राम. अचानक श्रीराम आणि लक्ष्मण आलेले पाहून शबरी खूष झाली. तिनी श्रीरामांसाठी जंगलातून बोरं आणली. एकेक बोर चाखून गोड बोरं रामासाठी ठेवली. ती साधी आणि शुद्ध मनाची होती. तिनी आपली श्रद्धा आणि प्रेम दिलं. श्रीरामांनी ती उष्टी बोरं मोठ्या आनंदानी खाल्ली. आणि शबरीचा निरोप घेऊन सीतेला शोधायला निघाले. प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 21 – रामभक्त शबरीची उष्टी बोरे Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 20 – जटायूच्या बलिदानाने सीतेच्या शोधाला दिशा मिळाली.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून रावणाला सीतेला पळवून नेण्याची संधी मिळाली. अतिशय दुःखात असलेले राम, लक्ष्मण घनदाट जंगलात सीतेला शोधू लागले. एका झुडपामागून त्यांना कुणाचा तरी कण्हण्याचा आवाज ऐकू आला. तो गरुडांचा राजा, जटायू याचा आवाज होता. जटायू रामभक्त, शूर, पराक्रमी, आणि सद्वर्तनी होता. जटायूने रावण सीतेला आकाश रथातून पळवून नेत आहे हे बघितले. सीता आक्रोश करत होती. संकटात सापडलेल्या स्त्रीला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे हे जटायूला माहीत होते. जटायूने, रावणावर, हल्ला केला. तुंबळ युद्ध झाले. त्याने आपल्या चोचीने रावणाला हजारो जखमा केल्या. रावणाचा आकाश रथ मोडण्याचा प्रयत्न केला. पण रावणाने तलवार काढली आणि जटायूचे दोन्ही पंख छाटून टाकले. जटायूचे प्राण त्याच्या पंखात होते. पंख छाटले गेल्याने जटायू निष्प्रभ झाला. शक्तीहीन झाला. व जमिनीवर कोसळला. तो वेदनेने तळमळत होता. विव्हळत होता. कण्हत होता. जखमांमधून रक्ताच्या धारा वाहत होत्या. पण श्रीराम सीतेला शोधत येतील याची त्याला खात्री होती. श्रीरामांची भेट झाल्या झाल्या रावण सीतेला घेऊन आकाश मार्गे दक्षिण दिशेला गेल्याचे सांगितले. आणि मगच त्यानी श्रीरामांच्या हातात आपला प्राण सोडला. जटायूच्या बलिदानाने सीतेच्या शोधाला दिशा मिळाली आणि राम-लक्ष्मण सीतेला शोधायला दक्षिण दिशेला निघाले. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 20 – जटायूच्या बलिदानाने सीतेच्या शोधाला दिशा मिळाली. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 19 – सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीराम दिव्य धनुष्य घेऊन सोनेरी हरणाचा पाठलाग करू लागले. ते मायावी हरीण श्रीरामांना हुलकावणी देत खोलवर जंगलात लांब निघून जाई. श्रीरामांनी एकच तीक्ष्ण बाण त्या हरणावर सोडला. हरणाचे रूप घेतलेला मारीच राक्षस धाडकन जमिनीवर पडला. मारीच राक्षसाने पडता पडता श्रीरामाचा आवाज काढून लक्ष्मणा धाव रे मी मेलो. लक्ष्मणा धाव रे मी मेलो. लक्ष्मणा धाव रे मी मेलो. अशी आरोळी ठोकली. श्रीराम संकटात आहे हे ऐकून सीता घाबरली. भेदरली. तिने लक्ष्मणाला आज्ञा दिली. आत्ताच्या आत्ता श्रीरामांच्या मदतीला जा. लक्ष्मणाची सीतेला जंगलात एकटे सोडून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण कधी कधी स्वतःच्या इच्छेविरुद्ध वागावे लागते. लक्ष्मणाने जंगलात श्रीरामांच्या मदतीसाठी जाण्याचे ठरवले. लक्ष्मणाने श्रीरामांचे नाव घेऊन एका बाणाने पर्णकुटीच्या सभोवताली जमिनीवर एक रेषा काढली. आणि सीतेला सांगितले. ही लक्ष्मण रेषा आहे. तिच्या आत कोणी येऊ शकणार नाही. पण सीतेने ही लक्ष्मण रेषा ओलांडून जाऊ नये. बाहेर धोका आहे.लक्ष्मण रेषा म्हणजे नियम. सुरक्षेचे नियम कधीही मोडायचे नसतात. लहानपणी आई वडील नियम बनवतात. ते मुलांनी पाळायचे असतात. मोठेपणी आपले आपणच नियम पाळायचे असतात. ट्रॅफिक सिग्नल लाल झाल्यावर भर चौकातून गाडी दामटली तर ॲक्सीडेंट होणारच. लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा. ती कधीही ओलांडायची नसते. लक्ष्मण दूर गेलेला पाहून रावण एका साधूचे रूप घेऊन पर्णकुटी बाहेर भिक्षापात्र घेऊन आला. सीता भिक्षा द्यायला आली. पण ती काही लक्ष्मण रेषा ओलांडेना. तिथे लक्ष्मण रेषा आहे हे रावणाच्या लक्षात आले. त्यानी चक्कर येऊन पडल्याचे नाटक केले. मी भुकेने तळमळत आहे. माझ्या अंगात एकही पाऊल पुढे टाकायची शक्ती नाही. तूच माझ्यापर्यंत येऊन मला भिक्षा दे. असे रावणाने सीतेला सांगितले. भुकेने होणारी त्याची तडफड पाहून सीतेला त्याची दया आली. आणि ती साधूच्या रूपात आलेल्या रावणाला अन्न द्यायला पुढे आली. रावणाने तिचा हात एका झटक्यात पकडला. जबरदस्तीने आपल्या रथात ओढले. आणि आकाश मार्गाने लंकेकडे निघाला. घाबरून सीता आरडाओरडा करू लागली. तिची दयनीय अवस्था पाहून जंगलातले पशुपक्षीही ओरडू लागले. सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि तिचा घात झाला. दुष्ट राक्षस रावणाने डाव साधला, सीतेला पळवून नेले. सीतेचे अपहरण झाले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 19 – सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 18 – सोनेरी हरणाचा मोह

श्रीराम श्रीराम श्रीराम ! नाक कान कापलेली रक्तबंबाळ शूर्पणखा राक्षसीण रडत ओरडत आपला सख्खा भाऊ रावण याच्याकडे गेली. बहिणीची विद्रूप आणि केविलवाणी अवस्था बघून रावण संतापाने लाल लाल झाला. शूर्पणखेने रावणाला सीतेच्या सौंदर्याचे रसभरीत वर्णन ऐकवले. रामाचा वध करून सीतेला पट्टराणी करण्याची प्रतिज्ञा रावणाने घेतली. शूर्पणखेने रावणाला सांगितले. राम महापराक्रमी आहे. त्यावर कपटी, बेसूर, हास्य करत रावण म्हणाला. जिथे, शक्तीचा उपयोग होत नाही तिथे कपट नीती वापरावी. छळ कपट करावे. सरळ साध्या माणसांची फसवणूक करावी. आणि आपला दुष्ट हेतू साध्य करून घ्यावा. रावणाला तर सीताच हवी होती. रावण मारीच राक्षसाला भेटला. मारीच राक्षसाला मायावी शक्तीने कोणतेही रूप घेता येत होते. रावणानी मारीचाला सांगितले. तू कांचन मृगाचे म्हणजे सोनेरी हरणाचे रूप घेऊन रामाच्या पर्णकुटीकडे जा. सोनेरी हरणाच्या मोहात पडून सीता रामाजवळ हट्ट करेल. राम तुझ्या मागे पळत येईल. आणि मी माझा डाव साधेन. मारीच राक्षसाला ते मान्य करणे भाग पडले. आणि तसेच झाले. सीतेला आपल्या पर्णकुटी जवळ एक सोनेरी हरीण फिरताना दिसले. त्या हरणाच्या सौंदर्याने सीतेला मोहित केले. सीतेला, ते हरिण खूपच आवडले. सीतेने रामाजवळ हट्ट केला. असे अद्वितीय सुंदर हरिण आपल्या अंगणात बागडत हवे. रामाने तिची समजूत काढायचा प्रयत्न केला. श्रीरामाला शंका आली. एखाद्या मायावी राक्षसाने सोनेरी हरणाचे रूप घेतले असावे. असे, सोनेरी हरीण पृथ्वीवर असूच शकत नाही. मृगजळाच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही. रखरखीत वाळवंटात दूरवर पाणी असल्याचा भास होणे म्हणजे मृगजळ. ते खरे नसते. त्याच्यामागे धावायचे नसते. पण सीता काही आपला हट्ट सोडेना. शेवटी श्रीरामांचा नाईलाज झाला. लक्ष्मणाला सीतेचे रक्षण करायला सांगून श्रीराम आपले दिव्य धनुष्यबाण घेऊन सोनेरी हरणाचा जंगलात पाठलाग करू लागले. राम लक्ष्मण सीता सोनेरी हरणाच्या मोहाच्या सापळ्यात पूर्णपणे अडकले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 18 – सोनेरी हरणाचा मोह Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 17 – लक्ष्मणानी शुर्पणखेचे नाक कापले

श्रीराम श्रीराम श्रीराम ! चित्रकूट पर्वतावरील पर्णकुटीत राम लक्ष्मण सीता राहतात हे अयोध्येच्या लोकांना कळले होते. वनवासाची प्रतिज्ञा पाळण्यासाठी, तिघेही चित्रकूट पर्वतावरून निबिड जंगलात निघाले. वाटेत त्यांना अत्री ऋषींचा आश्रम लागला. जवळच त्यांना एक मानवी हाडांचा म्हणजे माणसांच्या हाडांचा प्रचंड मोठा डोंगर दिसला. तो हाडांचा डोंगर अवाढव्य विराघ राक्षसाने मारलेल्या लोकांच्या हाडांचा निघाला. श्री रामाने एकाच बाणात त्याला यमसदनास पाठवले. म्हणजे मारून टाकले. जंगलातून मजल दरमजल करत राम लक्ष्मण सीता अगस्ती ऋषींच्या आश्रमात पोचले. तो आश्रम दंडकारण्यात होता. अगस्ती ऋषींनी भयाण उजाड आणि रुक्ष असा दंडकारण्याचा भूभाग पर्जन्यवृष्टी करून म्हणजे पाऊस पाडून झाडा फुलांनी बहरून टाकला. आणि दंडकारण्याचा प्रदेश सुपीक केला होता. अगस्ती ऋषींनी श्रीरामाला आत्ताच्या नाशिक जवळील पंचवटीचा मार्ग दाखवला. तिथे वास्तव्य करावे असे सुचवले. पण तो प्रदेश शुर्पणखा नावाच्या लांब लांब नखे असलेल्या एका राक्षसीचा होता. तिचे शरीर बेढब आणि रूप, अक्राळ विक्राळ होते. ती लंकेचा राजा रावण याची बहीण होती. श्रीराम व लक्ष्मणाचे, मोहक रूप बघून ती वेडीच झाली. तिने एक रामायणातील सुप्रसिद्ध असुरी हास्य केले. हॅ हॅ हॅ हॅ. हॅ हॅ हॅ हॅ. तिने एका सुंदर तरुण मुलीचे मायावी रूप घेतले. आणि रामाला लग्नासाठी मागणी घातली. पण रामानी सीतेकडे बोट दाखवून सांगितले ही माझी पत्नी आहे. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मग तिने, लक्ष्मणाला मागणी घातली. लक्ष्मणानी सांगितले मी रामाचा आजन्म सेवक आहे. माझ्याशी लग्न केले तर तुला जन्मभर रामाची दासी बनून राहावे लागेल. राम लक्ष्मण यांनी नकार दिल्याने शुर्पणखेला राग आला. तिनी आपल्या अजस्त्र हातानी एखादे फूल उचलतात तसे सीतेला उचलले. ते दृश्य बघून रामानी लक्ष्मणाला आज्ञा केली. लक्ष्मणा या दुष्ट शुर्पणखेचे नाक काप. लक्ष्मणानी तत्काळ आपली तलवार काढून एका झटक्यात शुर्पणखेचे नाक आकाशात उडवून लावले. रक्तबंबाळ शुर्पणखा रडत रडत आपला भाऊ रावण याच्याकडे राम-लक्ष्मण यांची तक्रार घेऊन गेली. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 17 – लक्ष्मणानी शुर्पणखेचे नाक कापले Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 16 – भरत भेटीची गोष्ट 

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीराम लक्ष्मण आणि सीता चित्रकूट पर्वतावर पर्णकुटीत राहत होते. श्रीराम वनवासात आहेत हे ऐकून. भरताला राग आला. वाईट वाटले. भरताचा आक्रोश ऐकून पाषाणालाही पाझर फुटला असता. भरत म्हणाला. “मला राजा होण्याची इच्छा नाही. मी आत्ताच वनात जाऊन माझ्या लाडक्या श्रीरामाला परत घेऊन येतो. सर्व ऋषींनी भरताचे कौतुक केले. ते म्हणाले “भरता तुझी कीर्ती जगभर पसरेल. श्रीरामाबरोबरच लोक तुझेही गुणगान करतील. तुझं भावावरील प्रेम भारतीय संस्कृतीचा मानबिंदू ठरेल. भरताने सर्व आचार्यांना नम्र भावाने वंदन केले. संपूर्ण कुटुंब मंत्रिमंडळ अयोध्या वासी आणि प्रचंड सैन्यासह चित्रकुटाच्या दिशेने निघाला. वाटेत अनेक अडथळे आले. पण तो थांबला नाही. चित्रकूट पर्वतावर श्रीरामांच्या पर्णकुटीत पोचला. धावत रामाच्या पाया पडला. रामाची भेट झाल्यामुळे त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तो म्हणाला “ श्रीरामा, अयोध्या तुझी वाट पाहतेय. तू परत ये राज्य सांभाळ.” रामाने भरताला प्रेमाने घट्ट आलिंगन दिले. मिठी मारली. आणि सांगितले वडिलांनी दिलेल्या आज्ञेचे पालन करणे हे माझं कर्तव्य आहे. मी परत येऊ शकत नाही. अयोध्येचा राज्यकारभार बघणे. हा तुझा राजधर्म आहे. मी माझे कर्तव्य पाळतो. तू तुझा राजधर्म पाळ. भरताने चंदनाच्या लाकडी पादुका म्हणजे चपला श्रीरामांसमोर ठेवल्या. आपल्या पायाचा स्पर्श या पादुकांना करा. त्यांचा मी राज्याभिषेक करीन. व आपला प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार सांभाळेन. असे भरताने श्रीरामांना सांगितले. भरताने त्या पादुका डोक्यावर घेतल्या. आणि तो अयोध्येला परत गेला. त्याने आयुष्यभर साधेपणा ठेवला. आपले आपल्या भावावरील निस्वार्थ प्रेम. कर्तव्य आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे भरत आणि राम यांचं आदर्श भावंडांचं नातं 14 हजार वर्षानंतर सुद्धा आजही भारतीय संस्कृतीमधे रुजलेलं आहे. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 16 – भरत भेटीची गोष्ट  Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 15 – श्रावण बाळाचा आणि राजा दशरथाचा मृत्यू.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीरामाच्या वनवासाने राजा दशरथाची परिस्थिती दयनीय झाली होती. श्री रामाच्या आठवणीने राजा दशरथ तळमळत होता. मंत्री सुमंत धीर देत होते. आधार देत होते. राजा, तू धार्मिक आहेस. चांगला शिकलेला विद्वान आहेस. धैर्यवान आणि शूरवीर आहेस. आयुष्यात चढ उतार येत असतात. अंधार आणि उजेड येत असतात. चांगल्या घटना, वाईट घटना, घडत असतात. सुख आणि दुःख येत असते. जात असते. तुझ्यासारख्या तपस्वी व्यक्तीने या परिस्थितीचा शांतपणे, सामना करायला हवा. राजा दशरथाला आठवले. श्रावण बाळाच्या अंध आई-वडिलांच्या शापामुळेच हे सगळे घडते आहे. एकदा राजा दशरथ जंगलात शिकारीला गेला होता. अंधार पडू लागला होता. राजाला नदीकाठाच्या दिशेने झुडपाच्या आड कुणीतरी जनावर पाणी पीत असल्याचा आवाज आला. राजाने मारलेला धनुष्याचा बाण लागून, “अगं आई ग, मेलो” असा आवाज ऐकू आला. धावत जाऊन राजाने पाहिले तर एका तरुणाच्या छातीत तो बाण घुसला होता. तरुण वेदनेने तळमळत होता. त्यानी सांगितले माझे नाव श्रावण आहे. माझे आई-वडील वृद्ध आणि अंध आहेत. मी त्यांना खांद्यावर कावडीत घेऊन चालत तीर्थयात्रेला निघालो आहे. ते तहानलेले आहेत. त्यांना हे पाणी प्यायला नेऊन दे. असे म्हणून तो गतप्राण झाला. राजा दशरथ श्रावण बाळाच्या वृद्ध आई-वडिलां जवळ आला. श्रावणाच्या मृत्यूची हृदय द्रावक हकीकत सांगितली. श्रावणाच्या आई-वडिलांनी दुःखानी टाहो फोडला. आणि मृत्यूशयेवर असतानाच राजा दशरथाला शाप दिला. “आमच्यासारखाच तुलाही मुलाच्या विरहानेच मृत्यू येईल”. राजा दशरथ म्हणाला, तो भयानक शाप आज खरा होणार आहे. राम… राम… राम… दशरथाच्या घशाला घरघर लागली. श्रीरामाच्या चैतन्यमयी मूर्तीचे ध्यान करत त्याने प्राण सोडला. त्याचे निधन झाले. तो स्वर्गवासी झाला. प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 15 – श्रावण बाळाचा आणि राजा दशरथाचा मृत्यू. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 14 – श्रीराम चित्रकूट पर्वताकडे निघाले.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! अयोध्येतील नागरिक नदीच्या तीरावर गाढ झोपले असतांना राम-लक्ष्मण सीता रथात बसून निघाले. सकाळ झाल्यावर लोकांच्या लक्षात आलं. आपल्या नशिबाला दोष देत सगळेजण आपापल्या घरी परतले. रथ गंगा नदीच्या तीरावर आला. श्रीराम लक्ष्मण सीता यांनी रथातून उतरून पवित्र गंगा नदीला नमन केले आणि गंगास्नान केले. आदिवासी राजा निषाद राज याला श्रीराम त्यांच्या राज्यात आला आहे हे कळले. राजा निषाद श्रीरामांचा निस्सीम भक्त होता. त्याने श्रीरामांना आपल्या राजवाड्यात राहण्याची विनंती केली. पण श्रीरामांनी नम्रपणे नकार दिला. माझे वडील राजा दशरथ यांनी मला, 14 वर्षे तपस्वी जीवन जगण्याची आज्ञा दिली आहे. आणि वडिलांच्या आज्ञेचे पालन मला करायचे आहे. असे सांगितले. श्रीरामांनी मंत्री सुमंत यांनासुद्धा परत जाऊन राजा दशरथ यांच्या मंत्र्याचे काम करावे. अशी विनंती केली. अत्यंत दुःखी अंतकरणाने मंत्री सुमंत परत गेले. राम लक्ष्मण सीता एखाद्या यात्रीकरू सारखे घनदाट जंगलातून प्रयाग गावी पोचले. गंगास्नान केल्यानंतर ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले. श्रीरामांना पाहून भारद्वाज ऋषींना खूप आनंद झाला. त्यांनी त्यांचे स्वागत केले. भारद्वाज ऋषी म्हणाले श्रीरामा तुझ्या येण्याने माझी तपश्चर्या ध्यानधारणा उपास आणि तीर्थयात्रा यांचे सार्थक झाले. माझी सर्व स्वप्ने पूर्ण झाली आहेत. भारद्वाज ऋषींच्या सूचनेवरून सुंदर आणि नीरव शांतता असलेल्या चित्रकूट पर्वतावर राहण्यासाठी राम लक्ष्मण आणि सीता प्रवासाला निघाले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 14 – श्रीराम चित्रकूट पर्वताकडे निघाले. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 13 – राम वनवासाला निघाले.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सर्वांचा निरोप घेऊन राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाले. रथ त्यांची वाटच पाहत होता. जनतेला अनावर, दुःख झाले होते. लोक धाय मोकलून रडत होते. एक प्रचंड जनसागर त्यांच्या रथाच्या मागून चालत निघाला. कुणालाच रामाला एकटं सोडायचे नव्हतं. सगळ्यांनाच रामाबरोबर वनवासात जायचे होते. रामानी हात जोडून सगळ्या लोकांना विनंती केली की त्यांनी परत जावं. कुणीही त्याचं ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. लहान मोठे स्त्री-पुरुष सगळे मागून चालत होते. रथ तमसा नदीच्या किनारी पोचला. रात्र झाल्याने रामाने प्रवास थांबवला व विश्रांती घ्यायचा निर्णय घेतला. बरोबर आलेला, जनसागर सुद्धा तिथेच थांबला. दुःखानी आणि चालून चालून थकल्याने सगळे लोक लगेच आजूबाजूला जमिनीवरच झोपी गेले. मध्यरात्री रामानी मंत्री सुमंत त्यांना उठवले आणि हळू आवाजात त्यांच्या कानात सांगितले. या बरोबर आलेल्या लोकांना आयोध्येत परत जावेच लागेल. तरच माझं कर्तव्य आणि माझं ध्येय पूर्ण होईल. कुणीही उठायच्या आत आपण रथात बसून आवाज न करता निघून जाऊ. सुमंतांनी तसेच केले झोपलेल्या बिचार्‍या श्रद्धाळू लोकांना सोडून रथ आवाज न करता शांतपणे जंगलाच्या दिशेने निघाला. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 13 – राम वनवासाला निघाले. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 12 – लक्ष्मणाचे बंधुप्रेम आणि वनवासाची तयारी.

श्रीराम, श्रीराम, श्रीराम ! रामाच्या वनवासाची बातमी ऐकून लक्ष्मणाला खूप राग आला. त्यानी रामाला सांगितले आपण अन्यायाविरुद्ध लढायला हवे. आपण तुझा राज्याभिषेक करू. कोण आडवे आले तर मी युद्ध करीन. पण रामानी ठामपणे सांगितले. लक्ष्मणा, शांत हो. परिस्थिती नाजूक आहे. हा रघुवंशाच्या सन्मानाचा व अभिमानाचा, प्रश्न आहे. वडिलांनी दिलेले वचन पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. मी माझ्या आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन करणार. राज मुकुटा पेक्षा मला कर्तव्य मोठे वाटते. लक्ष्मण म्हणाला असं असेल तर मी ही तुझ्याबरोबर वनवासात येणार. कुठल्याही परिस्थितीत मी तुझी साथ सोडणार नाही. रामाने ते मान्य केले. सितेनीही वनवासात रामाला सोबत करण्याचा हट्ट धरला. आणि तो रामाला मान्य करावा लागला. सगळे दुःखात होते. राजा दशरथ दुःखाने चक्कर येऊन पडला होता. त्यांनी रामाला विनंती केली की मला सोडून जाऊ नको रे. राणी कैकयीने मला दुष्ट पणे फसवले आहे. रामाने विनम्रपणे सांगितले की आयोध्या राजसत्ता राजेशाही जीवन याचा मला अजिबात मोह नाही. आता यापुढे वनवास आणि आदिवासी जीवन हेच माझ्या मालकीचं आहे दुष्ट कपटी मंथराने कैकेयीच्या मदतीने आधीच त्यागाचं प्रतीक असलेली भगवी वस्त्रे कैकयीच्या मदतीने आणून ठेवली होती. राम लक्ष्मण आणि सीता भगवी वस्त्रे घालून आपल्या कुटुंबाला आणि राजमहालाला सोडून जंगलात वनवासात जाण्यासाठी रथाच्या दिशेने निघाले. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 12 – लक्ष्मणाचे बंधुप्रेम आणि वनवासाची तयारी. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 11 – मंथरेचे विष आणि कैकेयीचा वर

श्रीराम, श्रीराम, श्रीराम! इकडे श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. सगळे आनंदात होते. पण तिकडे कैकेयीच्या महालात काही वेगळेच नाटक घडत होते. कैकेयीची दुष्ट दासी मंथरा कैकेयीच्या कानात विष ओतत होती. रामाच्या राज्याभिषेकाचा डाव उधळून टाकण्याची योजना तिच्या मनात पेरत होती. रामाचा राज्याभिषेक झाला की भरताला त्याचा गुलाम व्हावं लागेल. कौशल्या राजमाता होईल. कैकयीला दासी व्हावे व्हावे लागेल. मंथरेने कैकेयीच्या कानात विष ओतले. आणि कैकेयी तिच्या कारस्थानाला, बळी पडली. कैकेयिनी सगळे दागिने फेकून दिले. केस मोकळे सोडले. साधे, काळे, कपडे घातले. आणि ती रुसून बसली. राजा दशरथ कैकेयीच्या महालात आल्यावर समोरचे दृश्य बघून त्याला धक्काच बसला. रामाच्या राज्याभिषेका सारख्या मंगल प्रसंगी तू का नाराज आहेस. अनेक आढेवेढे घेऊन अनेक नाटकं करून कैकेयीने राजा दशरथाला हतबल केले. एका युद्धात, कैकेयीने राजा दशरथाचा जीव वाचवला होता. त्यावेळी दशरथाने तिला दोन वर दिले होते. त्याची आठवण तिनी करून दिली. राजा दशरथ म्हणाला सांग तुला काय देऊ. कैकेयी म्हणाली मग ऐका तर नीट लक्ष देऊन ऐका. पहिल्या वरानी उद्या माझ्या भरताला राज्याभिषेक करावा. आणि दुसऱ्या वराने रामाला वल्कले नेसून 14 वर्षे वनवासात पाठवावे. ते ऐकून दशरथाच्या तोंडून शब्दही फुटेना. राजा दशरथाने गयावया केली. पण कैकेयीने निक्षून सांगितले. माझ्या दोन्ही वरांची पूर्तता ही झालीच पाहिजे. दुष्ट कैकयीचा हट्टीपणा बघून राजा दशरथ राम राम म्हणत जमिनीवर कोसळला. बेशुद्ध झाला. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 11 – मंथरेचे विष आणि कैकेयीचा वर Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 10 – रामाच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला

श्रीराम, श्रीराम, श्रीराम! अयोध्येमध्ये आनंदी आनंद होता. राम लक्ष्मण राजा दशरथाला राज्यकारभारात मदत करत होते. पण, राजा दशरथाला, एक दिवशी जाणवले. आपण वृद्ध हो चाललो आहोत. म्हातारपण आलेले आहे. केस पांढरे झाले आहेत. आता, रामाच्या हाती, राजमुकुट सोपवून निवृत्त व्हायची वेळ आली आहे. आता तपश्चर्या करण्याची आणि देवपूजा करण्याची वेळ आलेली आहे. राजा दशरथाने गुरु वशिष्ठांचा सल्ला घेतला. गुरु वशिष्ठ म्हणाले राम एक उत्कृष्ट राजा होऊ शकेल. पण त्याला आधी राज दरबार, बोलवावा लागेल. सर्व मंत्र्यांना बोलवावं लागेल. त्यांची जनतेची प्रजाजनांची संमती घ्यावी लागेल. राजा दशरथाने दुसऱ्याच दिवशी दरबार बोलावला. आणि रामाला राज्याभिषेक करण्याचा आपला विचार सगळ्यां समोर मांडला. संपूर्ण राजदरबाराने एक मुखाने घोषणा केली. आम्ही सर्व जण तुमच्याशी सहमत आहोत. राजकुमार राम हा एक आदर्श  आहे.  दयाळू आहे. शूर आहे. शहाणा आहे. नीतिमान आहे. आम्हाला सर्वांना तो आवडतो. संपूर्ण राजदरबारात एक सुद्धा दरबारी रामाला राजा करण्याच्या विरोधात नव्हता. राजा दशरथाने रामाला बोलवून सांगितले की या दरबाराची इच्छा आहे की तू आता राज्यकारभार हाती घेऊन अयोध्येचा राजा व्हावे. जशी आपली आज्ञा प्रभू रामचंद्र म्हणाले. गुरु वशिष्ठांनी ग्रह नक्षत्रांचे गणित मांडून राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. रामाच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकून आयोध्या नगरवासी खुश झाले. ते त्यांचे स्वप्न होते. गुरु वशिष्ठांनी राम व सीतेला राजाची आणि राणीची कर्तव्ये समजून सांगितली. ते म्हणाले राजा होणे सोपे नाही. ते एक आव्हान आहे. राजा हा प्रजेचा मालक नसतो.  सेवक असतो. जनतेमधून आलेल्या मंत्रिमंडळाचे म्हणणे राजाने नेहमी लक्षात घ्यावे. दरबारातील लोकांकडे दुर्लक्ष करू नये. कारण तेच राजाचे डोळे असतात आणि कान असतात. राजाच्या मनात सर्वांविषयी दयाभाव हवा. न्याय गरिबांपर्यंत पोचायला हवा. युद्धात सैन्याचे नेतृत्व करायला हवे. सीतेलाही गुरु वशिष्ठांनी राणीची कर्तव्ये सांगितली. आणि शेवटी दोघांनाही मनापासून आशीर्वाद दिले. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 10 – रामाच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला Read Post »

Scroll to Top