स्टेजवर नृत्यात रमलेल्या त्या मुली पाहून एक क्षणभर थांबलो. पहिल्या-दुसऱ्या वर्षाच्या कॉलेजमधल्या मुली वाटाव्यात, इतकं आत्मविश्वासानं नाचत होत्या. चेहऱ्यावर तेज, ड्रेस छान, नृत्यात कमालीची ग्रेस! पण या मुली कोण होत्या? त्या आमच्या बालकल्याण केंद्रातील सहावी-सातवीच्या मूकबधिर मुली होत्या.
त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात आलं—या एका नृत्यामुळे त्यांची स्वतःविषयीची प्रतिमा कशी बदलली आहे! कदाचित, त्यांच्या मनात किंवा त्यांच्या आई-वडिलांच्या कल्पनेतही कधी आलं नसेल की त्या एवढ्या स्मार्ट, मॉडर्न आणि आत्मविश्वासानं भरलेल्या दिसू शकतात. पण आज त्या स्टेजवर होत्या, संपूर्ण आत्मविश्वासाने नृत्य सादर करत होत्या.
ही आहे खरी ‘नर्चरिंग’ची जादू!
हे सहजसाध्य नव्हतं. त्यांच्या कर्तृत्ववान, दूरदर्शी शिक्षकांनीच ही कल्पना सुचवली, त्यांना स्टेजवर आणलं. त्यांना ऐकू येत नाही, तरीही त्यांनी संगीत समजून घेतलं, ताल धरला, नृत्यातून भाव व्यक्त केले. हे काही साधं काम नाही! हे नुसतं नृत्य नव्हतं; हा आत्मविश्वासाचा उत्सव होता, हा स्वत्वाचा शोध होता!
आज या मुली स्वतःला कधीच ‘डॅमेजड पीस’ किंवा ‘डिसेबल्ड’ मानणार नाहीत. त्यांची स्वतःविषयीची ओळख बदलली आहे. हाच खरा विजय आहे! यश म्हणजे अजून काय असतं?
हे शक्य केलं शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी!
या मुलींच्या आयुष्यात हा बदल घडवून आणणाऱ्या शिक्षक-शिक्षिका, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. त्यांनी या मुलींमध्ये आत्मविश्वास, कौशल्य आणि आत्मसन्मान रुजवला. माझ्या टीमने, माझ्या स्टाफने आणि शिक्षकांनी माझी स्वप्नं प्रत्यक्षात आणली आहेत.
याचसाठी केला होता अट्टाहास!
मूल केवळ शिकावं एवढ्यावरच माझा विश्वास नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलावं, त्यांना स्वतःची ताकद उमगावी, ते आत्मनिर्भर बनावेत—यासाठीच हा प्रयत्न! आणि आज, या स्टेजवरच्या मुली पाहिल्यावर वाटतं—होय, हे स्वप्न पूर्ण होतंय!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)
