#21
“दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे.”
बापरे, बापरे! केवढा प्रचंड अर्थ ठासून भरलाय श्री समर्थ रामदास स्वामींच्या या एका वाक्यात! “दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे. अभ्यासे प्रकट व्हावे. नाही तरी झाकोनी असावे. नेमकचि बोलावे. तत्काळची प्रतिवचन द्यावे.” जसजसा या वाक्याचा अर्थ समजायला लागतो, तसतसे मेंदूतल्या ज्ञानाचे एकेक दालन उघडायला लागते. हे फक्त शाळेतल्या भिंतीवर लिहायचं ‘सुभाषित’ नाही, तर मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे, त्रिकालाबाधित सत्य आहे.
लेखन आणि वाचनाचे आयुष्यातील अनुभव
माझा मुलगा (३५) एक दिवस मला (७५) म्हणाला, “बाबा, अक्षर सुंदर दिसावं म्हणून तू एवढं महागडं, शंभर रुपयाचं, जाड टोकाचं रिफील का वापरतोस? परवडत नाही आता आपल्याला. आपली आर्थिक परिस्थिती बदललेली आहे. हॉस्पिटल बंद केलंय आपण. आणि तरीही तू रोज इतकी पानंच्या पानं लिहीत असतोस. ते वाचतंय तरी कोण?”
उत्तरादाखल माझ्या जिभेवर “दिसामाजी काहीतरी…” आलं, पण मी मनाला आणि जिभेला ब्रेक लावला. दोस्त खात्यात हसण्यावारी नेलं. अस्थायी होतं राव ते! जाऊ दे. आपलं दुःख आपल्या जवळ. दुसऱ्याला काय सांगायचं!
असंच एकदा तीस वर्षांपूर्वी, माझ्या बायको बाबतही झालं. मी चाळीशीतला सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ, आणि ती पस्तिशीतली सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ होती. त्याकाळची घटना. रात्री जेवल्यानंतर झोपताना, “अपंग क्षेत्रातील समस्या व उपाय” या माझ्या क्रांतिकारक, नव्या लेखाचा पहिला परिच्छेद पूर्ण वाचून दाखवण्याआधीच बायकोने, “बघू हो ते नंतर, झोपा आता गुपचूप. मला सकाळी सहाला सिझर आहे. आणि तुम्हालाही बाळासाठी यायचं आहे,” असं म्हणून मला पृथ्वीवर आणलं. माझ्या जिभेवर “दिसामाजी काहीतरी…” आलं, पण मी मनाला आणी जिभेला ब्रेक लावला. अस्थायी होतं राव ते वाक्य! जाऊ दे. आपलं दुःख आपल्या जवळ. दुसऱ्याला काय सांगायचं! त्या दिवशी मात्र मला “नॉर्मल” होण्याची गरज आहे, याचा साक्षात्कार झाला.
सोशल मीडियाच्या युगात लेखनाची क्रांती
बाकी देशाचं मला माहित नाही, पण “दिसामाजी काहीतरी” लिहिणाऱ्या जमातीला, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया आल्यापासून “अच्छे दिन आये है”. सुगीचे दिवस आले आहेत. आपले आपण अखंडीत लिहीत राहावे. सगळ्या ग्रुपवर सगळ्या लोकांना पोस्ट करत राहावे. कोणी वाचो न वाचो, आपल्याला काय त्याचे देणे घेणे? किती लोकांनी सोशल मीडियावर मला ब्लॉक केले असेल, मी कधी बघायच्या भानगडीतच पडलो नाही. आपल्याला काय त्याचे.
लेखन-वाचन: आयुष्याची गुरुकिल्ली
लेखन आणि वाचन या जीवनावश्यक कला आहेत. मी तिसरीत असतानाच आमच्या गुरुजींनी “बघा हा मुलगा, कसा घडाघडा ‘संपूर्ण सकाळ’ वाचून दाखवतो ते. शिका काही याच्याकडून,” असं म्हणून, मला नगरपालिकेच्या सर्व शाळांमधून फिरवून आणलं. तेंव्हापासून लागलेला ‘वाचनाच्या किड्याचा झूनॉटिक डिसीज’, क्रॉनिक होऊन आजवर टिकून आहे.
तसंच लेखनाच्या बाबतीतही झालं. म.ए.सो. शाळेच्या बाईंनी, माझा “तुकोबाची पालखी” हा निबंध, संपूर्ण शाळेला वाचून काय दाखवला, त्यानंतर मी “दिसामाजी जन्मभर” लिहीतच राहिलो. व्यक्तिमत्त्व विकास हो, अती व्यक्तिमत्त्व विकास!
मेडिकलला गेल्यावर तर इतर सगळ्याच ९९% बुद्धिमान मुलांवर मात करून, साधं पास व्हायचं असेल तरी, तेच तेच प्रकरण, अनेकदा वाचण्याशिवाय पर्यायच नव्हता. सगळे सहपाठी जेमतेम कसेबसे एकदा, मेटाकुटीला येऊन ‘नेल्सन टेक्स्टबुक ऑफ पेडिअॅट्रीक्स’ वाचायचे. मी तीन वर्षांत १३ वेळा ‘ए टू झेड’ वाचलं. प्रयत्नांती परमेश्वर!
शास्त्रशुद्ध लेखन-वाचन कौशल्य
वाचन-लेखन कौशल्ये पद्धतशीरपणे शिकवता येतात. ती निष्ठेने जोपासावी लागतात. वाचनाने आयुष्याची क्षितिजं रुंदावतात, तर लेखन मनाची सुस्पष्टता वाढवतं.
एकूण काय तर
वाचन लेखन मनन चिंतन अभ्यासात,
सत्कारणी लावतो जो वेळ या दिनक्रमात.
भाषणे चर्चा वादविवाद परिसंवादात,
जो नाही पोकळ चमकोगिरी करीत.
विषय आपला समजून घेतो आणि देतो,
आनंदाने कष्टाने जो ज्ञानाच्या खोलात जातो.
असा समर्पित ज्ञानाची लालसा असणारा,
विद्यार्थी दाही दिशांत नावाजला जाणारा.
लेखन वाचनाचा खजिना आहे हिताचा,
वर्तमान काळाचा व ताकदवान मनाचा.
प्रयत्न करावा अर्थ समजून घेण्याचा,
जिव्हाळ्याचा चांगला विश्वासू माणूस होण्याचा.
वागावे कसे जगावे कसे आपल्या या समाजात,
आणावे वारंवार वाचनात व ऐकण्यात.
ग्रंथ हेच गुरु आणि शिक्षक सदा साथीला,
कळेल कशासाठी आलो आपण जन्माला.
लेखन आणि वाचनाचा आनंद घ्या, कारण या सवयींमुळे आपण अधिक प्रगल्भ, अधिक सजग, आणि अधिक सृजनशील होतो. “दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे,” हे वाक्य फक्त वाचायचं नाही, तर आयुष्यात जगायचं आहे.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)