भारतीय इतिहासाच्या गोष्टी – भारत जोडणारे सरदार वल्लभभाई पटेल.
इंग्रजांच्या राज्यात भारतात ५६० पेक्षा जास्त छोटी-छोटी संस्थाने होती. प्रत्येकाचा वेगळा राजा, वेगळा नियम. कुणाचा पायपोस कुणात नव्हता. एकी नव्हती, सगळे एकमेकांचे वैरी होते.
इंग्रज राज्यकर्त्यांनी याचाच फायदा घेतला.
भारत स्वतंत्र झाल्यावर, एक मजबूत देश घडवायचा होता. तेव्हा वल्लभभाई पटेल कणखरपणे उभे राहिले. “सगळे एकत्र झाले, तरच भारत मजबूत होईल,” हे त्यांनी ओळखलं.
कधी प्रेमाने, कधी समजावून, त्यांनी सगळी संस्थाने भारतामध्ये विलीन केली.म्हणूनच आज आपण म्हणतो— एक भारत, एक देश!
लोक त्यांना “लोह पुरुष” म्हणायचे,कारण त्यांचं मन खूप मजबूत होतं. त्यांचा भव्य लोखंडाचा पुतळा—Statue of Unity, वडोदरा (पूर्वीचं बडोदा) इथे उभा आहे.
बारडोलीच्या सत्याग्रहात शेतकऱ्यांचे ठाम नेतृत्व केल्यामुळे वल्लभभाई पटेलांना लोकांनी प्रेमाने “सरदार” ही उपाधी दिली. हा ठामपणा त्यांच्यात लहानपणापासूनच होता.
शाळेत असताना, काही दांडगट मुलं किडमिडीत मुलांना छळत होते. ते बिचारे घाबरून सहन करत होते. तर काही जण अन्याय दिसून सुद्धा दुर्लक्ष करत होते. वल्लभभाई पुढे आले आणि ठामपणे म्हणाले, “हे चुकीचं आहे. हे चालणार नाही.”
त्या एका वाक्याने सगळे वठणीवर आले —छळणारे, छळ सहन करणारे आणि दुर्लक्ष करणारे सगळेच चुकीचे असतात.
हा कणखरपणा पुढे भारताला एकत्र ठेवणाऱ्या
सरदार वल्लभभाई पटेलांमध्ये त्यांच्या लहानपणीच दिसला.
ते म्हणायचे “एकीमध्येच देशाची शक्ती असते.”
सरदार वल्लभभाई पटेल की जय
भारत माता की जय
जय हिंद
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


