रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध
महाराष्ट्र शासन व विद्यापीठ अनुदान परिषदेच्या (UGC) मान्यताप्राप्त कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्न बारामतीतील पहिल्या योग महाविद्यालयात शैक्षणिक वर्षापासून योगशास्त्र विषयातील बी.ए. (योग) आणि एम.ए. (योग) हे अभ्यासक्रम सुरू होत आहेत.
हे अभ्यासक्रम जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ रूरल पेडियाट्रिक (बाल कल्याण केंद्र), बारामती यांच्या वतीने राबविले जाणार आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य टिकवण्यासाठी आणि निरामय जीवन जगण्यासाठी योगसाधनेची नितांत आवश्यकता आहे. योगशास्त्राचा उपयोग केवळ शारीरिक स्तरावर मर्यादित नसून तो मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावरही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे योगशास्त्राचा सर्वांगीण आणि सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती डॉ. अनिल मोकाशी यांनी दिली.
आज संपूर्ण जग योगशास्त्राकडे एका चिकित्साशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहू लागले आहे. त्यामुळे भारतीय योगशास्त्राची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि शास्त्रांविषयी पाश्चात्त्य देशांमध्ये विशेष कुतूहल आहे. या पार्श्वभूमीवर योगविद्या, वेदशास्त्र आणि संस्कृत विषयांचे सखोल ज्ञान असलेल्या तज्ज्ञांची गरज वाढत आहे आणि ही गरज भविष्यात अधिकच वाढणार आहे.
योगशास्त्र हे केवळ आसनांपुरते मर्यादित नाही; यापलीकडे योगाचा व्यापक आणि खोल आशय आहे. बारामतीसारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगशिक्षण उपलब्ध व्हावे आणि त्यातून सक्षम योगशिक्षक तयार होऊन त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करावे, या उद्देशाने हे योग महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती योगाचार्य डॉ. निलेश महाजन यांनी दिली.
हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध हॉस्पिटल्स, आरोग्य केंद्रे, जिम, वेलनेस सेंटर्स तसेच पंचतारांकित हॉटेल्समध्ये योगशिक्षक म्हणून संधी उपलब्ध होऊ शकते. याशिवाय स्वतःचा योगवर्ग किंवा योगा स्टुडिओ सुरू करण्याचीही संधी आहे.
केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषयाचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योगअध्यापक म्हणूनही नियुक्तीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. योगशास्त्र हे एक स्वतंत्र चिकित्सा शास्त्र म्हणून पुढे येत असल्याने आरोग्य क्षेत्रात कार्य व संशोधन करण्यासाठीही मोठा वाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारत सरकारतर्फे योगशास्त्राच्या प्रचार व प्रसारासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे योगशास्त्राच्या प्रसाराला मोठी गती मिळाली आहे. योगशास्त्र या विषयामध्ये शैक्षणिक प्रगतीसोबतच स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधीही उपलब्ध आहे. त्यामुळे पारंपरिक पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणामध्ये बी.ए. (योग) व एम.ए. (योग) हे अभ्यासक्रम लाभदायक ठरू शकतात.
प्रवेशासाठी पात्रता
- बी.ए. (योग) : कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण
- एम.ए. (योग) : कोणत्याही शाखेचा पदवीधर
अशी माहिती योगतज्ज्ञ डॉ. भक्ती महाजन यांनी दिली.


