मुलाचं वर्तन की मदतीची हाक?

A young child expressing strong emotions during a studio portrait shoot.
हा असा का वागतोय आजकाल? काहीतरी बिघडलंय बरं का!

कालपर्यंत व्यवस्थित असलेला मुलगा आजकाल फार चिडचिड करतोय.
अभ्यासात लक्ष लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवर रागावतो. उलट उत्तर देतो. शाळेत जायला नको म्हणतो. कधी एकटाच बसून राहतो. तर कधी विनाकारण रडतो.

आई म्हणते —
“हा असा का वागतोय आजकाल? काहीतरी बिघडलंय बरं का!”

आणि खरंच, हा प्रश्न विचारायला हवा.

पण प्रश्न फक्त —
“याचे वर्तन कसे सुधारायचे?”
एवढाच नसावा.

त्याआधी विचारायला हवे —
“हा असा का वागतोय?”

मुलांना आपल्या मनात काय चाललंय हे नेहमी शब्दांत सांगता येत नाही.

“मला भीती वाटतेय.”
“मला काहीतरी त्रास होतोय.”
“मला हे जमत नाहीये.”
“माझ्यावर खूप दबाव आहे.”
“मला कुणीतरी समजून घ्यावं असं वाटतंय.”

हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नसतील.

पण त्यांचे वर्तन बोलत असते.

चिडचिड, राग, हट्टीपणा, आक्रमकपणा, अस्वस्थपणा, अभ्यासात लक्ष न लागणे, शाळेत जायला नको म्हणणे, प्रगती घसरणे, एकटे राहणे किंवा वारंवार काहीतरी दुखत असल्याच्या तक्रारी — यामागे कधी कधी काहीतरी कारण असते.

ते कारण मुलामध्येही असू शकते.

वाढ-विकासातील अडचण, शिकण्याची समस्या, लक्ष केंद्रित करण्यातील अडचण, संवाद साधण्याची समस्या, भावनिक अस्वस्थता किंवा एखादा आजार.

पण कारण मुलाच्या आजूबाजूलाही असू शकते.

घरातील ताणतणाव, आई-वडिलांमधील मतभेद, मुलाकडून अवाजवी अपेक्षा, शाळेतील अडचणी, अभ्यासाचा ताण, शिक्षकांची भीती, मित्रांकडून होणारी चेष्टा किंवा छळ, एकटेपणा, असुरक्षितता किंवा आयुष्यात अचानक झालेला एखादा बदल.

म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी —

समस्या मुलामध्ये दिसते; पण ती मुलामध्येच सुरू झालेली असेल असे नाही.

मूल एकटेपणात वाढत नाही.

ते कुटुंबात वाढते. शाळेत शिकते. मित्रांमध्ये वावरते. समाजात राहते. डिजिटल जगाशी जोडलेले असते. या सगळ्यांच्या भावनिक आणि भौतिक वातावरणात त्याचे बालपण घडत असते.

हीच त्याची बालपणाची परिसंस्था.

या परिसंस्थेतील एका ठिकाणी काही बिघडले, तर त्याचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी मुलाच्या वर्तनातून दिसू शकतो.

घरातील अस्वस्थता शाळेतील चिडचिडीतून दिसू शकते.

शाळेतील त्रास घरातील रागातून बाहेर पडू शकतो.

मित्रांकडून नाकारले गेलेले मूल एकटे राहू लागते.

अभ्यास जमत नसलेले मूल अभ्यासालाच नकार देऊ शकते.

म्हणून मुलाला लगेच हट्टी, आळशी, खोडकर, उद्धट किंवा त्रासदायक ठरवू नका.

मुलांना शिस्त हवी. योग्य-अयोग्य समजायला हवे. वर्तनाला मर्यादाही हव्यात.

पण वर्तन सुधारण्याआधी ते समजून घ्यायला हवे.

कारण कधी कधी मुलाचे बदललेले वर्तन हीच त्याची भाषा असते.

ते कदाचित आपल्याला सांगत असते —

“मला काहीतरी होतंय.
काय होतंय ते मलाही नीट सांगता येत नाही.
पण मला समजून घ्या.”

म्हणून पुन्हा एकदा तोच प्रश्न —

“हा असा का वागतोय आजकाल? काहीतरी बिघडलंय बरं का!”

होय.

काय बिघडलंय ते शोधूया.
फक्त मुलाला सुधारायला लागू नका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top