#07
सर्व विषाणू जगताच्या सदस्यांना सम्राट चिकनगुन्याचा नमस्कार. आज आपण इथे महाराष्ट्र काबीज केल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत. त्या निमित्ताने आपण मानवजातीवर केलेल्या आक्रमणाचा, आपल्या तयारीचा आणि मानवजातीच्या तयारीचा आढावा घेणार आहोत. भारताबाबत “बारी अब कि, चिकनगुन्या कि” असा आपला नारा आहे. पण त्यासाठी आपल्याला रणनीती ठरवायला पाहिजे. आपण चिकनगुन्या, अल्फा प्रजातीतील आहोत. चीनमध्ये राज्य करणारे ओयांग मोयांग विषाणू आपले सख्खे भाऊबंद असून तेही अल्फाच आहेत. आर.एन.ए. कुलातील आपली चुलत शाखा म्हणजे एच.आय.व्ही., फ्लू आणि डेंगी. आपले डी.एन.ए. कुलातील जातीबांधव आहेत देवी, कांजिण्या व नागीण. आपण सगळे पूर्ण ताकदीनिशी आपापला साम्राज्यविस्तार करण्याच्या मागे आहोत.
माणसाला वाटते पृथ्वीवर त्याचे राज्य आहे. माकडांना वाटते पृथ्वीवर त्यांचे राज्य आहे. पण खरं तर पृथ्वी आपली आहे. आपल्या सर्वश्रेष्ठ विषाणू जातीसाठी आपल्या संख्येच्या आधारावर पृथ्वीवर शंभर टक्के आरक्षण हे मिळवायलाच हवे. देवाची पण तीच इच्छा आहे. म्हणून तर देवाने आपल्या विषाणू समाजाला स्फोटक प्रजनन क्षमतेचे वरदान दिले आहे.
अॅडीस इजिप्ती या डासांची नेमणूक देवाने आपले वाहन म्हणून केली आहे. त्यांच्या पोटात बसून आपण एका माणसापासून दुस-या माणसापर्यंत व असाच जगभर आपल्या विषाणूवृत्तीचा साम्राज्यप्रसार करतो. मी सम्राट चिकनगुन्या आज अॅडीस इजिप्ती डासांची आपल्या साम्राज्याचे “ऑफीशियल कॅरिअर” म्हणून जाहीर नेमणूक करतो. (प्रचंड टाळ्या, विषाणू हृदयसम्राट चीकुनगुण्याचा विजय असो, विजय असो, अशा आरोळ्या, तुता-या इ.इ.) आपल्या चिकुनगुन्या साम्राज्याची मुहूर्तमेढ आफ्रिका खंडातील टांझानिया देशात १९५२ साली झाली. त्यादिवशी श्रीमंत थोरले चिकुनगुन्या यांची पहिल्यांदा ओळख पटल्याची नोंद माणसाने केली आहे. तिथून सुरु झालेला आपल्या अश्वमेध रोखण्याची ताकद पृथ्वीवर कुणाचीही नाही. आपण अजिंक्य आहोत. आपण विश्वविजेते आहोत.
१९६३ साली आपण कलकत्ता पार झेंडा फडकवला. २००५ पर्यन्त दक्षिण भारतातल्या दोन लाख माणसांच्या शरीरात आपण प्रवेश केला. २००६ मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, संपूर्ण मराठवाडा आणि ओरिसा सर् केले. आता आपली प्रजा सर्वत्र छान धुमाकूळ घालीत आहे.
आपल्या चिकुनगुन्या नावाची एक स्टोरी आहे. चिकनचा आणि चिकुनगुन्याचा काही संबंध नाही हे स्पष्ट करतो. नाहीतर बिचारा पोल्ट्री उद्योग! फट म्हणता बंद पडायचा! आपण माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर तो पाठदुखीने (आपले मूळ स्थान, सगळ्यांनी नमस्कार करावा.) “मोकांडे” भाषेत वाकणे, वाकडे चालणा-याला कुणगुण्या म्हणतात. त्यावरूनच आपलं चिकुनगुन्या हे समर्पक नाव पडले. मराठवाड्यातील लोक आपल्याला आकड्या म्हणून ओळखतात. १९५२ ते २००५ हा कालखंड आपल्यला फार खडतर व परीक्षेचा गेला. १९५२ मध्ये पृथ्वीवर आपल्या “फक्त दोनच सिटा” लागल्या. फक्त दोन देशात आपले अस्तित्व होते. आपण खूप धडपड केली. कधी विषाणूवाद, कधी समाजवाद, कधी इतर विषाणूंबरोबर सीट शेअरिंग. काही जमेना. पण २००५ मध्ये क्रांती झाली. आपल्या गुणसूत्रांमध्ये बदल घडून आला. आणि नेमकी त्याचवेळी भारतीयांची समूह प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) कमी झाली. चमत्कार झाला. दोन वरून उडी मारून आपल्या ३०० सिटा लागल्या. ३०० देशात आपले राज्य आले. आज या घडीला मला सांगायला आनंद होतो आहे कि, आपले मानवावरील आक्रमण यशस्वी झाले आहे. प्रचंड टाळ्या. २८ कारखान्यातील प्रत्येकी १२५ ट्रक भरून आणलेल्या विषाणूंच्या आरोळ्या. सम्राट चिकनगुन्या आगे बढो. हम तुम्हारे साथ है! येऊन येऊन येणार कोण, चिकनगुन्याच आणखी कोण?
माझ्या विषाणू बांधवांनो, लक्षात ठेवा, आपली डी.एन.ए. जातीची चुलत बहीण सम्राज्ञी देवी (स्मॉल पॉक्स) एकेकाळी पृथ्वीवर राज्य करत होती. पण या, या माणसाने लस शोधून काढून तिच्या साम्राज्याचा नायनाट केला. तिचा सर्वनाश केला. तिला नामशेष केले. (शेम, शेम, आरोळ्या). आम्ही माणसाला त्रास देत असलो तर आम्ही त्याला मारून तर टाकीत नाही ना? चिकनगुन्या जीव घेणा नाही हे काय माणसाला माहित नाही? मग तो का आमच्या विरुद्ध कट कारस्थाने करतो? आपण शरीरात गेल्यावर माणसाला थंडी तापून ताप येतो. अंगावर पुरळ येते, अंग दुखते, सांधे दुखतात, डोके दुखते, डोळे दुखतात, डोळे लाल होतात, प्रकाश सहन होत नाही. काही लहान मुलांना झटके येवू शकतात. हिरड्यातून थोडेसे रक्त येऊ शकते. एक दोन आठवड्यातच रुग्ण पूर्णपणे बरा होतो. क्वचितच काही जणांना बरीच वर्षे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. माझ्या चिकनगुन्या बांधवानो, अंतिम यशासाठी माझी विनंती आहे कि ”एक व्हा” संघटीत व्हा. लाखोंच्या संख्येने मानवावर आक्रमण करा. आर.एन.ए. विषाणूंच्या सर्व प्रजातींच्या एकीचे बळ जाणा. ही एकी नेतृत्वासाठी नको. कार्यासाठी हवी. आपापले स्वतंत्र अस्तित्व ठेऊनही सीट शेअरिंग होऊ शकते. आपल्या व डेंगीच्या युतीचा परिणामकारक अनुभव लक्षात ठेवा. अॅडीस इजिप्ती हे डेंगी साम्राज्याचेही ऑफिशियल कॅरिअर आहे. डेंगीबरोबरच चिकनगुन्यांनी डासांच्या पोटात सीट शेअरिंग केल्यामुळे एकाचवेळी चिकनगुन्या व डेंगी होऊ शकतो. अतिरक्तस्त्रावाचे संहारक शस्त्र या युतीमुळेच आपल्याला मिळाले आहे याची जाणीव ठेवा. युती आघाडीच्या जमान्यात १२५ वर्षाचे ढोल निरुपयोगी ठरतात. जमिनीवरील बेरजाच उपयुक्त ठरतात. माणसांनी चिकनगुन्या विरुद्धच्या लढाईत आखलेली रणनीती समजावून घ्या. त्याप्रमाणे आपली धोरणे आखा. माणसाने आपल्या विरुद्ध त्रिसूत्रि कार्यक्रम आखला आहे. १. निदान २. उपचार ३. प्रतिबंध.
- निदान :- चिकनगुन्याचे वेळीच व लवकर निदान करून, माणूस प्रतिबंधक उपाय योजनेचा कट आखत आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या आधारे रक्ताच्या अनेक चाचण्या माणसाने विकसित केल्या आहेत. १. रक्तातील पांढ-या पेशींचे व प्लेटलेटचे प्रमाण थोडे कमी होते. २. अँटीबॉडी टेस्ट, एलायझा चाचणी खात्रीशीर आहे. आजार झाल्यावर सहा महिन्यापर्यन्त चाचणी निर्णायक ठरू शकते. ३. अँटीबॉडीची उपस्थिती आजाराच्या ५ ते ७ दिवसांनी मार्गदर्शक ठरते. ४. पी.सि.आर चाचणी तर आपल्या शरीरातल्या कुठल्याही भागातला अँटीजेन ओळखू शकते. ५. माँस्कीटो सेल कल्चर / नवजात उंदीर यामध्ये विषाणू वाढवून, तो चिकनगुन्याच आहे हे जनुकीय शास्त्राच्या आधारे सिध्द करता येते.
मित्रांनो माणसाच्या या वैज्ञानिक प्रगतीने घाबरून जाण्याचे काही कारण नाही. नाण्याला दुसरीही बाजू असते. चिकनगुन्याचे तत्काळ निदान करणारे तंत्र अजून माणसाला अवगत झाले नाही. आज घडीला पूर्ण भारतातले सँम्पल पुण्याच्या नॅशनल इनस्टिटयूट ऑफ व्हॉयरॉलॉजीत पाठवावे लागतात. तेवढया कालावधीत आपण पुढच्या राज्यात जाऊन पण पोहचतो. आणि भारतीय समाजाची बेफिकिरी सुध्दा आपल्याच पथ्यावर पडते आहे. जोपर्यंत भारतातील मिडिया आपल्या बाजूनी आहेत तोवर काळजी करण्याचे कारण नाही. मेडिया समाजाला खेळवून, आपल्या साम्राज्य वाढीकडे दुर्लक्ष करायला लावून, आपल्यालाच मदत करतो आहे. त्यांचा या मदतीसाठी मी बेस्ट चॅनेल, बेस्ट वृत्तपत्र, बेस्ट मासिक अशा विविध पुरस्कारांची मालिकाच जाहीर करीत आहे.
- उपचार :- तरी बरं माणसाला व्हायरसेस विरुद्ध औषध सापडलं नाही. आपलं माणसाच्या शरीरातलं आयुष्यच जेमतेम १२-१५ दिवसांचं. तेवढ्या वेळेत रुग्ण आपोआपच बरा होतो. तापासाठी, वेदनांसाठी, सांधेदुखीसाठी औषध वापरतात. पण माणसाजवळ आपल्या विरुद्ध हत्यार नाही हेच खरे.
- प्रतिबंध :- माणसाचा भर आहे. डासांविरुद्धची उपाययोजना, डांसाशिवाय आपण त्यांच्यापर्यंत पोचूच शकणार नाही. सांडपाण्याचा निचरा, कीटकनाशके, मच्छरदाणी, ओडोमॉस, मच्छर अगरबत्ती, रुग्णाचा बाहेरचा वावर थांबवणे, अशा इलाजांनी आपले आक्रमण रोखून धरायचा माणसांचा विचार आहे. पण मला आशा आहे, माणसाला आपल्याविरुद्ध लस लवकर सापडणार नाही. भारतातील विविध विषाणू संशोधन संस्था एकत्र येणार नाहीत. जलदगतीने निदान होणार नाही. आणि आपले साम्राज्य अबाधित राहील. आपल्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळणारच नाही.
जय चिकनगुन्या, जय अल्फा, जय आर.एन.ए. जय विषाणू, बा अदब बा मुलाहिजा होशियार, सम्राट चिकुनगुन्या आ रहे है l
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)



A very informative article presented in a reader friendly way ( you surely have literary qualities, doctor).
Great.that too from an English professor!
Good write up
Hi buddy. We blossomed together.
Very informative article for comman man🙏
Thanks sir
Thanks sir