“मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी”.आईनी मोठं व्हावं ? आईनी कसं मोठं व्हावं ? आज मातृदिना निमित्त सांगताहेत. डॉ. अनिल मोकाशी. “एकटी एकटी घाबरलीस ना” गाण्यात चिंटू म्हणतो, ‘मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही’. ते गाण्यात गोड वाटतं. पण प्रत्यक्षात मुलांबरोबर आईलाही मोठं व्हावंच लागतं. “मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी”. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. लहान बाळाची, शाळेतल्या मुलाची, वयात येणा-या मुलांची, तरुण मुलांची, मोठा माणूस झाल्यानंतर, आईला वयाप्रमाणे वेगळे वागावेच लागते. ही बदलाची प्रक्रिया सुरळीत ठेवणे, यात तर खरं आईचं कौशल्य आहे. बाळाच्या पहिल्या श्वासापासून आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे ‘आईपण’ अव्याहत अबाधित रहातं. आईचं दूध, बाल संगोपन, याही पलीकडे, त्याला घडवणं हे आईच्या जन्मभराच्या साथीनेच होतं. जिजाउंनी छत्रपती शिवाजी घडवले, हीराबेन यांनी साधेपणात, शिस्तीत नरेंद्र मोदी घडवले. काळ कुठलाही असो, ‘संस्कार’ देणे, जीवनाला उद्दिष्ट देणे, क्षमता देणे, हे आईचेच कर्तव्य असते. आई होणं नैसर्गिक असलं तरी ‘बालपणाचे विज्ञान’ आणी ‘आईपणाची कला’ शिकायलाच हवी. मूल वाढतं, परिस्थितीही सतत बदलते. आजच्या आईला ‘श्यामची आई’ होऊन कसे चालेल? १. नवजात बाळ १०० % पूर्ण आईवर अवलंबून असतं. आई किंवा आईसारखी दुसरी कुणीतरी, २४ तास, ड्युटीवर हवीच. तिच्या नुसत्या असण्याने, दिसण्याने, नजरेने, स्पर्शाने, आवाजाने, वासाने, हाताळण्याने बाळाला जग सापडतं. आईची सोबत बाळाला भावना शिकवते. आईच्या हातात आपण सुरक्षित आहोत हे त्याला समजते. हे काम तिला शिकूनच घ्यावे लागते. २. दुडू दुडू चालण्याच्या वयात बाळाचं कुतूहल जागं होतं. घरातले शिक्षण चालू होते. मुलं चालतात, बोलतात, ऐकतात, पहातात, अनुकरण करतात. प्रश्न विचारतात. आई मुलाचा आरसा बनते. त्याला चालू द्यावे, पळू द्यावे, चढू द्यावे, बोलू द्यावे. स्वतःच्या हाताने खाऊ द्यावे. भरवू नये. लहान बाळ मोठं करण्याची हौस भागली नाही म्हणून त्याला मोठं होऊच द्यायचं नाही. असं करून कसं चालेल. त्याचं त्याला समजू दे, ‘आता आपण मोठं झालो आहे’. आणि आता आपल्याला मोठ्या मुलांसारखं वागायला हवे. लहान बाळासारखं वागून चालणार नाही. दुस-या वाढदिवसाला बाळ आईपासून सुटं व्हायला हवं. लळालोंबा नको. हे काम तिला शिकून घ्यावेच लागते. ३. शालेय वयात घराबाहेरील जगात प्रवेश होतो. घराबाहेरचे शिक्षण चालू होते. शाळा, मित्र, शिक्षक, पुस्तकं, बाहेरचं, त्याचं स्वतःचं, जग निर्माण होतं. आणि तो त्याच्या स्वतःच्या जगात शिकू लागतो. शिवाजी रायगडावर, द-याखो-यात घडतो. पु. लं. देशपांडे बटाटयाच्या चाळीत घडतो. आर.के. नारायणन मालगुडीतच घडतो. पण या सगळ्या घडण्याला आईची साथ आवश्यक असते. साथ. आधार. मार्गदर्शन. हे चांगल्या सवयी लावण्याचं वय आहे. सवयी काय, लावाल तशा लागतात. चांगल्या लावल्या, चांगल्या लागतात. वाईट लावल्या वाईट लागतात. वेळेचं भान शिकवावं लागतं. वेळापत्रक फक्त शाळेचंच नसतं. घरचंही वेळापत्रक असतं. आणि आईने ते पाळायची सवय लावावी लागते. ‘मेरी मर्जी’ नही चलेगी. हे कधीतरी स्पष्टपणे सांगावं लागतं. मुलांची वाढ, मानसिक, भावनिक, बौद्धिक, शैक्षणिक विकास, आहार, लसीकरण, आजारात काळजी या गोष्टी तिला शिकून घ्याव्याच लागतात. ४. किशोरवयात मुलाची स्वतःची ओळख निर्माण व्हायला लागते. आयुष्याचा हा टप्पा सगळ्यात खडतर, सगळ्यात महत्त्वाचा असतो. शरीर, भावना, विचार, मैत्री — सारं काही ढवळून निघतं. या काळात आईनी हुकूमशहा बनून कसे चालेल? तिला संवाद साधण्याची कला आत्मसात करावी लागेल. मुलाच्या कलाकलाने घेऊन, त्याला बोलते करणे महत्वाचे असते. तुम्ही त्याला बोलायला शिकवलत, आता त्याचं ऐकायला शिका. सूर तक्रारीचा, हटकायचा नको, समजावण्याचा हवा. मोठं होणं म्हणजे जबाबदार होणं. स्वतःची स्वतः, कुटुंबाची, शेजार पाजारची, समाजाची, टप्प्या टप्प्याने वाढती जबाबदारी शिकवायला हवी. त्याच्यावर जबाबदारी टाकायला हवी. त्याच्यावर विश्वास आहे हे दाखवायला हवे. थोडं मोकळंही सोडायला हवं. पतंगाच्या मांजाला किती ढील द्यायची आणी किती ओढ द्यायची याचं तारतम्य शिकायला हवं. कला आहे ती. ५. तरुणपणाचे पंख फुटल्यावर. तो आपली वाट चालणारच ना? लक्ष ठेवावे. गरज असेल तेंव्हा साथ द्यावी. आधार द्यावा. धीर द्यावा. व्यसने, वाईट संगत अशा धोक्यांची जाणीव करून द्यावी. दिवस पाळीचे मित्र मैत्रिणी त्याचे त्यानी निवडावे. मात्र रात्रपाळीचे मित्र मैत्रिणी चालणार नाहीत. या कौटुंबिक मर्यादा, लक्ष॒मणरेषा आखून द्यायला हव्या. त्या निक्षून पाळायला लावाव्या. आपले मत मांडावे. पण हस्तक्षेप टाळावा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी आहे तुझ्या पाठीशी. असा पवित्रा असावा. हे सगळे या वयाच्या आईला शिकून घ्यावे लागेल. ६. मध्यमवय आणि वृद्धावस्थेतील मुलाच्या आईला जरा लवचिक भूमिका घ्यावी लागणार. मुलाला मुलं असतील. तरी त्याच्या आईचाही रोल असतोच ना? मूक निरीक्षक व्हावे. संयम बाळगावा. अनुभव अवश्य सांगावा. पण अंमलाचा आग्रह नसावा. हेही शिकून घ्यायला हवे. असा असतो आईचा रोल, काळाच्या ओघात बदलणारा. फुलपाखराच्या जशा अंडी, अळी, कोष आणी फुलपाखरू अशा अवस्था असतात, तशा मानवी जीवनाच्या देखील वयानुसार अवस्था असतात. कोणत्याही अवस्थेत प्रेम असतं तसंच राहतं, पण त्याची अभिव्यक्ती मात्र बदलायला हवी. आई कोणतीच परिपूर्ण नसते. पण नेहमीच साथीला असते. प्रत्येक युगात, प्रत्येक घरात, आणि प्रत्येक मुलाच्या मनात, आईसारखं दुसरं कोणीच नसतं. म्हणून तर मी म्हणतो, मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी. बेस्ट लक. मदर्स डे च्या शुभेच्छा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)