रामायणाच्या गोष्टी 53 – रामाचा अवतार संपला…
श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीता पृथ्वीमातेच्या कुशीत गेली. श्रीरामांना खूप दुःख झालं. तरी त्यांनी कर्तव्य बुद्धीने रामराज्य चालवलं. लव आणि कुश यांना वेगवेगळी राज्यं दिली. दोघांचा राज्याभिषेक केला. पण त्यांचं मन कशातच रमेना. आता त्यांचं अवतार कार्य संपलं होतं. त्यांनी मनापासून प्रार्थना केली. ती ब्रह्मदेवापर्यंत पोचली. एक दिवस एक तपस्वी रामांना भेटायला आला. तो काळ होता! तपस्व्याच्या रूपात आला होता. त्याला रामाशी एकांतात बोलायचं होतं. तो म्हणाला –”आपलं बोलणं कोणीही ऐकू नये. जो ऐकेल त्याचा मृत्यू निश्चित!” रामाने लक्ष्मणाला आज्ञा दिली “कोणालाही आत येऊ देऊ नकोस!” इतक्यात दुर्वास मुनी आले. ते फार रागीट होते. ते ओरडले “रामाला भेटायचं आहे! मला आत सोड!” लक्ष्मण म्हणाला “तुम्ही थांबा! श्रीरामांची आज्ञा आहे” दुर्वास मुनी रागावले “मला आत सोडले नाहीस, तर अयोध्या भस्मसात करीन अयोध्या बेचिराख करीन अयोध्येची राखरांगोळी करीन!”लक्ष्मणाला प्रश्न पडला.” नियम पाळू? की अयोध्या वाचवू?” लक्ष्मणाला माहीत होतं. पुढे धोका आहे. नियम मोडला तर मृत्यू . “लक्ष्मणाचा हा निर्णय आयुष्याचा शेवटचा निर्णय ठरणार होता. पण अयोध्येला वाचवण्यासाठी तो स्वतःचा बळी द्यायला तयार झाला!” त्यानी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुर्वास मुनींना आत सोडलं. राम आणि तपस्वी यांचा एकांत भंग झाला! लक्ष्मण शांतपणे यमुनेच्या तीरावर गेला. आणि त्याने जलसमाधी घेतली. पवित्र यमुना नदीच्या विशाल पात्रात प्रवेश केला. “रामाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अश्वमेध यज्ञ जिंकला, पण सावलीसारखी साथ देणारा निस्वार्थ भाऊ हरपला!” तपस्व्याच्या रूपात आलेल्या काळाने रामाला सांगितलं. ” तू भगवान विष्णूचा मानवी अवतार आहेस. पृथ्वीवर वाईट लोक जास्त प्रबळ झाले आहेत. चांगल्या लोकांना जगणे कठीण झाले आहे. रामाचा अवतार घे. आणि पृथ्वीवर मानवी जीवन सुलभ होईल, लोक सुखाने समाधानाने, सरळ मार्गाने जगू शकतील अशी व्यवस्था कर.” रामावतारातील रावण संहाराचं कार्य संपल होतं. पृथ्वी राक्षसमुक्त आणि भयमुक्त झाली होती. ब्रह्मदेवाने रामावतार संपवून वैकुंठात परत यायचा आदेश दिला होता!” श्रीरामांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. शरयू नदीत प्रवेश केला. आणि इहलोकाची यात्रा संपवून वैकुंठाला गेले. श्रीरामांचा दिव्य अवतार संपला. श्री रामायणाची इतीश्री झाली.आकाशातून पुष्पवृष्टी झाली. देव, ऋषी, आणि चराचर सृष्टीने जयघोष केला! प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)









