जगावेगळ्या माणसाची आणि जगावेगळ्या लेखकाची ओळखसुद्धा जगाववेगळीच असायला हवी. नाही का? मी स्वतःबद्दल प्रथमपुरुषी प्रथमवचनी ओळख लिहायची असे ठरवले. म्हणून ही “लेखकाची ओळख : माझी गोष्ट, आमची गोष्ट”. अशी काही स्वलिखित पुस्तकात, स्वतःची गोष्ट लिहिण्याची प्रथा नाही. पण माझ्यासारखे आयुष्य जगण्याची तरी कुठे प्रथा आहे? मी जरा वेगळा, वेगळा, वेगळाच, (चौकट राजा) आहे, हे मला अगदी लवकरच, लहानपणीच समजलं होतं. मी माझं वेगळेपण ओळखल्यामुळे व जपल्यामुळेच माझी कारकीर्द घडली. यालाच इंग्लिश मध्ये ‘करिअर’ म्हणतात. करिअर म्हणजे शिक्षण किंवा व्यवसाय नाही. करिअर म्हणजे कारकीर्द. तुम्ही आयुष॒यात जे काही करता, ती कारकीर्द.
कुणाचीही कारकीर्द १/३ स्वतः व्यक्तीवर, १/३ कुटुंबावर, आणि १/३ समाजावर, मित्र, शाळा, कॉलेज, सहकारी किंवा परिस्थितीवर अवलंबून असते. वयानुरूप आणि अनुभवानुरूप स्वतःचा विकास होत जातो. क्षमता वाढत जातात. आणि तुम्ही जास्त चांगलं काम करू लागता. बुद्धिमत्ता (आय क्यू) वाढत नाही. पण कामगिरी चांगली होत जाते. कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती काळानुसार आणि वेळेनुसार बदलती राहत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या कारकीर्दीला अनेक वळणे मिळत असतात. नव्या संधी व नव्या दिशा निर्माण होतात. हे काळा बरोबर स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला पालटण्याचे गणित मला फार चांगले जमले.
मी 100 % बारामतीकर. आमची डॉक्टरकीची तिसरी पिढी. आता आमची चौथी पिढी सुद्धा डॉक्टर झालेली आहे. 75 वर्षाची वैद्यकीय व्यवसायाची परंपरा. माझे शिक्षण बारामतीत. लेखन, वाचन भाषण, नाटक, अभ्यास यात कायम पुढे. एमबीबीएस नागपूरला गव्हर्नमेंट मेडिकल मधे, डीसीएच सायन हॉस्पिटल मधे, एमडी, एफसीपीएस वाडिया चिल्ड्रन मधे. फेलो इंडियन अकॅडमी ऑफ पेडिॲट्रिक्स मुंबईमध्ये आणि पीएचडी पेडिॲट्रिक्स बालविकास व वाढ क्षेत्रात पुणे विद्यापीठात, बीजे मेडिकल, ससूनमधे. हे माझं शिक्षण. भरपूर ओपीडी. भरपूर इन डोअर. मस्त व्यवसाय. माझी पत्नी डॉक्टर माधुरी, सोलापूरची एमबीबीएस. डिलिव्हरी सिझर, बिझी. आणि माझ्यासारखा जगावेगळा माणूस आयुष्यभर सांभाळला. मुलगा गौतम ऑटोमोबाईल इंजिनियर. आमच्या बाल कल्याण केंद्र मतिमंद, मूकबधिर, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. माझी सून अंकिता आमच्याच की मूकबधिर शाळेमध्ये शिक्षिका. माझा नातू समिहन (१०), व नात कनक (२) हे दोन घटक आमचा वर्तमानकाळ व्यापून, भविष्यकाळातील कारकीर्द घडवत आहेत. अॅपटीट्युड टेस्ट, कल चाचण्या, आय क्यू टेस्ट म्हणजे कंपास पेटीतील सहा इंची पट्टीने १० एकर जमीन मोजण्यासारखं आहे.
मला स्वतःला नाटकाची आवड. मी स्वतःला नाटकवाला मानतो. डॉक्टर झालो नसतो तर ॲक्टरच झालो असतो. अगणित नाटकात कामे केली. कॉलेज, विद्यापीठ, राज्य नाट्य महोत्सव, नाट्य साधना. विविध स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे. आम्ही नाटक घेऊन इंग्लंड अमेरिका कॅनडा प्रवास केला. गणेशोत्सवात, खेडोपाडी, साखर कारखान्यांवर, इरिगेशन कॉलनी मधे अनेक प्रयोग. मस्त मित्र परिवार. फुल एन्जॉय. पण एके दिवशी उपरती झाली. मला अमाप आनंद मिळायचा. पण कुटुंबाचा आणि समाजाचा त्यात काहीच फायदा होत नव्हता. जगाची लाईफस्टाईल वेगळी आणि नाटकवाल्यांची लाईफस्टाईल वेगळी. मॅच होईना. माझ्या आयुष्याच्या ध्येय धोरणात नाटक काही बसेना. माझं प्रथम कर्तव्य समोर येणाऱ्या आईच्या बाळाला सेवा देण्याचं आहे. त्यामुळे ठरवून जड अंतःकरणाने संपूर्ण नाट्यसंन्यास घेतला.

नंतर सुरू झालं भाषणांचं युग. दुसरी तिसरीत असतांनाच आमचे दिक्षित गुरुजी नगरपरिषदेच्या सर्व शाळातून “बघा कसा घडाघडा सकाळ वाचतोय ते” असे सांगत फिरवून आणायचे. मग भाषणे, कथाकथन, नाट्यवाचन, वादविवाद स्पर्धा. माझी ओरेटरी जी बहरली ती आजयागायत पुरते आहे. मेडिकल असोसिएशन, महिला मंडळे, गणेशोत्सव, शाळा कॉलेजच्या स्नेहसंमेलनात, राज्यभर, देशभर, हजारो भाषणे. पंधरा-वीस वर्षे चालले ते प्रकरण. मजा आली. धमाल एन्जॉय केलं. पण समाजाचं त्यानी काय भलं होतंय, मोजमाप करता येईना. माझ्या मलाच नोंदीही करता येईनात. माझा बायोडाटा मात्र अधिकाधिक इम्प्रेसिव होत गेला. पण बायोडाटा मोठा करणे हे माझे आयुष्याचे उद्दिष्ट नव्हतेच. आणि एके दिवशी वेळेचा फार अपव्यय होतो या कारणास्तव मी भाषणे बंद केली.
लेखनाचं क्षेत्र मात्र फार लाभी ठरलं. जर्नल, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, विशेष पुरवण्या शेकडो लेख छापून आले. येताहेत. अनेक लेख, विज्ञान कथा, पुस्तके. अनेक प्रकाशन संस्थांनी ती छापली. माझ्या प्रसिद्ध झालेल्या लेखनाची नुसती यादी द्यायची तरी दोन पाने लागतील. म्हणून मी त्या यादीला आणि मला मिळालेल्या असंख्य पुरस्कारांना संपूर्ण फाटा देतो.
व्यवसाय सुरु करण्यापूर्वी डॉ.किरण शहा या माझ्या मित्राने “तुला किती उत्पन्न अपेक्षित आहे” असा प्रश्न विचारला. पहिल्याच महिन्यात अपेक्षेच्या पाचपट उत्पन्न झाले. त्यामुळे पैसे कमविण्यासाठी व्यवसाय कधी करावाच लागला नाही . व्यवसाय करत गेलो पैसे मिळत गेले . काका काकू (फॅमिली ॲडॉप्शन मुळे आई-वडील) डॉक्टर असल्याने व्यवसायाच्या पहिल्या दिवशीच हॉस्पिटल , कार , बंगला हजर होते . आई वडिलांनी सांगितले नाव कमव पैसे आपोआप मिळतील.
मी व्यवसाय सुरू केला त्यावेळी (1978) तज्ञ सल्लागार ही संकल्पनाच समाजात नव्हती. इंजेक्शन नाही औषध नाही, मग पैसे कशाचे द्यायचे? असा प्रश्न असायचा. बिन इंजेक्शनचा व्यवसाय करायला फार मोठे धैर्य लागले. अगदी ‘एकला चालो रे’ किंवा महात्मा गांधींच्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ सारखे. आणि तो घेतला वसा मी आजवर (74) सोडला नाही. बारामतीच्या शंभर किलोमीटर परिसरात, पुणे सातारा नगर सोलापूर या चार जिल्ह्यांच्या मधल्या टापूत पंधरा वर्षे मी एकटाच बालरोग तज्ञ होतो. फुल मोनोपली. वैद्यकीय सत्ता. प्रवासाच्या सोयी नव्हत्या. अंधश्रद्धा, बाहेरचं, देवाचं, अशा अनेक अडचणी होत्या. समाज प्रबोधन हे वैद्यकीय सेवेपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. खेडोपाडी लोकांच्या सोयीसाठी विजिट करावी लागे. जी पी डॉक्टरांना देखील बालरोग तज्ञाची गरज समजून सांगावी लागे. तुम्ही सेप्ट्रान देता, आम्हीही सेप्ट्रान देतो. मग तुमची गरज काय? असा प्रश्न होता. पंधरा-वीस वर्षे ‘आठवडी बाजार करणारा’ देशातील मी एकमेव बालरोगतज्ञ असावा. खेडोपाडच्या आठवडी बाजारात, एखाद्या दवाखान्यात जाऊन, पेशंट बघायचे. ज्या गावात नवीन बालरोग तज्ञ येईल, त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात, ‘गावाची गरज भागली’ असे जाहीर करून विजिट बंद करायची. ही मोडस ऑपरंडी. त्यातही समाजसेवेपेक्षा व्यावसायिक दृष्टिकोनच जास्त होता. नामांकित, मानांकित होता येतं. हज्जारो ट्युबेकटोमी ऑपरेशनला असिस्ट करणारा बालरोगतज्ञ म्हणून माझा जागतिक विक्रम असेल. आधीची वीस वर्षं आईबरोबर, नंतरची वीस वर्षं बायकोबरोबर ! कौटुंबिक जबाबदारी.
एकदा कौटुंबिक चर्चेत पुण्याचे डॉक्टर डी. बी. शिरोळे इतके ग्रेट का आहेत. त्यांच्यात असं काय स्पेशल आहे की सगळं जग त्यांचा आदर करतं, असा विषय निघाला. माझं असेसमेंट होतं, त्यांनी समाजाला गरज असताना, शेकडो बालरोगतज्ञ निर्माण करून, समाजाला दिले. ते नुसते व्यावसायिक होऊन पैसे गोळा करत बसले नाहीत. ते शिक्षक झाले. यातच त्यांच्या ग्रेटपणाचे रहस्य आहे. यावर माझ्या भावाचे उत्तर होतं “तुला कोणी सांगितलं तू शिक्षक होऊ नकोस म्हणून. तू शिक्षक हो.” आता बारामतीत राहून वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात शिक्षक होण्याचा मार्गच नव्हता. पण “जर्नल ऑफ रुरल पेडिॲट्रिक्स” काढून मी तो मार्ग शोधला. माझं जर्नल अमर्याद यशस्वी झालं. खेडोपाडी, राज्यभर, भारतभर, जगभर मला ओळख मिळाली. माझे विद्यार्थी निर्माण झाले
बालआरोग्यक्षेत्रात बारामतीत मी अनेक गोष्टी पहिल्यांदा सुरू केल्या. लहान मुलांचा ईसीजी, इईजी, ऑडिओमेट्री, नवजात बालकांसाठी एनआयसीयु, अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या. त्यातच नवजात बाळाला कृत्रिम श्वास देणारे रिस्पिरेटर मशीन मी बारामतीत संशोधन करून बनवले. त्याचे ऑफिशियल सरकारी पेटंट मिळाले. देशभर हजार एक मशीन विकली. पण धंदा व्यवसाय करणे हे माझे आयुष्याचे उद्दिष्ट नसल्याने मी ते प्रकरण बंद करून टाकले
दरम्यान मी दत्तक म्हणजे अॅडॉप्शन क्षेत्रामध्ये काम करू लागलो. लोकांना मूल दत्तक घेण्यासाठी मदत करू लागलो. रिमांड होम मधे जूव्हेनाइल मॅजिस्ट॒रेट म्हणून काम करू लागलो. अशाच एका ऍडॉप्शन संबंधी कायदा आणि इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट कायद्यासंदर्भात शरद पवार साहेबांना भेटलो त्यांना माझे जर्नल, लेख दाखवले. त्यांनी मी सुचवलेले कायद्याचे बदल, संसदेमध्ये मान्य करून घेतले. आणि भारताची घटना बनवण्यामध्ये माझा हातभार लागला. पण त्यावेळी शरद पवारांनी मला एक वेगळाच सल्ला दिला. कुठल्याही परिस्थितीत अॅक्टिविस्ट होऊ नका. अॅक्टिविस्ट म्हणजे आळवावरचे पाणी आहे. ‘बारामतीत राहून’ ‘संस्थात्मक उभारणी’ करा. संस्था मोठी करा. माणसं जोडा, त्यांना मोठे करा. आणि समाजकार्यामध्ये भाग घ्या. मला ते पटलं. मी मतिमंद मुलांची शाळा चालू केली. मूकबधिर मुलांची शाळा चालू केली. पूर्व प्राथमिक प्राथमिक शाळा चालू केली. अपंग शिक्षण हे कार्य माझ्या कामाला जोडून घेतलं. त्यातूनच बालविकास हे क्षेत्र जास्त आवडू लागलं. ते माझ्या ध्येयधोरणात बसत होतं. बाल आरोग्य, बाल आहार, बाल शिक्षण, बाल विकास, बाल कल्याण या क्षेत्रापुरतच माझं काम मर्यादित ठेवावं असा निर्णय मी घेतला. आणि बालकल्याण केंद्र उभ राहिलं. शरद पवारांचा सल्ला मी आयुष्यभर पाळला.
बाल आहार क्षेत्रात, इन्सटीट्युट ऑफ केमिकल टेक्नोलोजि मुंबई, व राजीव गांधी सायन्स टेक्नोलोजी कमिशन यांच्या सहकार्याने बारामती फूड प्रोसेसिंग अंड डीहायड्रेशन कारखाना चालू केला. स्वतः फोर्मूलेट केलेले अनेक प्रोडकट निर्मिती केली. मुकबधीर मुलांना व्यवसाय शिक्षण व नोकरी देता आली. खूप नाव झाले प्रसिद्धी मिळाली. डॉ. अनिल काकोडकर स्वतः भेट देऊन गेले. पण ‘लाईट बिलसे’ मार खाया महाराष्ट्र. विक्री व्यवस्था निर्माण करायला पैसे कुठून आणायचे. बंद करून टाकला तो प्रोजेक्ट.
अनेक संस्था संघटनांमध्ये मी कार्यरत झालो. रोटरी, नाट्यसाधना, मराठी विज्ञान परिषद, आय एम ए, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, मेदिकॅल कौन्सिल ऑफ इंडिया, भारतीय बालरोगतज्ञ संघटना, अपंग क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर नंबर वन पर्यंत पोहोचत गेलो. मी ज्या गोष्टीत रस घेईन, त्या गोष्टीत मला यश मिळत गेले. पण मला कोणत्याच क्षेत्रात नंबर वन होणे मान्यच नव्हते. जिथे नंबर वन होण्याची भीती निर्माण झाली, ते क्षेत्र मी सोडले. परत जन्मभर ढुंकून बघायचे नाही अशा ठाम निर्णयाने. नंबर वन झाले, की जबाबदारी येते. आणि ती जबाबदारी पार पाडावी लागते. आणि तुमची सुटका होत नाही. मला माझं आयुष्य माझ्या इच्छेप्रमाणे जगायचं होतं. मला जेव्हा पाहिजे तो बदल करण्याची मला मोकळीक हवी होती म्हणून कधी नंबर वन पद घ्यायचं नाही असं मी ठरवलं.
अपंग विद्यार्थ्यांची गरज म्हणून बालविकास शास्त्रावर लक्ष केंद्रित केलं. कोर्सेस केले. अनुभव घेऊन आलो. बाल मार्गदशन केंद्र चालू केलं. जोरदार उद्घाटन वगैरे. पण कोण कुत्रं ढुंकून बघेना कि हा बाबा काय करतोय. गावातल्या कुणालाच ही संकल्पनाच समजेना. मग मी पाटी बदलली. प्रगती पुस्तकातील लाल रेघांचा दवाखाना काढला. तो छान चालला. १०-१५ वर्षांनी शासनाने कुणालाच नापास करायचे नाही. असा निर्णय घेतला. आता कुणालाच शैक्षणिक काळजी वाटेना. मुलगा आठवीत गेला पण त्याला तिसरीतलही लिहिता येईना. ऑटिझमचं प्रमाण प्रचंड वाढलं. अजून तरी त्यांची शैक्षणिक सोय सरकारलाही करता आली नाही, मलाही वैयक्तिक करता आली नाही. व्यवहारात बसवता येत नाही.
करता करता सत्तरी आली. व्यवसाय फुल स्विंग मधे. लागोपाठ तीन दिवस तीन रात्र डिलिवरी, सीझर, सिरिअस मुले, एक मिनिट झोप नाही कि विश्रांती नाही. ब्रेक डाउन क्षण आला. पुण्याला जाऊन दोन दिवस झोप काढून परत आलो ते हॉस्पीटल बंद करायचा निर्णय घेऊन. चक्क इमारत भाड्याने दिली. बाल कल्याण केंद्रात पूर्ण वेळ मोफत आदर्श शालेय आरोग्य सेवा गेली ४ वर्षे देत आहोत. आधी जीव वाचवणे, आता मुलाना घडवणे, भावनिक, अध्यात्मिक विकास घडवणे, प्रतिबंधात्मक बाल आरोग्य सेवा हे आमचे कार्यक्षेत्र आहे. आम्ही ते जोडीने एंजॉय करतोय.
– डॉ. अनिल मोकाशी
डॉ. माधुरी मोकाशी


मनापासून छान लिहिलं आहे.
अभिनंदन-
–डॉ. प्रमोद जोग,पुणे
9422309677